इतिहास हा इतिहासच असतो. या इतिहासाचे सादरीकरण जसेच्या तसे करणेच आवश्यक असते. इतिहासाला पालटण्याचा प्रयत्न केल्यास ती एक विकृतीच बनते.
१. इतिहास हा जनसंस्कृतीने प्रत्यक्ष जगलेला असल्याने त्याला कलेच्या नावाखाली अवास्तव बनवाल, तर काळाला ते मान्य होणार नाही !
२. इतिहासाचे अवास्तव चित्रीकरण म्हणजे समाजमनाचा घात, म्हणजेच देशाच्या राष्ट्रीयत्वाची हानी !
काहीजणांनी या चित्रपटाला कलेचे गोंडस रूप देत त्यातील इतिहासाचे विकृतीकरण नाकारले. असा जर तुम्ही इतिहासाला डावलण्याचा प्रयत्न कराल, तर समाजमनाला बोधप्रद ठरणारे वास्तव एक भयानक विकृती म्हणून समाजमनावर बिंबते. इतिहासाचे अवास्तव चित्रीकरण एक दिवस समाजमनाचा घात करते. यामुळे देशाच्या राष्ट्रीयत्वाचीही हानी होते. खरं म्हणजे हा एक गुन्हाच आहे.
३. इतिहासाला गतकाळचे समष्टी प्रारब्धभोग असतात, तर कलेला नेहमीच वर्तमान असते; म्हणून या दोघांची तुलना करू नका !
इतिहास हा इतिहासच असतो, तो कला होऊ शकत नाही. इतिहासाला गतकाळाचे कर्मभोग असतात, तसेच गतकाळचे समष्टी प्रारब्धही असते; परंतु कलेला नेहमीच वर्तमान असते. ईश्वरप्राप्तीच्या दिशेने नेणारी ती खरी कला. कलेला इतिहास बनवायचा प्रयत्न करू नका किंवा इतिहासाला कलाही बनवू नका. दोघांची तुलना होऊ शकत नाही.
४. इतिहासाच्या भूतकाळाला कलेच्या नावाखाली तुम्ही समाजमनाचा भविष्यकाळ बनवू पहाल, तर ते कसे शक्य होणार ?
इतिहास हा समाजमनाने जगलेला असतो, तर कला ही समाजमनाला जगवण्यासाठी असते; म्हणून इतिहासाच्या भूतकाळाला कलेच्या नावाखाली तुम्ही समाजमनाचा भविष्यकाळ बनवू पहाल, तर ते कसे शक्य होणार ? कलेला सौंदर्याच्या नावाखाली वेगवेगळ्या दृष्टीने पहाता येते; परंतु इतिहासाला त्याच्या वास्तवासकटच स्वीकारावे लागते, हे वास्तव विसरून कसे चालेल ?
५. इतिहासाशी मनमानी कराल, तर ते काळाशीच प्रतारणा केल्यासारखे होईल; म्हणून काळाच्या शिक्षेला घाबरून रहा !
इतिहासाचे सादरीकरण तंतोतंत जसेच्या तसेच व्हायला हवे. त्याला कलेचे गोंडस रूप देऊन इतिहासाशी मनमानी कराल, तर ते काळाशीच प्रतारणा केल्यासारखे होईल. कदापि हे धाडस करू नका. काळाला हे संमत होत नाही. काळाचा विरोध पचवण्याची ताकद आपल्यात नसते. काळाने दिलेली शिक्षा भयंकर असते. या शिक्षेला घाबरून रहा !
– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, गोवा.