मराठी भाषा

अमृतालाही पैजेने जिंकणारी मराठी भाषा !​



संतांनी मराठी भाषेचा केलेला प्रसार

१. ७०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी म्हणजे साहित्याचे लेणे !

‘७०० वर्षांपूर्वी वयाच्या १५ व्या वर्षी अमृतालाही पैजेने जिंकणार्‍या अशा मराठी भाषेत ब्रह्मविद्येचा सुकाळ करणार्‍या संत ज्ञानेश्वरांनी साहित्य सोनियाच्या खाणी उघडून मराठीचे थोर ओझे फेडण्याचा प्रयत्न केलाच कि नाही ?

‘माझा मराठाचि बोलु कौतुकें ।

परि अमृतातेंहि पैजासीं जिंके ।

ऐसीं अक्षरे रसिके । मेळवीन ।।

संत ज्ञानेश्वर (ज्ञानेश्वरी, ६.१४)

भावार्थ : अमृताहूनही गोड असे माझ्या माय मराठीचे बोल इतके कोवळे आणि रसाळ आहेत की, ते पाहून श्रवणेंद्रियांनाही जिभा फुटतात. त्यांचा आस्वाद घेता यावा; म्हणून ज्ञानेंद्रियात कलह उत्पन्न होतो.

ज्ञानेश्वरीतील या मराठी आता ओव्या साहित्याचे लेणे होऊन बसल्या आहेत.

२. ‘गुरुग्रंथसाहेब’साठी ६१ पदे रचून मराठीचा झेंडा पंजाबपर्यंत नेणारे संत नामदेव !

संत नामदेवाने आपल्या वाणीच्या चमत्काराने पंढरपुरापासून पंजाबपर्यंत मराठीचा झेंडा फडकवला. शिखांचा ‘गुरुग्रंथसाहेब’ संत नामदेवांच्या ६१ पदांनी विभूषित झाला आहे.

३. काशी क्षेत्रात मराठीला होणारा विरोध मोडून काढणारे संत एकनाथ म्हणजे ‘मराठी भाषेचे नाथ’ !

काशी तीर्थक्षेत्री उपस्थित संस्कृत पंडितांसमोर संत एकनाथांनी खडसावून प्रश्न केला,

संस्कृत करते ते महाकवी । मा प्राकृतीं काय उणीव ?

देश भाषा वैभवे ।। प्रपंच पदार्थी पालटली नांवे ।

परिरामकृष्णादि नामा नव्हे । भाषा वैभवे पालटु ।।

संस्कृत वाणी देवे केली ।

प्राकृत काय चोरापासोनी जाली ?

कालचाचि आजि उगवला ।

तो सूर्य काय म्हणावा शिळा ?

तेवि सनकादिकांचे जे ज्ञान ।

तेचि मराठी भाषे माजी जाण ।

येथे ठेवू जाता दूषण । दोषी आपण होईजे ।।

माझी मराठी भाषा चोखडी । परब्रह्मे फळती गाढी ।।

अशा प्रकारे माझ्या एकनाथाने आपले सद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या कृपेने काशीसारख्या विद्येच्या आगरात मराठी भाषेचा जयजयकार केला. निर्विरोधकांचा विरोध पूर्णतः मोडून काढला. नाथांच्या या पराक्रमामुळे अनेकांनी त्यांना ‘मराठी भाषेचा नाथ’ अशी संज्ञा दिली.

४. महाराष्ट्राला मराठी अभिमानी करणारे समर्थ रामदासस्वामींचे काव्य !

समर्थांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ ।’ या घोषणेने सह्याद्रीचा परिसर दुमदुमला. मराठी समाज एकमेकांना ‘राम राम’ म्हणून अभिवादन करू लागला. समर्थ रामदासस्वामींचे काव्य महाराष्ट्राच्या हाडीमासी मिळून गेले.

५. इंग्रजांनी मराठीचा छळ करूनही संस्थानिकांनी मराठीला दिला राजभाषेचा मान !

इंग्रजी राज्यात मराठीचा पुष्कळ छळ झाला. मातृभाषेकरता ‘मदर टंग’ म्हणजे ‘आईची जीभ’ असे शब्द उच्चारू लागली. पेशवाईनंतर इंग्रजी राजवटीत भारतातील अनेक सरदारांनी आपापली संस्थाने स्थापन केली. ग्वाल्हेर, इंदूर, धार, देवास, हैद्राबाद, कोल्हापूर, सांगली इत्यादी संस्थानांत मात्र मराठीला ‘राजभाषेचा मान’ मिळाला.’

(संदर्भ : स्मरणिका, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अखिल भारतीय अधिवेशन, ग्वाल्हेर. १२ आणि १३ मे १९९०, स्थळ : महाराष्ट्र समाज, ग्वाल्हेर.)

Leave a Comment