आई-वडील आणि घरातील मोठ्या व्यक्ती यांना वाकून नमस्कार करावा !

भारतीय परंपरेनुसार तिन्हीसांजेला दिवेलागणी नंतर घरातून बाहेर पडतांना, प्रवासाहून घरी परतल्यानंतर, नवीन कपडे परिधान केल्यावर, अशा विविध प्रसंगी घरातील मोठ्यांना पाया पडण्याची पद्धत आहे. एक प्रकारे ही आशीर्वाद घेण्याचीच पद्धत आहे. मुलांनो, पुढील लेख वाचून नमस्कार करण्याच्या कृतीमागील शास्त्र जाणून घ्या आणि त्यानुसार आचरण करून सुखी व्हा !

आई-वडील, तसेच घरातील आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या सर्व व्यक्तींना वाकून, म्हणजे त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करावा.

काही मुलांना आई-वडिलांना वाकून नमस्कार करायची लाज वाटते. मुलांसाठी आई दिवसभरात १० वेळा तरी खाली वाकते. बाहेर खेळतांना मुलांकडून शेजार्‍याची काही हानी (नुकसान) झाली, तर शेजार्‍याने केलेला अपमान वडील सहन करतात. अशा आई-वडिलांना वाकून नमस्कार करण्याची का लाज वाटावी ? मुलांनो, आजपासून करणार ना सर्व जण आई-वडिलांना वाकून नमस्कार ?

केवळ आई-वडिलांनाच नाही, तर ताई-दादासह घरातील सर्व मोठ्या मंडळींनाही वाकून नमस्कार करावा. मुलांनो, जिथे जिथे मोठेपण असेल, मग ते वय, ज्ञान, कला असे कशातही असो, तिथे तिथे तुमचे मस्तक झुकले पाहिजे.

१. मोठ्यांना वाकून नमस्कार का करावा ?

मोठ्यांना वाकून नमस्कार केल्याने त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त होतो, तसेच आपल्या अंगी नम्रता येते. ‘वाकून नमस्कार करणे’, ही गर्व (अहंकार) अल्प (कमी) करण्याचीही सोपी युक्ती आहे.

‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे रहाती’ असे एक वचन आहे. अहंकाराने माणसाचा नाश होतो; मात्र अंगी नम्रता असलेला नेहमीच टिकून रहातो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी

२. आई-वडिलांना नमस्कार करण्यात लाज वाटू देऊ नका !

‘मातृदेवोभव । पितृदेवो भव । (म्हणजे माता – पिता देवासमान आहेत.)’, अशी आपल्या महान हिंदु संस्कृतीची शिकवण आहे. `आई-वडील व गुरु यांची सेवा करणे, ही सर्वांत उत्तम तपश्चर्या आहे’, असे `मनूस्मृती’ या ग्रंथात म्हटले आहे. पुंडलिकाच्या या तपश्चर्येमुळे विठोबा त्याच्यावर प्रसन्न झाला होता. मुलांनो, पुंडलिकाचा आदर्श समोर ठेवून आपणही आई-वडिलांचे मनापासून आज्ञापालन करणे व त्यांची लीन भावाने सेवा-शुश्रुषा करणे, हे आपले कर्तव्यच आहे.

तुष्टायां मातरि शिवे तुष्टे पितरि पार्वति ।
तव प्रीतिर्भवेद्देवि परब्रह्म प्रसीदति ।।२६।।
-महानिर्वाणतंत्र

भावार्थ : आई-वडील संतुष्ट झाल्यास परमेश्‍वरही प्रसन्न होतो. यासाठी मुलांनो, आई-वडिलांनी सांगितलेले मनापासून ऐका. त्यांच्या कामात त्यांना मदत करा. त्यांना देवासमान मानून त्यांची सेवा करा.

प्रत्येक मुलाने आई-वडिलांचे कृतज्ञ असले पाहिजे. आपण कोणत्याही सामान्य व्यक्‍तीपुढे विनम्र झाले पाहिजे. आपण इतरांशी मानसन्मानानेच वागले पाहिजे. प्रत्येक आई-वडिलांनी अनेक कष्ट सोसलेले असतात व त्याग केलेला असतो. जरी शिक्षकांनी अथवा आई-वडिलांनी मुलाला शिक्षा केली तरीही मुलांनी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त केली पाहिजे. ते आपल्यावर का रागावले, याचे मुलांनी चिंतन केले पाहिजे. `निश्चितच आपली काही चूक असली पाहिजे’, असा सूज्ञ विचार त्याने केला पाहिजे. कारण रागावण्यामुळे आई-वडील किंवा शिक्षक यांचा वैयक्‍तिक काहीच फायदा होत नाही. आपल्या मुलाने सुधारावे, त्याची वागणूक आदर्श व्हावी व लोकांनी त्याला चांगले म्हणावे या गोष्टींच्या ध्यासापोटी हा राग व रागवणे असते. तिर्‍हाईताच्या मुलांना आई-वडील रागावत नाहीत. आपल्या मुलाच्या प्रेमापोटी हा राग असतो व यामुळे मुलांनी याबद्दल मनात राग न धरता आई-वडील व शिक्षक यांचे आभारच मानले पाहिजेत. या जगात फुकट अशी कोणतीच गोष्ट मिळत नाही. आपले आई-वडील आपल्याला खाऊ, खेळणी अन्न, वस्त्र इत्यादी सर्व गोष्टी मायेने पुरवतात. त्याच्या बदल्यात मुले त्यांना काय देतात ? ते पैसे तर देऊ शकत नाहीत. निदान मुलांनी आई-वडिलांना आदर तरी द्यावा. घरातील वडील मंडळींच्या दररोज पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. एखाद्याने आपल्याला काही दिले, तर आपण त्यांचे आभार मानतो. आदरपूर्वक आभार मानण्याची अथवा कृतज्ञता व्यक्‍त करण्याची पारंपरिक भारतीय पद्धती म्हणजे वाकून नमस्कार करणे होय. काही मुलांना आपल्या आई-वडिलांच्या पाया पडायची लाज वाटते. आपली आई आपले मल-मूत्र साफ करणे, कपडे धुणे, आपल्याला आवडणारे जेवण करणे, जेवू घालणे यासाठी दिवसातून कितीतरी वेळा आपल्यासाठी खाली वाकते. मुलाच्या चुकीमुळे काही वेळा आई-वडिलांना शरमेने मान खाली घालावी लागते. या सर्व गोष्टींची परतफेड करता येणे शक्यच नाही. मग निदान आई-वडिलांना खाली वाकून नमस्कार करण्यात मुलांना मुळीच लाज वाटू नये.