संस्कृत भाषेची निर्मिती, व्याप्ती आणि महत्त्व !

संस्कृत भाषेची निर्मिती, व्याप्ती आणि महत्त्व !

आज संस्कृतदिन ! ज्या देववाणी संस्कृतने मानवाला ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवला, त्या देववाणीलाच कृतघ्न मानव विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील सर्वपक्षीय राज्यकर्ते नष्ट करायला सरसावले आहेत. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रत्येकाला संस्कृत भाषेचे सौंदर्य आणि थोरवी कळली पाहिजे.

संस्कृत भाषेची निर्मिती !

‘संस्कृत’ भाषा कशी तयार झाली, ते सांगतांना पाश्चात्त्यांच्या नादी लागलेले काही जण म्हणतात, ‘पहिल्यांदा मानवाला ‘आपल्या तोंडातून ध्वनी येतात’, हे कळले. त्या ध्वनींच्या खुणा, खुणांची चिन्हे आणि त्या चिन्हांचीच अक्षरे झाली. त्यातून बाराखडी, वस्तूंची नावे, अशा तर्‍हेने सर्व भाषा, अगदी संस्कृत भाषाही निर्माणझाली.’ अर्थात हे सर्व खोटे आहे. ईश्वराच्या संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली. मानवाच्या निर्मितीनंतर मानवाला आवश्यक ते सर्वकाही त्या ईश्वरानेच दिले. एवढेच नव्हे, तर मानवाला काळाप्रमाणे पुढे ज्याची आवश्यकता भासेल, तेही द्यायची त्याने व्यवस्था केली आहे. सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच ईश्वराने मनुष्यप्राण्याला मोक्षप्राप्तीसाठी उपयोगी पडणारी आणि चैतन्याने ओतप्रोत भरलेली अशी एक भाषा निर्माण केली. या भाषेचे नाव आहे ‘संस्कृत’.

प्रचंड शब्दभांडार असलेली भाषा

‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. हा प्रत्येक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार एवढे प्रचंड आहे की, त्याची माहिती घ्यायला एक आयुष्य पुरे पडणार नाही.’

एका प्राण्याला, वस्तूला आणि देवाला अनेक नावे असलेली संस्कृत भाषा ! ‘

संस्कृतमध्ये प्राणी, वस्तू इत्यादींना अनेक नावे देण्याची प्रथा होती, उदा. बैलाला बलद, वृषभ, गोनाथ अशी ६० च्या वर; हत्तीला गज, कुंजर, हस्तिन, दंतिन, वारण अशी १०० च्या वर; सिंहाला वनराज, केसरीन, मृगेंद्र, शार्दूल अशी ८० च्या वर; पाण्याला जल, जीवन, उदक, पय, तोय, आप; सोन्याला स्वर्ण, कांचन, हेम, कनक, हिरण्य आदी नावे आहेत.’ सूर्याची १२ नावे, विष्णु सहस्त्रनाम, गणेश सहस्त्रनाम काही जणांना पाठही असतात. त्यातील प्रत्येक नाम त्या त्या देवतेचे एकेक वैशिष्ट्यच सांगते.

वाक्यातील शब्द मागेपुढे केले, तरी अर्थ न बदलणे !

वाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रंखादति ।’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य पुढीलप्रमाणे कसेही लिहिले, तरी अर्थ तोच रहातो – ‘आम्रं खादति रामः ।’ ‘खादति रामः आम्रं।’ या उलट इंग्रजीत वाक्यातील शब्दांचे स्थान बदलले की, निराळाच अर्थ होतो, उदा. ‘Rama eats mango.’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य ‘Mango eats Rama.’ (असे लिहिले, तर त्याचा अर्थ होतो, ‘आंबा रामाला खातो.’) जेथे संस्कृतचे अध्ययन होते, तेथे संस्कृती वास करते. (‘देववाणी अशा या संस्कृतचे उच्चार जरी कानावर पडले, तरी आनंद वाटतो.’) संस्कृतिः संस्कृताश्रिता ।’ असे म्हणतात. याचा अर्थ आहे, ‘संस्कृती ही संस्कृतच्या आश्रयाला असते’, म्हणजे जेथे संस्कृतचे अध्ययन होते, तेथे संस्कृती वास करते. संस्कृतचा अभ्यास करणारी व्यक्ती ही संस्कृतीशील, सौजन्यशील असते.’

एकात्म भारताची खूण !

‘प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंत वगांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशीला, काशी आदी विद्यापिठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रूदट, कैय्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले.’

राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती !

‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीलाकडाडून विरोध केला. एक फ्रेंचतत्त्वज्ञ म्हणाला, “अरे, तुम्ही कशाकरता भांडता ? संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय ? आज हिंदुस्थानभरकहर आहे.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

सर्व भाषांची जननी संस्कृत (संस्कृत अ-मृत आहे !)

‘या संस्कृतद्वेष्ट्यांनी हे ध्यानात घ्यावे, ‘देववाणीचा ध्वज आता जागतिक स्तरावर पोहोचला असून त्याचे सारे श्रेय साडेतीन टक्केवाल्यांनाच (ब्राह्मणांनाच) आहे.’ कोणी कितीही नाके मुरडली, तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आहे ! भारताचीच नव्हे, तर जगाचीच मूळ भाषा संस्कृत आहे आणि तिच्यापासून निघालेल्या सर्व भाषा प्राकृत आहेत ! संस्कृत ही देवभाषा असल्याने तिच्यात अपार चैतन्य आहे, ती अ-मृत आहे, अमर आहे !!’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘देववाणी संस्कृतची वैशिष्ट्ये व संस्कृतला वाचवण्यासाठीचे उपाय’.)