श्रीमद आद्य शंकराचार्य (इ.स. ७८८ ते ८२०)

भारत वर्षाच्या प्राचीन व अर्वाचीन इतिहासात श्रीमद आद्य शंकराचार्य हे एक थोर ज्ञानी व तत्वज्ञ असे व्यक्तिमत्व होऊन गेले. अखिल भारताच्या एकात्मतेची मूर्ती घडविणाऱ्या अद्वैतवादी वैदिक तत्वज्ञानी श्रीशंकराचार्यांनी भरतखंडाच्या चारही कोपऱ्यात वैदिक धर्माची ध्वजा लावली. वेदांच्या आधाराने आणि वेदांतसुत्रांच्या पायावर त्यांनी आपले नवीन तत्वज्ञान उपदेशिले. भारतात धार्मिक तटबंदी उभारण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी करून दाखविले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथात श्रीशंकराचार्यांबद्दल अत्यंत गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत. ते म्हणतात- ”आचार्यांनी नाना प्रकारच्या मतमतांतरांनी त्रस्त झालेल्या भारतीय लोकांत समन्वय साधून भारतीय मनाला भेदामध्ये अभेद पाहण्याची शिकवण दिली. आपल्या अद्वैत सिद्धांताच्याद्वारे ही शिकवण भारतीयांच्या अंगी बाणवण्याचा त्यांनी महान प्रयत्न केला. अशा प्रकारचे कार्य साधण्यास अनेक पिढ्या खर्ची घातल्या तरी पुरे पडावयाचे नाही, इतके प्रचंड कार्य आचार्यांनी आपल्या अवघ्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यात साधले. त्यांच्या विचारधारेचा प्रभाव आधुनिक भारतातदेखील तेवढ्याच तेजाने जाणवत आहे. ते थोर तत्वज्ञ, महापंडित, प्रतिभावान कवी, समाजसुधारकांतील अग्रणी आणि चतुर संघटक होते. आचार्यांनी आपले कार्य बौद्धिक, तात्विक आणि धार्मिक या तिन्ही स्तरांवर करून निरनिराळ्या विचारधारांत एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. लोकजीवनात रूढ असलेले पंथ-भेद नष्ट करून सर्वांना ज्ञानाने मोक्ष मिळू शकतो हे पटवून दिले आणि ज्ञानोपासनेचा मार्ग दाखवून दिला.”

केरळ (मलबार) प्रांतात पूर्णानदीच्या काठी, कालडी ग्रामी इ.स. ७८८ मध्ये एका नंबुद्री ब्राम्हणाच्या कुळात या अलौकिक व असामान्य धर्मप्रवर्तकाचा जन्म झाला. लहानपणीच वडील गेल्याने त्यांची जोपासना आर्यांबा या त्यांच्या मातेने केली. त्यांच्या वडिलांचे नाव शिवगुरू होते. अध्ययन व अध्यापन यांची एक उज्ज्वल परंपरा त्या घराण्यात चालत आलेली होती.

श्रीशंकराचार्यांनी आठव्या वर्षी सर्व वेदांचे अध्ययन पूर्ण केले. आईकडून संन्यास घेण्याबद्दल परवानगी मिळवून ते घराबाहेर पडले. विंध्याद्रीच्या आसपास त्यांची गोविंद पूज्यपादाचार्य यांच्याशी गाठ पडली. त्यांनी उपदेश करून शंकराचार्यांना संन्यासदीक्षा दिली. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी सर्व शास्त्रात प्रावीण्य प्राप्त केले. नंतर ते काशीला गेले. तेथे त्यांनी पंडितांशी वाद करून त्यांना आपल्या विद्वत्तेने प्रभावित केले; त्यांना वादात जिंकले, त्यामुळे त्यांची महती, कीर्ती वाढली.

श्रीशंकराचार्यांनी उपनिषदे, गीता व वेदांतसूत्रे या प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिले आणि आपला अद्वैत वेदांताचा सिद्धांत प्रस्थापित केला. तेच शांकरभाष्य. अद्वैत म्हणजे जीव, शिव (ईश्वर) ही दोन नव्हेत, एकच आहेत; आणि ब्रम्ह हे चराचर सृष्टी व्यापून राहिले आहे. या भाष्यामुळे जुन्या वैदिक संस्कृतीची परंपरा पुनरुज्जीवित होऊन तिचे भारतीय जीवनातील स्थान अखंड राहिले.

श्रीशंकराचार्यांची आई आजारी पडली. ती त्यांची वाट पाहत होती. त्यांना हे वृत्त कळताच ते कालडीला गेले. आईची भेट घेतली. तिला अतिशय आनंद झाला. ”शंकरा, मला श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष दर्शन घडव.” आईने इच्छा व्यक्त करताच श्रीशंकराचार्यांनी श्रीकृष्णाची स्तुती केली. शंख, चक्र, पद्म धारण केलेला श्रीकृष्ण प्रकट झाला. श्रीकृष्णदर्शनाने त्यांची आई कृतकृत्य झाली.

पुढे श्रीशंकराचार्यांनी सर्व भारतभर संचार केला, ठिकठिकाणच्या पंडितांना जिंकले. त्यात कुमारिलभट्टाचे शिष्य मंडनमिश्र यांच्याशी त्यांचा वाद झाला. त्यातही त्यांना विजय मिळाला. मंडनमिश्रांची पत्नी सरस्वती ही त्या वादात पंच होती. ह्यावरून त्या कालच्या स्त्रियांच्या विद्वत्तेविषयी व सामाजिक दर्जाविषयी अनुमान होते.

अद्वैत हेच सत्य आहे, हे श्रीशंकराचार्यांनी सिद्ध केले; म्हणजे, ”सर्वव्यापी, निर्गुण, निराकार ब्रम्ह चोहीकडे भरलेले आहे. त्याच्या शक्तीने मायामय जगत उत्पन्न झाले आहे, जीवात्मा हा त्या ब्रम्हाचा अंश आहे आणि खरे ज्ञान झाल्यावर जीवात्मा त्या परमात्म्याशी एकरूप होऊन जातो.” हाच त्याचा अर्थ एका संस्कृत श्लोकार्धात श्रीशंकराचार्यांनी सांगितला.

” ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः l ”

मध्यार्जुनाच्या शिवमंदिरात भर सभेत श्रीशंकराचार्यांनी हा सिद्धांत मांडला, तेव्हा शिवलिंगातून शिवशंकर प्रगट झाले व उजवा हात उभारून त्यांनी घोषणा केली, ‘अद्वैत हेच सत्य आहे.’ तेव्हा लोकांची खात्री पटली.

यानंतर श्रीशंकराचार्यांनी आसाम, उज्जैयिनी, काश्मीर इत्यादी अनेक ठिकाणी जाऊन तेथील पंडितांना वादात जिंकले. सर्वत्र प्रवास करून त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रचार केला. त्यांचे तत्त्वज्ञान हे भौतिक सुखदुःखाच्या कल्पनेपलीकडे असलेल्या आनंदाचा ठेवा आहे. आपले कार्य अखंडित चालू राहावे म्हणून पश्चिमेस द्वारका, पूर्वेस जगन्नाथपुरी, उत्तरेस बद्रीकेदार व दक्षिणेस शृंगेरी येथे त्यांनी शांकरतत्त्वज्ञानाची पीठे स्थापन केली. पंचायतन-पूजा श्रीशंकराचार्यांनी सुरु केली.


वयाच्या बत्तिसाव्या वर्षी शंकराचार्य हिमालयात केदारनाथ येथे गेले, ते फिरून परत आलेच नाहीत.