ब्रह्मदेशच्या सीमेवर आधुनिक शस्त्रांनी युक्त सेनेला १६ घंटे (तास) झुंजत ठेवून नेताजी सुभाषचंद्रांना निसटून लांब निघून जाण्याची संधी मिळवून देणार्या कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन् !
१. सिंगापूरमध्ये नेताजी सुभाषचंद्रांच्या भाषणांमुळे प्रभावित होऊन लक्ष्मी ‘आझाद हिंद सेने’कडे आकर्षित होणे, सुभाषबाबूंनी ‘झांशी राणी लक्ष्मी पथक’ स्थापन करणे आणि लक्ष्मींनी त्याचे नेतृत्व स्वीकारणे
‘कॅप्टन लक्ष्मीचा जन्म २४.१०.१९१४ या दिवशी मद्रास येथे झाला. वयाच्या २४ व्या वर्षी १९३८ मध्ये ती एम्.बी.बी.एस्. परीक्षा उत्तीर्ण झाली. सिंगापूरमध्ये तिने नेताजी सुभाषचंद्रांची भाषणे ऐकली आणि ती प्रभावित होऊन ‘आझाद हिंद सेने’कडे आकर्षित झाली.
२२ ऑक्टोबर हा झाशीची राणी लक्ष्मीचा जन्मदिन. १९४३ मध्ये याच दिवशी सुभाषबाबूंनी ‘आझाद हिंद सेने’तच स्त्रियांच्या ‘झांशी राणी लक्ष्मी पथका’ची स्थापना केली. या पथकाचे नेतृत्व लक्ष्मीने स्वीकारले.
२. कॅप्टन लक्ष्मी यांनी वेगवेगळ्या तुकड्या करून प्रत्यक्ष रणांगणावर इंग्रज सेनेशी लढाई करण्यासाठी निघणे
कॅप्टन लक्ष्मी आपल्या वेगवेगळ्या तुकड्या घेऊन प्रत्यक्ष रणांगणावर आपल्या शत्रूशी, अर्थात इंग्रज सेनेशी लढाई करण्यासाठी निघाल्या. खरेतर त्या वेळी त्यांच्याकडे पुरेसा शिधा नव्हता, पुरेसे कपडे नव्हते, दारूगोळा नव्हता. तसेच ज्या भागात जायचे, तो प्रदेश दर्या-खोर्या आणि दाट जंगलाचा होता.
३. हिंदुस्थान आणि म्यानमार (ब्रह्मदेश) यांच्या सीमेवर झालेल्या लढाईत झांशी राणी पथकाने इंग्रजांच्या पुरुषांच्या शूर पथकाला नाक मुठीत धरून शरण यायला भाग पाडणे
भल्या पहाटे मोहिमेवर कूच करण्याचा हुकूम आला. इंग्रज सेना सुमारे १ मैलभर अंतरावर दूर असेल. ती एकदम चाल करून आली. लगेच कॅप्टन लक्ष्मीने प्रत्युत्तर देण्याचा आदेश दिला. झांशी राणी पथकाने इंग्रज सेनेवर प्रतिआक्रमण चढवले, बंदुका गोळ्या ओकायला लागल्या, तोफांतून भयंकर आगगोळे शत्रूवर तुटून पडू लागले. ‘जय हिन्द’, ‘इन्किलाब झिंदाबाद’, ‘आझाद हिन्द झिंदाबाद’ या घोषणांनी इंग्रज पथकाला कापरे भरले. जय घोषणाच्या जोशात तोफांचा मारा चालूच होता. कॅप्टन लक्ष्मी यांची ‘झाशीची राणी’ विजयी झाली. हिंदुस्थान आणि ब्रह्मदेश यांच्या सीमेवर झालेल्या या लढाईत झांशी राणी पथकाने इंग्रजांच्या पुरुषांच्या शूर पथकाला नाक मुठीत धरून शरण यायला भाग पाडले.’
– श्री. निवृत्ती भि. शिरोडकर (‘दैनिक नवप्रभा’, ३.११.१९९९)