क्रांतीकारक गणेश गोपाळ आठल्ये यांच्या आज असलेल्या १०५ व्या स्मृतीदिनानिमित्त…
गणेश गोपाळ आठल्ये उपाख्य अण्णा आठल्ये यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८७९ या दिवशी शिपोशी (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथे झाला. वडिलांच्या सततच्या बदलीच्या नोकरीमुळे शिपोशी, अलिबाग आणि दापोली येथे त्यांचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले; पण हलाखीच्या परिस्थितीमुळे शिकणे कठीण झाले. मुंबईत बदामवाडीत रहात असतांना त्यांचा संपर्क आर्यसंघ या बंगाली क्रांतीकारकांच्या संघटनेशी झाला. त्यांच्यातील शामसुंदर चक्रवर्ती हे अण्णांचे खास मित्र.
त्या वेळी गुप्तपणे काम करणार्या क्रांतीकारकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा असे. त्यामुळे ते कधी अण्णा, डॉ. आठल्ये, अमेरिकन मेस्मोरिस्ट, ओ. अँटले, ए. गणपतराव, तर कधी गणेशपंत आठल्ये अशा अनेक टोपणनावांनी वावरत होते. त्याच काळात गोव्यात झालेल्या राणे बंडाच्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलीस त्यांची चौकशी करत होते. त्यामुळे आठल्ये यांना मुंबईत रहाणे कठीण झाले. त्या वेळी बेंजामिन वॉकर या पारशी गृहस्थाने त्यांना आर्थिक साहाय्य केले. त्यामुळे आठल्ये टोपण नावाने जहाजावरून वॉकर यांच्यासमवेत अमेरिकेला निघून गेले. त्या वेळी त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी झालेली भेट अखेरची ठरली. त्यांचा मुलगा म्हणजेच (कै.) डॉ. विनायक गणेश आठल्ये केवळ दीड वर्षांचे होते.
पुढे अण्णांनी म्हणजेच गणेश आठल्ये यांनी अमेरिका, इंग्लंड, इटली, जर्मनी, फ्रान्स या देशांचा छुप्या पद्धतीने दौरा करून बॉम्ब सिद्ध करण्याची विद्या आत्मसात केली होती. त्यानंतर जर्मनीहून मालवाहू जहाजाने ते कोलकत्याला आले. या दरम्यान त्यांना क्षयरोग झाला. अज्ञातवासात असतांनाच ३२ व्या वर्षी २ सप्टेंबर १९११ ला त्यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार तेथील तत्कालीन महाराष्ट्र मंडळाचे सदस्य आणि नागपूरचे डॉ. हेडगेवार, पुण्याचे डॉ. पळसुले यांच्या हस्ते अण्णांच्या इच्छेनुसार महाराष्ट्रीय व्यक्तीच्या हस्ते अज्ञातपणे त्यांचा अंत्यविधी झाला.
अण्णांच्या कार्याविषयी संशोधन होणे आवश्यक !
शस्त्रास्त्रांच्या जहाल मार्गाने अन्यायी ब्रिटीश राजवटीला हादरवून सोडणार्या या थोर क्रांतीकारकाचे संपूर्ण जीवन आणि कार्यपद्धत गुप्त असल्याने त्याविषयी खोलवर संशोधन होणे आवश्यक आहे. या थोर क्रांतीकारकाचे शिपोशीत स्मारक व्हावे, यासाठी काही वर्षांपूर्वी सरकारदरबारी अनेक प्रयत्न झाले. त्यासाठी संघर्ष करावा लागला होता. अण्णांचे चिरंजीव (कै.) विनायक आठल्ये यांनी त्यांच्या तिन्ही मुलांकडून अण्णांचे स्मारक पूर्णत्वास नेण्याचा शब्द घेतला होता, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. विनायक आठल्ये यांना अण्णांंच्या सुहृदयांकडून त्यांच्याविषयीचा दुर्मिळ असा दस्तऐवज आणि कागदपत्रे मिळाली. शिपोशी ग्रामपंचायत कार्यालयात, तसेच राणी लक्ष्मीबाई सभागृहात अण्णांची प्रतिमा आणि कागदपत्रे लावली आहेत. मुंबईतील भडकमकर मार्गावरील चौकाला क्रांतीवीर जी. अण्णा यांचे नाव दिलेले आहे. शिपोशी येथील न्या. आठल्ये विद्यामंदिरच्या प्रांगणात अण्णांचा पुतळा आहे. “वन्दे मातरम् या जहाल नियतकालिकाचे संपादक शामसुंदर चक्रवर्ती यांनी अण्णांना बंगाली लिपीतील वन्दे मातरम् ही अक्षरे कोरलेली चंदनाची पाटी भेट दिली होती. ती आजही शिपोशी येथे पहावयास मिळते.
(संदर्भ : दैनिक सकाळ, २.९.२०१३)
एक धडाडीचा क्रांतीकारक !
देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीचा मार्ग अवलंबणार्या क्रांतीकारकांपैकी गणेश गोपाळ आठल्ये हे एक होत. हिंदुस्थानातील पहिल्या बॉम्बचा जनक, असा उल्लेख गणेश गोपाळ आठल्ये यांचा करता येऊ शकतो. सेनापती बापट यांच्यापूर्वीच त्यांनी बॉम्ब सिद्ध करण्याची विद्या शिकून घेतली होती. ही विद्या त्यांनी बंगालमधील तत्कालीन जहाल क्रांतीकारकांना शिकवली. खुदीराम बोस यांनी उडवलेला हिंदुस्थानातील पहिला बॉम्ब गणेशपंतांनी सिद्ध केला होता, ही येथे नमूद करण्याची गोष्ट.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात