‘भारताच्या स्वातंत्र्यासाठी परदेशात राहून कार्य करणारे अनेक देशभक्त होऊन गेले आहेत. त्यांच्या परदेशातील या देशकार्याचे फळ त्यांना काय मिळाले ?, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे देशभक्त जिवंत आहेत का ? त्यांचे कुटुंबीय कोण किंवा त्यांच्या स्वदेशप्रेमाच्या अनावर भावनांना लगाम घालत त्यांनी परकीय भूमीवर कसे आयुष्य कंठले ? याची विचारपूस करणे तर दूरच; पण सत्तेवर आलेल्या काँग्रेसने त्यांच्या अस्तित्वाची दखलही घेतली नाही. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी प्रार्णापण करणारे, हालअपेष्टा भोगणारे किंवा कारावासात अनेक काळ घालवलेले सहस्रो ज्ञात-अज्ञात क्रांतीवीर जसे पडद्याआडच राहिले, तसेच काहीसे या परदेशात राहिलेल्या देशभक्तांचे झाले. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, वीरेंद्र चटोपाध्याय अन् लाला हरदयाळ या देशभक्तांना दीर्घकाळ निर्वासित म्हणून परदेशात रहावे लागले ! अशाच देशभक्तांपैकी एक देशभक्त होते बॅरिस्टर सरदारसिंग राणा !
बॅरिस्टर सरदारसिंग रेवाभाई राणा यांचे पूर्वायुष्य आणि अखेरचा काळ यांची माहिती उपलब्ध नाही. लंडन अन् पॅरिस येथे राहून त्यांनी केलेल्या देशकार्याची मिळालेली माहितीही अपूर्णच आहे. तरीही त्या माहितीनुसार त्यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व अनमोल ठरते. स्वातंत्र्यलढ्यातील बॅ. राणा यांच्या योगदानाचे विस्मरण होऊ नये, तसेच क्रांतीकारकांचे आदर्श नवीन पिढीने जपावेत, अभ्यासावेत आणि अनुसरावेत, हाच त्यांचा परिचय करून देण्यामागील हेतू आहे.
मवाळ कामांत न रमणारे राणा !
सौराष्ट्रामधील कंठरिया या गावात १२.४.१८७० या दिवशी एका लहानशा; परंतु प्राचीन संस्थानिकांच्या वंशात सरदारसिंग राणा यांचा जन्म झाला. सन १८९८ मध्ये ‘बॅरिस्टर’च्या अभ्यासासाठी ते लंडन येथे गेले. लंडनमध्ये चालणार्या राजकीय कामात भाग घ्यायच्या ओढीने ते प्रारंभी दादाभाई नौरोजींच्या ‘लंडन इंडीयन सोसायटी’चे आजीव सभासद झाले आणि ‘ब्रिटीश काँग्रेस कमिटी’त काम करू लागले. अर्थात या मवाळ कामामध्ये ते फारसे रमले नसावेत; कारण लंडनमध्येच त्यांचा पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी परिचय झाला आणि श्यामजींच्या राष्ट्रीय जहाल विचारसरणींशी ते पूर्णपणे सहमत नि समरस झाले. १८.२.१९०५ या दिवशी पं. श्यामजींनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली ‘होमरूल सोसायटी’ची स्थापना केली. उपाध्यक्ष म्हणून बॅ. राणा आणि कार्यवाह म्हणून जे.सी. मुखर्जी काम बघू लागले. बॅ. राणा यांनी उघडपणे राजकीय कार्यास आरंभ केला. त्यांचा पॅरिस येथे हिर्यामोत्यांचा व्यवसाय होता.
राष्ट्राभिमान्यांसाठी आर्थिक साहाय्य !
बॅ. राणा यांनी डिसेंबर १९०५ मधील ‘इंडीयन सोशिओलॉजिस्ट’च्या अंकात एक पत्र लिहून पं. वर्मांप्रमाणेच भारतीय विद्यार्थ्यांसाठी राणा प्रतापसिंह अन् छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे प्रत्येकी २ सहस्र रुपयांच्या शिष्यवृत्त्या घोषित केल्या. त्यासाठी ‘ही शिष्यवृत्ती घेऊन परदेशी शिक्षण घेणार्याने भारतात परतल्यावर ब्रिटिशांकित असलेले कोणतेही पद, वतन, अधिकार व चाकरी स्वीकारू नये, तर स्वतंत्रपद निर्माण करावे’, अशा अटी घातल्या. त्या पत्रात त्यांनी प्रांजळपणे असे लिहिले, ‘पूर्वी माझ्या शिक्षणासाठी माझ्या काही भारतीय मित्रांनी आर्थिक साहाय्य दिले होते. आता तसे करण्याची माझी पाळी आल्याने, देशबांधवांपैकी दोघा-तिघांनी तरी स्वतंत्र देशाचा प्रवास करून राजकीय स्वतंत्रतेचा लाभ घेता यावा, यास्तव मी आर्थिक साहाय्य करावे, हे माझे कर्तव्य आहे.’
अर्थात राणाजींची ‘शिवाजी शिष्यवृत्ती’ लोकमान्य टिळक, काळकर्ते परांजपे अन् पं. वर्मा यांच्या अनुग्रहाने विनायक दामोदर सावरकर यांना मिळाली. त्यानुसार जुलै १९०६ मध्ये ते लंडनला बॅरिस्टर होण्यासाठी दाखल झाले. तेथील ‘भारत भवना’मध्ये राहून सावरकरांनी लंडनमधील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची ज्योत चेतवली. ‘अभिनव भारत’ या संस्थेची शाखा स्थापन केली आणि चार वर्षांत लंडनमध्ये स्वातंत्र्यार्थ जे कार्य केले, ते अजोड ठरले. स्वातंत्र्यविरांच्या या कार्याचे निमित्त ठरले, ते बॅ. सरदारसिंग राणा ! या गोष्टींचा राणाजींना सार्थ अभिमान होता.
पॅरिसमधील कार्य
१४.४.१९०६ या दिवशी बंगालमधील विख्यात पुढारी श्री. सुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांनी ‘वंदे मातरम्’ घोषणेवरील बंदी मोडली. यास्तव त्यांना बारीसाल येथे अटक झाल्याचे वृत्त कळताच त्याच्या निषेधार्थ ४.५.१९०६ ला ‘होमरूल सोसायटी’च्या वतीने पं. वर्मा यांनी लंडनमध्ये सार्वजनिक सभा घेतली. पॅरिसमधील सभेद्वारा ब्रिटीश दहपशाहीच्या प्रकट निषेधाचा फ्रान्समध्ये प्रारंभ झाला आणि हा व्याप वाढत वाढत पुढे दहा वर्षांपर्यंत ‘पॅरिस’ हे अभिनव भारताच्या सशस्त्र क्रांतीकारक संघटनेचे मुख्य केंद्र बनले. बॅ. राणा, मॅडम कामा, पं. वर्मा, लाला हरदयाळ आदी अभिनव भारताच्या अग्रगण्य क्रांतीकारक पुढार्यांची ‘पॅरिस’ हीच ‘काशी’ झाली होती.
स्टटगार्ट मधील प्रतिनिधित्व
ऑगस्ट १९०७ मध्ये जर्मनीतील स्टटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजसत्ता मेळाव्यात मॅडम कामा आणि बॅ. राणा हे हिंदी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. तेथेच मॅडम कामा यांनी सभेमध्ये भारतीय तिरंगा फडकवला आणि ब्रिटीश राज्यकर्ते हबकले. अर्थात हा ध्वज तयार करणे अन् तो गुप्तपणे सभेपर्यंत नेणे या सर्व योजनेत स्वातंत्र्यवीर सावरकर, पं. वर्मा, मॅडम कामा, बॅ. राणा, व्ही.व्ही.एस्. अय्यर यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
वृत्तपत्राच्या संपादकांना खडसावणारे राणा !
लंडन आणि पॅरिस येथे क्रांतीकारकांनी चालवलेल्या या स्वातंत्र्यलढ्याचे ब्रिटिशांना भय वाटे. याचा प्रत्यय अनेक वेळा येई. बॅ. राणा अन् त्यांची जर्मन पत्नी यांच्या संदर्भात घडलेली एक घटना अशी. ‘पॅरिस येथील हिंदी लोकांचा एक राजद्रोही गट आहे’, अशी माहिती रंगवून सांगतांना इंग्लडमधील ‘मॉर्निंग पोस्ट’च्या वार्ताहराने त्यात राणा अन् त्यांची पत्नी यांच्यासंबंधी निंदाव्यंजक मजकूर लिहिला. हे वाचताच बॅ. राणा यांनी ‘मॉर्निंग पोस्ट’च्या संपादकांना समज देणारे एक खरमरीत पत्र लिहिले. त्याबरोबर संपादक महाशयांची घाबरगुंडी उडाली आणि त्यांनी राणा दांपत्यांची सपशेल क्षमायाचना केली.
स्वातंत्र्यसमर उत्सव
‘अभिनव भारत’ या क्रांतीकारक संघटनेचे प्रमुख वि.दा. सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली १०.५.१९०८ या दिवशी १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा उत्सव लंडनमधील ‘भारत भवन’मध्ये उत्साहाने आणि थाटात साजरा करण्यात आला. सभागृह गच्च भरून बाहेरही खूप हिंदी मंडळी उभी होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते देशभक्त राणा ! ते मुद्दाम पॅरिसहून आले. त्यांनी अध्यक्षीय समारोपही समयोचित भाषणाने केला. सर्व मंडळी या कार्यक्रमाने भारावून गेली. अनेकांनी देशभक्तीच्या प्रतिज्ञा घेतल्या आणि देशविरांसाठी मदतकोष उभारला. सरदारसिंग राणा यांनी स्वतःचे मे महिन्याचे सर्व उत्पन्न या निधीसाठी दिले.
योगायोग
उल्लेखनीय योगायोग म्हणजे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांचा जन्म १८५७ मध्ये झाला. त्यानंतर तेरा वर्षांनी १८७० मध्ये सरदारसिंग राणा जन्मले आणि त्यानंतर तेरा वर्षांनी १८८३ मध्ये
विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. पुढे राजकोट येथे १२.४.१९५७ या दिवशी बॅ. राणा यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.’
संकलक : सौ. स्वामीनी विक्रम सावरकर, मुंबई (‘प्रज्वलंत’(जानेवारी २००३))’
(दैनिक सनातन प्रभात, श्रावण कृ. पंचमी, कलियुग वर्ष ५१११ (११.८.२००९))