अध्यात्मातील पहिला धडा : अहंकार नको !

१. शूरसेन राजाला अध्यात्म शिकण्याची इच्छा होणे, त्याने आत्मानंद महाराजांना राजवाड्यात घेऊन येण्यास प्रधानाला सांगणे; परंतु महाराजांनी राजाला झोपडीत शिकायला बोलावणे

‘शूरसेन नावाचा एक राजा होता. त्याने आपले राज्य पुष्कळ वाढवले. त्याची प्रजाही सुखी होती. राजाला आपले शौर्य, राज्य, ऐश्वर्य आणि कर्तृत्व इत्यादी गोष्टींचा अभिमान होता. त्याला अध्यात्म शिकण्याची इच्छा झाली. तेव्हा शूरसेनाने आपल्या प्रधानाला बोलावून राज्यातील सर्वश्रेष्ठ अध्यात्मातील अधिकारी असलेल्या गुरूंचा मानसन्मान करण्यास आणि अध्यात्म शिकवण्यासाठी त्यांना प्रतिदिन राजवाड्यात घेऊन येण्यास सांगितले.

प्रधान : आपल्या राजधानीच्या जवळच रानामध्ये एका झोपडीत आत्मानंद महाराज रहातात. त्यांना साक्षात्कार झालेला आहे; पण ते येथे राजवाड्यात येतील, असे वाटत नाही.

राजा शूरसेन : तू रथ घेऊन जा. त्यांचा मानसन्मान कर आणि कसेही करून त्यांना घेऊन ये.

प्रधान आत्मानंद महाराजांकडे गेला. त्यांच्या पाया पडला आणि राजाचा निरोप सांगितला.

आत्मानंद महाराज : हे पहा, मला राजवाड्याची आवश्यकता नाही. राजाला अध्यात्म शिकायचे आहे, तर आवश्यकता राजाला आहे. त्याला खरीच तळमळ असेल, तर त्याने माझ्या झोपडीत शिकायला यावे.

२. राजाने अध्यात्म शिकण्यासाठी आत्मानंदांच्या झोपडीत जाणे
आणि ४ फूट उंचीच्या दारातून वाकून जाऊन आत्मानंदांचे दर्शन घेणे

प्रधानाने राजास त्याप्रमाणे कळवले. शेवटी राजा अध्यात्म शिकण्यासाठी आत्मानंदांच्या झोपडीत यायला सिद्ध झाला. राजा झोपडीत आला, त्या वेळी झोपडीतील एका बाजूच्या खोलीत आत्मानंद महाराज बसलेले होते. राजाने प्रधानासमवेत ‘मी आलो आहे’, असा महाराजांना निरोप पाठवला. राजाला वाटले, ‘महाराज त्याच्या स्वागताला बाहेर येतील.’ आत्मानंद महाराजांनी प्रधानाला सांगितले, ‘‘राजांना घेऊन आपण माझ्या खोलीत या.’’ खोलीचे दार केवळ ४ फूट उंचीचे होते. राजा आणि प्रधान यांना वाकून खोलीत यावे लागले. आत्मानंद महाराजांनी उठून दोघांचे स्वागत केले. त्यांना खावयास ताजी फळे दिली आणि जास्त वेळ न बोलता अध्यात्म शिकवण्यास आरंभ केला.

३. शूरसेन राजाने आत्मानंद महाराजांना विचारलेल्या प्रश्नाला ‘अध्यात्मातला पहिला धडा तू उत्तीर्ण झाला आहेस’, असे महाराजांनी उत्तर देऊन राजवाड्यात येण्याचे मान्य करणे

शूरसेन राजा प्रसन्न झाला. जातांना त्याने आत्मानंद महाराजांना नम्रपणे विचारले, ‘‘महाराज, मी राज्यकारभार बघण्यात व्यस्त असतो. माझ्या मनात आपल्याविषयी जास्त आदर आहे. आपली येण्या-जाण्याची सर्व व्यवस्था सन्मानपूर्वक करण्यासाठी मी प्रधानाला सांगितले होते. असे असतांना आपण मला येथे का बोलावलेत ?’’

आत्मानंद महाराज म्हणाले, ‘‘तू ‘मी राजा आहे’, हा अभिमान सोडून झोपडीत आलास आणि झोपडीत आल्यावरही ४ फूट उंचीच्या दारातून वाकून माझ्याकडे आलास, हाच तुझा अध्यात्मातला पहिला धडा होता. तू परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस. उद्यापासून तुझ्या वेळेप्रमाणे मी राजवाड्यात येईन.’’

संदर्भ : ‘इस्कॉन वाङ्मय’ १९.२.२०१३