क्रांतीकारकांना स्फूर्ती देणारे वन्दे मातरम् !

‘वन्दे मातरम् ।’ दिनाच्या निमित्ताने….

       ‘वन्दे मातरम् ।’ हे हिंदुस्थानचे ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यातील ‘वन्दे मातरम्’ या दोन शब्दांना, तर फारच महत्त्व लाभले आहे. कित्येक राष्ट्रभक्तांना न्यायालयात मोठमोठ्या शिक्षा ऐकतांना, कित्येक क्रांतीकारकांना हसत हसत फासाचा दोर गळ्यात अडकवून घेतांना या दोन शब्दांचीच आठवण झाली आहे. बंकिमचंद्रांनी ‘वन्दे मातरम् ।’ हे गीत ७ नोव्हेंबर १८७५ या दिवशी लिहिले. ही तिथी होती कार्तिक शुक्ल नवमी ! या दिनानिमित्त ‘वन्दे मातरम् ।’ची स्तुती करणारे पुढील गीत देत आहोत.

वंद्य ‘वन्दे मातरम् ।’
वेदमंत्रांहून आम्हा वंद्य ‘वन्दे मातरम्’ !

माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती
त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती
आहुतींनी सिद्ध केला मंत्र ‘वन्दे मातरम्’ !

याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले
शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले
शस्त्रहीना एक लाभे शस्त्र ‘वन्दे मातरम्’ !

निर्मिला हा मंत्र ज्यांनी, आचरीला झुंजुनी
ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी
गा तयांच्या आरतीचे गीत ‘वन्दे मातरम्’ !

– ग.दि. माडगूळकर

Leave a Comment