शनि शिंगणापूर येथील पावित्र्यरक्षणासाठी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने करत असलेल्या हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळीच्या निमित्ताने…
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेल्या नेवासा तालुक्यामध्ये श्री क्षेत्र शनि शिंगणापूर हे जागृत देवस्थान आहे. संपूर्ण देशातून, तसेच देशाबाहेरूनही भाविक येथे दर्शनासाठी येतात. आजच्या संगणक युगातही या गावाने गावपण, तसेच परंपरेने चालत आलेल्या रूढी-परंपरा मोठ्या श्रद्धेने जतन केल्या आहेत. या परंपरांना धक्का देण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा गावातील ग्रामस्थांसह महिला, भगिनी आणि भाविक श्रद्धेने एकत्र येऊन लढा देण्यास सज्ज होतात. प्रत्येक वेळी श्रद्धेचा विजय होतो, हे शिंगणापूरने दाखवून दिले आहे. नुकतेच एका महिलेने शनिदेवाच्या चौथर्यावर चढून देवाला तेल वाहिले. त्यामुळे सर्वत्र गदारोळही झाला. आता देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर दोन महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने श्री शनैश्वर देवस्थानचा इतिहास, पूर्वीचे निष्ठावंत विश्वस्त आणि राजकीय हस्तक्षेपामुळे झालेली हानी यांसंदर्भात नगर येथील मढी देवस्थानचे विश्वस्त श्री. मिलिंद सदाशिव चवंडके यांनी लिहिलेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. श्री शनैश्वर देवस्थान शिंगणापूर सार्वजनिक न्यासाची नोंदणी
जुन्या काळातील इयत्ता ७ वीचे शिक्षण झालेल्या बाबुराव बानकर पाटील या व्यक्तीने १८ जुलै १९६३ या दिवशी श्री शनैश्वर देवस्थान शिंगणापूर सार्वजनिक न्यास नोंदणीचे कार्य केले. गावातील पाच विश्वस्तांना घेऊन सलग ४० वर्षे त्यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून नेटका पदभार सांभाळला. वर्ष २००३ मध्ये त्यांना देवाज्ञा झाली. बानकर घराण्यावर गावकर्यांचा असलेला विश्वास आणि ह.भ.प. बद्रिनाथ महाराज तनपुरे यांची विनंती यांमुळे बाबुराव बानकर यांचे सुपुत्र सुरेश बाबुराव बानकर यांना एकमताने विश्वस्त म्हणून नेमण्यात आले. डॉ. रावसाहेब बानकर यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. वर्ष २००३ ते २००५ या कालावधीत हे विश्वस्त मंडळ काम पहात होते. सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी १९९१ या वर्षी शनि देवाची भजने असलेल्या पहिल्या मराठी ध्वनीफितीची निर्मिती केली. ही ध्वनीफीत महाराष्ट्रभर गाजली.
वर्ष १९९५ मध्ये अनुराधा पौडवाल यांनी निर्माते गुलशन कुमार यांच्या साहाय्याने सूर्यपुत्र शनिदेव हा चित्रपट निर्मिला. त्यानंतर शिंगणापूरची गर्दी वाढतच गेली. या चित्रपटाच्या निर्मितीसाठीही श्री. बाबुराव बानकर आणि अधिवक्ता सयाराम बानकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
२. निष्ठेने आणि श्रद्धेने देवस्थानचे कार्य करणारे बाबुराव बानकर यांची देवस्थानच्या अध्यक्षपदी नियुक्ती !
बाबुराव बानकर पाटील यांची सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चांगली जवळीक असल्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढार्याने देवस्थानच्या कार्यात ढवळाढवळ न करता सहकार्याची भूमिका घेतली. वर्ष २००० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बाबुराव बनकर यांना मुंबईला बोलावून घेऊन त्यांच्याकडे देवस्थानच्या अध्यक्षपदाची सूत्रे सुपुर्द केली.
३. महिलांना शनिदेवाच्या चौथर्यावर प्रवेश मिळण्यासाठी अंनिसने केलेल्या आंदोलनाच्या विरोधात गावकर्यांची एकजूट
वर्ष १९९८ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी चला, चोरी करायला शनि-शिंगणापूरला आणि महिलांना शनिदेवाच्या चौथर्यावर प्रवेश मिळालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेत आंदोलन छेडले, तेव्हा महाराष्ट्र शासनाने मंदिर परिसरात १४४ कलम लागू केले. मराठा महासंघानेही देवस्थानच्या बाजूने रहाण्याचा निर्णय घेतला. महासंघाचे राज्य अध्यक्ष शशिकांत पवार आणि नगर जिल्ह्याचे अध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांच्यासह महासंघाचे महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते शिंगणापूरमध्ये तळ ठोकून होते. घोडेगावपासून शिंगणापूरला जाणारा मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला होता. या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी मी स्वतः शिंगणापूर गाठले होते. बाबुराव बानकर पाटील आणि अधिवक्ता सयाराम बानकर पाटील यांनी माझी निवासव्यवस्था सांभाळली. नगर जिल्ह्यातील मी एकमेव पत्रकार तेव्हा शिंगणापूरमध्ये तीन दिवस मुक्कामी होतो. देवस्थानच्या बाजूने आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली श्रद्धेला हात घालण्याच्या प्रसंगाचे सविस्तर वार्तांकन मी केले. तेव्हा गावातील ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे अखेरीस डॉ. दाभोलकर यांना स्थानबद्ध करण्यात आले. डॉ. दाभोलकर आणि शालिनी ओक यांनी २/२००१ द्वारे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली. महिलांच्या चौथर्यावरील प्रवेशासंदर्भात परंपरेत पालट करता येणार नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सुनावले.
४. गत दहा वर्षांत देवस्थान समितीत राजकारण्यांचा वाढलेला हस्तक्षेप आणि त्याचे परिणाम
वर्ष २००५ मध्ये नेवासा तालुक्यातील राजकीय पुढार्यांनी आपले वजन मंत्रालयात वापरून या देवस्थानमध्ये आपले विश्वस्त बसवण्याचे कार्य पार पाडले. आपले हितचिंतक आणि विश्वस्त यांचे नातेवाईक यांना देवस्थानमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या. २००५ ते २०१५ या कालावधीत राजकीय पुढारी आपल्या विश्वस्तांच्या माध्यमातून देवस्थानची सूत्रे हलवण्यात धन्यता मानत राहिले. महात्मा फुले जयंतीच्या दिनी (२०१५ मध्ये) एका महिलेने शनिदेवाच्या चौथर्यावर चढून देवाला तेल वाहिल्याने बाळासाहेब बानकर यांनी ग्रामसभा घेऊन या घटनेचा निषेध करत विश्वस्तांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली. घडलेल्या घटनेचे नैतिक दायित्व स्वीकारून अधिवक्ता सयाराम बानकर या एकमेव विश्वस्ताने त्याच ग्रामसभेत राजीनामा देण्याचे घोषित करून धर्मदाय आयुक्त कार्यालयात लेखी त्यागपत्र सादर केले. त्यानंतर भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सवंग लोकप्रियतेसाठी शनिदेवाच्या चौथर्यावर जाण्यासाठी देवस्थानच्या कर्मचार्यांशी हुज्जत घातली. या वेळी कर्मचार्यांनी त्यांना जनसंपर्क कार्यालयात नेऊन गावातील रूढी-परंपरा, श्रद्धा याविषयी सांगण्यात आले.
५. आज विश्वस्तपदाची अपेक्षा करणार्या महिला तेव्हा कुठे होत्या ?
दरम्यान, देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचा कार्यकाल संपल्याने नवीन विश्वस्त मंडळ निवडीची प्रक्रिया चालू झाली. प्रथमच दोन महिलांची विश्वस्तपदी नेमणूकही झाली आहे. देवस्थानची घटना तयार करतांना म्हणजे वर्ष १९६३ च्या अगोदर ज्यांची संपत्ती शिंगणापूर गावात आहे, अशांनाच मूळ रहिवासी म्हणावे आणि मूळ रहिवासीच विश्वस्तपदासाठी पात्र आहेत, असे ठरवण्यात आले होते. त्याप्रमाणे आजतागायत शिंगणापूरच्या मूळ रहिवाशांना विश्वस्तपद दिले जात आहे. नगर जिल्ह्यातील अनेक देवस्थानांमध्ये ग्रामस्थांना सन्मानपूर्वक विश्वस्तपद देण्याची तरतूद घटनेत करण्यात आली आहे. शिंगणापूरमध्येही घटनेनुसार चालू असलेल्या विश्वस्त मंडळाच्या निवड प्रक्रियेवर या वेळी जोरदार चर्चा झडल्या. राजकीय मंडळींनी स्वतःची पोळी भाजण्यासाठी विश्वस्तपदासाठी अर्ज करण्याकरता महिलांना पुढे केले. परिणामी १० महिलांनी अर्ज सादर केले. या प्रकरणाची शिंगणापूरसह पंचक्रोशीत, तसेच देशभरातून येणार्या भाविकांमधून तीव्र असंतोष व्यक्त करणारी प्रतिक्रिया उमटली.
वर्ष १९९८ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देवस्थानच्या विरोधात आंदोलन छेडल्यानंतर, तसेच २०१५ मध्ये एक महिला देवाच्या चौथर्यावर चढल्यानंतर गावातील सर्व महिला एकमनाने एकत्र आल्या, तेव्हा आज विश्वस्तपदासाठी अर्ज दाखल करणार्या महिला कुठे गेल्या होत्या, असा प्रश्न उमटला.
६. रूढी-परंपरांचे पालन करून नि:स्वार्थपणे शनिदेवाची भक्ती करणारे श्री शनैश्वर महिला भजनी मंडळ
शनैश्वर महिला भजनी मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी परंपरेने कार्तिक महिन्यामध्ये देवस्थानात काकडा होतो. शनिदेवाच्या पालखी सोहळ्यात शनैश्वर महिला भजनी मंडळ अग्रभागी असते. पैठणला निघणार्या पालखी सोहळ्यातही शनैश्वर महिला भजनी मंडळासह गावातील भाविक महिला असतात. या महिलांपैकी कोणीही विश्वस्तपदासाठी इच्छुक नाही. यावरून गावाचे गावपण सांभाळण्यासह गावाचे श्रद्धास्थान असलेल्या शनिदेवाप्रती श्रद्धेने नतमस्तक होत रूढी आणि परंपरा टिकवून ठेवण्यासाठी गावातील महिला कशा पुढे आहेत, हेच दिसून येते.
७. देवस्थानचा कारभार राजकारण्यांकडून नव्हे, तर धार्मिक व्यक्तींकडूनच होणे अपेक्षित !
वारकरी संप्रदायातील संतांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानच्या कार्याची वाटचाल चालू आहे. त्यामुळेच शिंगणापूरचे भूमीपुत्र असलेले भानुदास महाराज तनपुरे, जगन्नाथ महाराज पवार आदी मान्यवरांना शनिरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे, पाथर्डी तालुक्यातील खंडु महाराज, पंढरीनाथ महाराज उंबरेकर, महादेव बाबा लांडेवाडीकर, श्री क्षेत्र देवगड येथील जागृत देवस्थाने आपली पूर्व परंपरागत परंपरा आणि रूढी जतन करत कार्यरत असतांना आणि भाविकांकडूनही देवस्थानच्या रूढी-परंपरा जतन करण्यासाठी मनापासून साथ मिळत असतांना काही राजकीय पुढारी स्वतःची पोळी भाजण्यासाठी देवस्थानच्या कार्यात ढवळाढवळ करण्यास पुढे येतात. स्वतःच्या माणसांना देवस्थानमध्ये घुसवून देवस्थानचा कारभार पहाण्याचे मनसुबे रचतात. वास्तविक देवस्थान हा काही राजकीय अड्डा नाही. सकारात्मक वृत्तीचे आणि निष्ठेने श्रद्धा सांभाळणारेच भाविक देवस्थानचे विश्वस्त झाल्यास देवस्थान राजकारणापासून अलिप्त राहून विकास घडवू शकेल, अशा प्रतिक्रिया भाविकांमधून ऐकावयास मिळत आहेत. मठाधिपती ह.भ.प. भास्करगिरी महाराज, नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख यांनी शनैश्वर देवस्थानच्या कार्यासाठी मोठे बळ दिले
८. ग्रामस्थांच्या श्रद्धांचा खेळ करणार्यांना शनिदेवाच्या वक्रदृष्टीस सामोरे जावे लागणार !
संत, प्रवचनकार आणि कीर्तनकार यांचा सन्मान, असे वारकरी संप्रदायाला अपेक्षित असलेले कार्य मोठ्या श्रद्धेने चालले आहे. हे कार्य अखंडितपणे पुढे चालवण्याचे दायित्व श्रद्धा असणार्या विश्वस्त मंडळालाच पार पाडता येईल, ही भूमीपुत्र असलेले विश्वस्तच निवडले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गावातील भगिनीही देवस्थानच्या घटनेप्रमाणेच विश्वस्त मंडळाची निवड व्हावी, असे स्पष्टपणे मत व्यक्त करतांना दिसू लागल्या आहेत. देवस्थानच्या रूढी-परंपरा आणि श्रद्धा जपण्याचे काम सर्वप्रथम आम्हीच करू, असे म्हणून शिंगणापूरसह पंचक्रोशीतील महिलांनी कंबर कसली आहे. त्यामुळे विश्वस्तपदासाठी अर्ज दाखल करणाच्या महिलांनाही जाणीव होऊन त्याही आत्मचिंतन करू लागल्या आहेत. देवस्थानच्या परंपरेविरोधात जाऊन काय मिळणार ? या विषयावर आत्मप्रवृत्त झालेल्या या महिला देवस्थानची परंपरा जतन करण्यासाठी गावातील सामान्य महिलांच्या हातात हात घालून उभे ठाकण्याचा निर्णय घेऊ लागल्याने त्यांना पुढे करणार्या राजकीय मंडळींचे धाबे दणाणले आहे. आपला बुरखा फाडला जाणार नाही ना !, असे म्हणत हीच मंडळी शनिदेवाला साकडे घालण्यासाठी पुढे येणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महिलांना विश्वस्तपदासाठी अर्ज भरावयास लावण्यामागे कोण आहे ?, याचा शोध घेणे आवश्यक आहे. ग्रामस्थांसह भाविक गावपण, या गावातील रूढी-परंपरा, श्रद्धा टिकून असतांना त्यांचे कौतुक करण्याऐवजी खेळ करण्याची खेळी खेळणार्यांना शनिदेवाच्या वक्रदृष्टीस सामोरे जावे लागणार, हे सांगण्यास कुणा भविष्यवेत्याची आवश्यकता राहिली नाही.
– श्री. मिलिंद सदाशिव चवंडके, पुणे