बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या वतीने विशाल हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन
इच्छावर (मध्यप्रदेश) : हिंदुत्वनिष्ठ राजकारण्यांना राममंदिर बांधण्यासाठी थोडा वेळ नक्की देऊ; पण वेळेत मंदिर न बांधल्यास हिंदू थांबणार नाहीत. माझ्यासारखे अनेक साधू-संत लाखो हिंदूंना घेऊन अयोध्येत प्रवेश करतील आणि राममंदिर बांधतील, असे प्रतिपादन पू. साध्वी सरस्वतीजी यांनी येथे केले. सिहोर जिल्ह्यातील इच्छावर गावात विशाल हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला त्या संबोधित करत होत्या. सभेचे आयोजन बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांनी केले. श्री. राजेंद्र वर्मा हे या सभेचे आयोजक होते. सहस्रो युवकांच्या उपस्थितीत ही सभा झाली.
पू. साध्वी सरस्वतीजी यांनी हिंदु तरुणांना संघटित होऊन धर्मरक्षणासाठी सज्ज रहाण्यास सांगितले. ‘प्रत्येकाने वैयक्तिक जीवनात सनातन हिंदु धर्माचे आचरण करावे. आपल्या मुलांना संस्कृत, हिंदी शिकवा. ख्रिस्ती शाळेत न घालता भारतीय संस्कृतीप्रमाणे शिक्षण देणार्या शाळेत घाला’, असे आवाहनही त्यांनी केले. भगवे वस्त्रधारी संन्यासी योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री पदावर आरूढ झाल्याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला.
जिहादी संकटांना सामोरे जाण्यासाठी हिंदूंनी सज्ज होणे आवश्यक ! – अभय वर्तक
या कार्यक्रमात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचेही मार्गदर्शन झाले. ते म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून हिंदु राष्ट्राची स्थापना वर्ष २०२३ मध्ये या देशात निश्चित होईल. या देशाला पराक्रमाची परंपरा आहे. ती अबाधित राखली जाईल. येणार्या काळात जिहादी संकटांना सामोरे जाण्यासाठी हिंदूंनी सज्ज होणे आवश्यक आहे.’’ सभेला हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे हेही उपस्थित होते.
क्षणचित्र : सभास्थळी सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.
सनातन ही आदर्श संस्था ! – पू. साध्वी सरस्वतीजी
पू. साध्वी सरस्वतीजी यांनी सनातन संस्थेचा गौरव करतांना म्हटले की, ही एक आदर्श संस्था आहे. सनातन हिंदु धर्माचा प्रसार करण्यासाठी सनातनचे साधक तळमळीने प्रयत्न करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात