श्री गणेश जयंती

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. अनेक गणेशभक्‍तांनी याच दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला आहे.

गणेशजयंतीला गणेशतत्त्वाचा फायदा होण्यासाठी करावयाची उपासना

या दिवशी गणपतीचा भावपूर्ण नामजप ३ ते ९ माळा करण्याचा प्रयत्‍न करावा. त्याचप्रमाणे गणपतीच्या प्रतिमेचे अथवा मूर्तीचे पूजन केल्यास गणपतीची शक्‍ति व चैतन्य यांचा जास्त फायदा होतो. गणपति अथर्वशीर्ष म्हटल्यासही फायदा होतो.

शुभकार्यात प्रथम गणेशपूजन का करतात ?

गणपति हा दिशांचा अधिपति आहे. गणेशपूजन केल्यामुळे दिशा मोकळया करतो. त्यामुळे ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो, ती पूजास्थानी येऊ शकते. गणपति (नाद) भाषेचे देवांच्या (प्रकाश) भाषेत रूपांतर करतो, त्यामुळे मनुष्याच्या प्रार्थना देवांना कळतात. गणपति विघ्नहर्ता आहे.

गणपतीचे वाहन

वृ-वह म्हणजे वहाणे यापासून वाहन हा शब्द बनला आहे. देवांचे वाहन हे त्यांच्या कार्यानुसार त्या त्या वेळी बदलते. उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन, पण त्याची इतरही वाहने आहेत.उदा. युद्धासाठी सिंह. हेरंब गणपतीचे वाहन सिंह, तर मयूरेश्वराचे वाहन मोर आहे.

विद्यार्थी मित्रांनो, गणपतीची शक्ती मिळवण्यासाठी प्रतिदिन खालील गोष्टी करा !

१. अथर्वशीर्षाचे पठण : मुलांनो, आपल्या वाणीत चैतन्य असले की, आपल्या बोलण्यात गोडवा येतो.अथर्वशीर्र्षाच्या पठणाने आपले उच्चार स्पष्ट होतात आणि वाणीत गोडवा येतो. यासाठी अथर्वशीर्षाचे पठण करा.

२. अधिकाधिक प्रार्थना : आपण ज्या भाषेत बोलतो, तिला नादभाषा म्हणतात. इतर देवतांपेक्षा श्रीगणपतीला आपली भाषा अधिक कळते; म्हणून अधिकाधिक प्रार्थना करून त्याची कृपा संपादन करावी.

३. मानसपूजा : मानसपूजा म्हणजे मनाने केलेली पूजा. मानसपूजेमुळे मनाला उत्साह मिळतो. यालाकोणतेच बंधन नसते. आपल्याला या पूजेद्वारे आपल्या आवडीची वस्त्रे, आवडीची वस्तू देता येते. आपण मनाने सतत श्री गणपतीच्या सहवासात राहून आनंदी राहू शकतो.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्री गणपति’

विद्यार्थ्यांनो, श्री संकष्टनाशन गणपतिस्तोत्राचे पारायण करा !

श्री गणपतीची आरती ऐकण्यासाठी येथे क्लिक करा !

गणपति अथर्वशीर्ष ऐकण्यासाठी येथे क्लिक करा !