भक्त प्रल्हाद

हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हिरण्यकश्यपूने घोर तप करून देवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की, त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही, दिवसा किंवा रात्री येणार नाही, घरात किंवा घराबाहेर येणार नाही. या गोष्टीमुळे त्याला वाटले की, त्याला कुणीही मारू शकणार नाही. त्यामुळे राजाला अहंकार झाला. ‘देवांपेक्षा मीच मोठा’, असे त्याला वाटायला लागले. कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना. राजाचाच मुलगा प्रल्हाद मात्र सतत देवाचे नाव घेई. ‘नारायण नारायण’ असा जप करतच तो दैनंदिन कामे करी. वडिलांना देवाचा जप केलेले आवडत नाही; म्हणून प्रल्हाद त्यांच्यासमोर येतच नसे. तरीपण कधीतरी राजाची प्रल्हादाशी गाठ पडे. प्रल्हादाचा नामजप ऐकून राजा रागाने लाल लाल होई आणि मुलाला फार मोठी शिक्षा देण्याची सेवकांवर सक्ती करी.

एके दिवशी नामजपामध्ये तल्लीन झालेल्या प्रल्हादाला राजा येत आहे, हे कळलेच नाही. राजाने नामजप ऐकताक्षणीच सेवकांना आज्ञा केली की, डोंगराच्या उंच कड्यावरून प्रल्हादाला खोल दरीत ढकलून द्या आणि तसे केल्यावर मला कळवा. सेवकांनी तसे केले आणि राजाला कळवले. थोड्याच वेळात राजवाड्याच्या आगाशीत उभ्या असलेल्या राजाला प्रल्हाद दुरून राजवाड्याकडे येतांना दिसला. प्रल्हादाला जिवंत पाहून राजा सेवकांवर चिडला. काय झाले ते मुलालाच विचारावे म्हणून ‘प्रल्हाद राजवाड्यात येताक्षणी त्याला माझ्यासमोर उभे करा’, अशी त्याने सेवकांना आज्ञा केली. राजवाड्यात आल्यावर प्रल्हाद राजासमोर नम्रपणे उभा राहिला. राजाने त्याला विचारले, ”सेवकांनी तुला डोंगराच्या कड्यावरून ढकलून दिले कि नाही ?” प्रल्हादाने उत्तर दिले ”हो.” राजाने पुन्हा विचारले, ”मग तू इथे परत कसा आलास ?” तेव्हा प्रल्हाद हसून म्हणाला, ”मी एका झाडावर अलगद पडलो. झाडावरून उतरलो. तेथूनच एक बैलगाडी जात होती. तिच्यात बसून मार्गापर्यंत आलो. का कुणास ठाऊक; पण माझ्यासमवेत सतत कुणीतरी आहे, असे मला वाटत होते; म्हणून मी इथे लवकर येऊ शकलो.” राजा निराश झाला. त्याने प्रल्हादाला जायला सांगितले.

काही दिवस उलटले. राजाच्या खास लोकांसाठी जेथे जेवण सिद्ध केले जाते तेथे प्रल्हाद काही कामासाठी गेला असता त्याच वेळी तेथे आलेल्या राजाची नजर त्याच्यावर पडली. प्रल्हाद ‘नारायण नारायण’ असा नामजप करत चालला होता. पुन्हा राजा रागावला. त्याने सेवकांना आज्ञा केली की, जवळच असलेल्या मोठ्या कढईतील उकळणाऱ्या तेलात प्रल्हादाला टाकून द्या. सेवक घाबरले; कारण प्रल्हादाला तेलात टाकतांना उकळणारे तेल अंगावर उडून आपण भाजू अशी त्यांना भीती वाटली; पण काय करणार ? राजाज्ञा ऐकायलाच हवी; म्हणून त्यांनी प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले. ‘आता याला कोण वाचवतो’, हे बघायला या वेळी राजा स्वत: उपस्थित राहिला. चारही बाजूंनी उकळते तेल उडाले. सेवक भाजल्यामुळे ओरडू लागले; पण प्रल्हाद मात्र अतिशय शांत उभा होता. राजा पहातच राहिला. बघता बघता कढईत कमळ दिसू लागले. त्यावर शांतपणे प्रल्हाद उभा होता. पुन्हा राजा चिडला. रागाने आपल्या परिवारासह निघून गेला.

राजाने प्रल्हादावर नजर ठेवली होती. शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादाला विचारले, ”बोल, कुठे आहे तुझा देव ?” प्रल्हादाने सांगितले, ”सगळीकडे.” राजाने जवळच्याच खांबाला लाथ मारून म्हटले, ”दाखव तुझा देव या खांबात.” तोच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रगटला. माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके (म्हणजे माणूस किंवा प्राणी नाही), उंबरठ्यावर (म्हणजे घरात किंवा घराबाहेर नाही), सायंकाळी (म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही), अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला; कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही, असा त्याला वर होता.

मुलांनो, प्रल्हादाच्या नामसाधनेमुळे नारायणाने प्रत्येक वेळी प्रल्हादाचे रक्षण केले. आपणही नामस्मरण केल्यास संकटकाळी देव धाऊन येईल.