आत्मस्वरूपाचे प्रकटीकरण करणारे शिक्षणच खरे !

‘फक्त आपलेच सुख-दुःख ज्याला कळते त्या माणसाला ‘पशु’ ही संज्ञा भारतीय संस्कृती देते आणि ज्याला दुसर्‍याचे सुख-दुःख कळते आणि जो दुसर्‍याच्या दुःखाने दुखावतो अन् दुसर्‍याच्या सुखाने सुखावतो, तोच ‘माणूस’ अशी व्याख्या भारतीय संस्कृती करते. म्हणून ईश्वराचा साक्षात्कार करून घेण्यासाठी ज्या तीन गोष्टींची शिदोरी माणसाजवळ असावी लागते त्यात प्रथम मनुष्यत्वाची असावी लागते, असे श्री आद्य शंकराचार्य म्हणतात.

‘मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रयः ।’ (म्हणजे मनुष्य म्हणून जन्माला येणे, मुमुक्षुत्व आणि उन्नतांचा सहवास) अशा त्या तीन गोष्टी होत. मनाने मनुष्य होणे ही शिक्षणाची व्याख्या भारतीय संस्कृती करते.

कर्म, उपासना आणि ज्ञानकांड यांची कितीही तुम्ही अनुष्ठाने करा; पण जोपर्यंत तुम्हाला दुसर्‍यावर प्रेम करण्याची कला प्राप्त झाली नाही, तोपर्यंत तुम्ही मनुष्यजीवनाची सार्थकता ज्या ईश्वरप्राप्तीत आहे, ती गाठू शकत नाही. फक्त त्या त्रिकांडाच्या अनुष्ठानाने वेदविद्येचे रक्षण आणि परंपरा टिकून राहिल्या एवढ्याच. हळूहळू त्यांतील आचारविचार संपन्नता नष्ट झाल्यामुळे त्यांचा मूलभूत हेतू सिद्ध होत नाही. जोपर्यंत तुम्हाला दुसर्‍यावर प्रेम करण्याची कला प्राप्त होत नाही, तोपर्यंत राष्ट्र सुखी होणे शक्य नाही. या प्रेम करण्याच्या कलेलाच भक्ती असे म्हणतात. असे केल्याने कर्मयोग आणि ज्ञानयोग यांची परिणती भक्तीमध्ये होत जाते आणि तोच या तिन्ही कांडांच्या अनुष्ठानाचा हेतुगर्भ आहे. त्याशिवाय तुम्ही धर्मांगांच्या बाह्य विभूषणांनी कितीही अलंकृत झालात तरी त्याचा काही उपयोग नाही.

ह्यालाच खरेखुरे शिक्षण असे म्हणतात. आपण असे म्हणू शकता की, आपल्या शिक्षणाचे अंतिम ध्येय आत्मलाभ हे आहे. आपल्यातील मूलभूत, सूक्ष्म अशा आत्मस्वरूपाचा आविष्कार (प्रकटीकरण) ज्याच्यामुळे होते त्याला शिक्षण असे म्हणता येईल.’

– पू. काणेमहाराज, नारायणगाव, महाराष्ट्र. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘ईश्वरी राज्याची स्थापना’)