आझाद हिंद सेनेची कॅप्टन लक्ष्मी

‘कॅप्टन लक्ष्मीचा जन्म २४.१०.१९१४ या दिवशी मद्रास येथे झाला. खिस्ताब्द १९३८ मध्ये वयाच्या २४ व्या वर्षी ती एम्.बी.बी.एस्. परीक्षा उत्तीर्ण झाली. सिंगापूरमध्ये नेताजी सुभाषचंद्रांची भाषणे तिने ऐकली आणि प्रभावित होऊन आझाद हिंद सेनेकडे आकर्षित झाली. २२ ऑक्टोबर हा झाशीची राणी लक्ष्मीचा जन्मदिन. १९४३ साली याच दिवशी सुभाषबाबूंनी आझाद हिंद फौजेतच स्त्रियांच्या ‘झांशी राणी लक्ष्मी’ पथकाची स्थापना केली. या पथकाचे नेतृत्व लक्ष्मीने स्वीकारले. कॅप्टन लक्ष्मी आपल्या वेगवेगळ्या तुकड्या घेऊन प्रत्यक्ष रणांगणावर आपल्या शत्रूंशी, इंग्रज सेनेशी लढण्यासाठी निघाल्या. खरे तर त्या वेळी त्यांच्याकडे पुरेसा शिधा नव्हता, पुरेसे कपडे नव्हते, दारुगोळा नव्हता, ज्या भागात जायचे तो दर्‍या-खोर्‍यांचा, दाट जंगलाचा प्रदेश होता.

भल्या पहाटे मोहिमेवर कूच करण्याचा हुकूम आला. इंग्रज सेना सुमारे एक मैलभर अंतरावर दूरअसतांना ती एकदम चाल करून आली. लगेच कॅप्टन लक्ष्मींनी प्रत्युत्तर देण्याचा आदेश दिला. झांशी राणीपथकाने इंग्रज सेनेवर प्रतिहल्ला चढविला, बंदुका, गोळ्या ओकायला लागल्या, तोफांतून भयंकर आगगोळे शत्रूवर तुटून पडू लागले. ‘जय हिन्द’, ‘इन्कलाब झिंदाबाद’ ‘आझाद हिन्द झिंदाबाद’ घोषणांनी इंग्रज पथकाला कापरे भरले. जय घोषणाच्या जोशात तोफांचा मारा चालूच होता. कॅप्टन लक्ष्मी यांची ‘झाशीची राणी’ विजयी झाली. हिन्दुस्थान आणि ब्रह्मदेश यांच्या सरहद्दीवर झालेल्या या लढाईत झांशी राणी पथकाने इंग्रजाच्या मर्द पुरुषांच्या शूर पथकाला नाक मुठीत धरून शरण यायला भाग पाडले.’