सारणी
१. एका असामान्य स्वातंत्र्यप्रेमी युवतीने आदिवासींच्या पारंपारिक शस्त्रांच्या साहाय्याने बलाढ्य इंग्रजसेनेशी लढा देणे
२. १८७५ पासून इंग्रज लोकांचा ‘नागालँड’वर कब्जा व अशिक्षित आदिवासींना इंग्रज धर्मोपदेशकांनी आपल्या धर्मात आणण्याचे प्रयत्न करणे
३. गायडिनलूमध्ये गूढ-दैवी शक्ती असल्याची नागालोकांची श्रद्धा
४. ‘जदोनांग’ नावाचा बालक नागांचा पुढारी बनणे
५. जदोनांगने इंग्रज सरकारविरुद्ध जनमत जागृत करणे आणि त्याच्या या कार्यात लहानगी गायडिनलू त्याचा उजवा हात बनणे
६. आदिवासी नागा जमातीचे पूर्वांचलात सार्वभौमत्व राखण्यासाठी जदोनांगने जुलमी इंग्रज राजवटीविरुद्ध युद्ध पुकारणे
७. इंग्रज सरकारने खोटा आरोप ठेवून जदोनांगला २९ ऑगस्ट १९३१ रोजी फाशी देणे
८. गायडिनलूने इंग्रज सरकारच्या जुलमी कृत्याचा बदला घेण्याचा निश्चय करणे
९. गायडिनलूने आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या इंग्रज सेनेला ‘दे माय धरणी ठाय’ करणे, गुप्तसंदेश पोहोचवण्यासाठी एक विशेष ‘लिपी’ सिद्ध करणे आणि इंग्रजांनी तिला पकडून देणार्यास बक्षीस जाहीर करणे
१०. गायडिनलूला अटक करण्यात इंग्रज अधिकार्यास यश
११. आजही इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथील ‘पिट रिव्हर्स म्युझियम’मध्ये गायडिनलूची सांकेतिक लिपी, तसेच तिची वस्त्रे, दागिने आणि जदोनांग व तिची छायाचित्रेदेखील जपून ठेवलेली असणे
१२. मणिपूरच्या इंग्रज सरकारने गायडिनलूला सक्तमजुरीसह जन्मठेपेची शिक्षा दिली
१३. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गायडिनलूूला गौरवाने ‘नागाराणी’ ही उपाधी देणे; मात्र तिची तुरुंगातून मुक्तता न करणे
१४. नागाराणी गायडिनलू १५ वर्षे जुलमी इंग्रजांच्या कारागृहात खितपत असणे आणि स्वातंत्र्यानंतर सुटका केल्यावरही काँग्रेस सरकारने तिला नागालँड सोडून कोठेही जाण्याची मुभा न देणे
१५. परकीय अन जुलमी असलेल्या इंग्रज सरकारच्या विरोधात प्राणपणाने लढा देणार्या नागाराणी गायडिनलूला राष्ट्राच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आत्मसन्मानासाठी स्वकीयांविरुद्धही लढा द्यावा लागणे
१६. स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवदिनी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी नागाराणी गायडिनलूला ताम्रपत्र देऊन तिचा सन्मान करणे
१७. १७ फेबु्रवारी १९९३ रोजी पहाटे पूर्वांचलाच्या सम्राज्ञीने रणझुंजार गायडिनलूने मृत्यूरूपी अंधःकाराला कवटाळले
१. एका असामान्य स्वातंत्र्यप्रेमी युवतीने आदिवासींच्या पारंपारिक शस्त्रांच्या साहाय्याने बलाढ्य इंग्रजसेनेशी लढा देणे
सांकेतिक चिन्हांचे एक विशेष शास्त्र आहे. या शास्त्राचा अभ्यास करतांना अत्यंत तल्लख बुद्धीमत्ता असलेल्यांनादेखील या शास्त्राने वेडे केले आहे. या अशा चित्र-विचित्र चिन्हांचा वापर करून एखादी सांकेतिक भाषा-लिपी तयार करणे, हे येर्यागबाळ्याचे काम नव्हे. आसाममधील मणिपूरच्या निबिड जंगलात रहाणार्या अन् निरक्षर असलेल्या एका १५-१६ वर्षीय आदिवासी युवतीने सांकेतिक भाषा केवळ निर्माणच केली नाही, तर आपल्यासारख्याच निरक्षर अन् स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या आदिवासी सहकार्यांना ही सांकेतिक भाषा शिकवली. त्या आदिवासी युवतीने या सांकेतिक भाषेच्या माध्यमाने आपल्या सहकार्यांशी सदैव संपर्कात राहून त्यांना इंग्रज सत्ताधार्यांविरुद्ध संघटित केले. आदिवासींच्या पारंपारिक शस्त्रांच्या साहाय्याने बलाढ्य इंग्रजसेनेशी लढा दिला आणि त्यांच्या ‘नाकी नऊ आणले.’ या असामान्य स्वातंत्र्यप्रेमी युवतीने राजघराण्यात जन्म घेतला नव्हता किंवा राजाशी विवाह केला नव्हता. तरीही या युवतीला पूर्वांचलातील सर्व जनता प्रेमादराने ‘नागाराणी’ म्हणून संबोधित असे. या युवतीचे नाव होते ‘गायडिनलू’ ! १७ फेबु्रवारी १९९३ या दिवशी तिने देह त्यागला. अशा या ‘नागाराणी गायडिनलू’ची कथा पुढे देत आहोत.
२. १८७५ पासून इंग्रज लोकांचा ‘नागालँड’वर कब्जा व अशिक्षित आदिवासींना इंग्रज धर्मोपदेशकांनी आपल्या धर्मात आणण्याचे प्रयत्न करणे
मणिपूरमधील काही भाग आणि आसामच्या उत्तर काचारचा डोंगराळ भाग, या सर्वांचे मिळून तयार झालेले राज्य म्हणजे सध्याचे ‘नागालँड’ ! शेकडो वर्षांपूर्वी या भागावर आदिवासींचेच अधिपत्य होते. मात्र १८७५ पासून इंग्रज लोकांनी त्या भागावर कब्जा केला. त्याआधी कित्येक वर्षांपासून मुक्त स्वातंत्र्याचा आनंद घेत आपले जीवन जगत असलेल्या या अशिक्षित आदिवासींना इंग्रज धर्मोपदेशक आपल्या धर्मात आणण्याचे प्रयत्न करू लागले. त्यासाठी इंग्रजांनी साम-दाम-दंड-भेद इत्यादींचा वापर सुरू केला. तेथील मूळ रहिवासी असलेल्या झेमई-लियांगमई-राँगमई या प्रमुख आणि इतर उपजातींमधीrल काही आदिवासींनी इंग्रजांच्या दडपशाहीमुळे जरी खिस्ती धर्म स्वीकारला, तरीही बहुतांश आदिवासी या धर्मांतराला तीव्र विरोध करायचे. अशा या दडपशाहीच्या वातावरणात २६ जानेवारी १९१५ रोजी काबुई खेड्यात एका बालिकेचा जन्म झाला. तिच्या माता-पित्यांनी तिचे नाव ‘गायडिनलू’, असे ठेवले.
३. गायडिनलूमध्ये गूढ-दैवी शक्ती असल्याची नागालोकांची श्रद्धा
जंगलाजवळ झोपडीमध्ये रहात असणार्या गायडिनलूचे आई-वडील निरक्षर असल्याने तिला शिक्षणाचा गंध नव्हता; परंतु तिची बुद्धी अत्यंत तल्लख होती. बालपणापासूनच जंगलाचं वारं प्यायलेली गायडिनलू समवयस्क मुलामुलींना बरोबर घेऊन दाट जंगलात निर्भयतेने हिंडत असे. उंच झाडांवर चढणे,नदीत पोहणे, दाट जंगलातील वेलींचा आधार घेत माकडाप्रमाणे एका जागेवरून दुसर्या जागेवर लोंबकळत जाणे, असे धाडसी प्रयोग ती सहजतेने आणि नेहमीच करत असे. तीरकमठा चालविणे, भाल्याने शिकार करणे यामध्ये तिची निपुणता होती. मुलीच्या जन्माला येऊनही एखाद्या तरुण मुलाप्रमाणे तिचा दिनक्रम असायचा. तेथील विविध जमातींपैकी १०-१२ बोलीभाषा तिला अवगत होत्या. समस्त नागालोकांमध्ये श्रद्धा होती की, गायडिनलूमध्ये गूढ-दैवी शक्ती आहे. गायडिनलू अत्यंत स्वाभिमानी आणि कृतनिश्चयी असल्याने कोणत्याही गोष्टीसाठी याचना करणे, तिच्या स्वभावातच नव्हते. जी गोष्ट हवी असेल, त्यासाठी वेळप्रसंगी कोणाशीही सामना करण्याची तिच्यात धमक होती.
४. ‘जदोनांग’ नावाचा बालक नागांचा पुढारी बनणे
१९१४ च्या सुमारास इंग्रज अधिकार्यांनी आपल्या सत्ताबळाच्या जोरावर पुन्हा जबरदस्तीने धर्मांतरण करणे सुरू केले. गरीब आदिवासींवर नवीन कर लावले. त्यांच्याकडून फुकट कामे करवून घेतली. त्यामुळे चिडलेल्या आदिवासींनी तलवार, तीरकमठा, भाला, कुर्हाड या आपल्या परंपरागत शस्त्रांनी इंग्रजांचा प्रतिकार केला; परंतु इंग्रज सेनेच्या बंदुकांसमोर आदिवासींचा निभाव लागेना. आदिवासी नागांमध्ये निराशा पसरली; परंतु त्यांची ही निराशा काही काळच होती; कारण त्या आदिवासी नागांना विश्वास होता, ‘आपला धर्म वाचविण्यास ईश्वराचा अवतार निश्चित होईल.’ सुदैवाने अशिक्षित आणि
श्रद्धाळू आदिवासींना लवकरच त्याचा अनुभव आला. १९०५ साली जन्मलेला ‘जदोनांग’ नावाचा बालक स्वतःतील नेतृत्त्वगुणामुळे नागांचा पुढारी बनला.
५. जदोनांगने इंग्रज सरकारविरुद्ध जनमत जागृत करणे आणि त्याच्या या कार्यात लहानगी गायडिनलू त्याचा उजवा हात बनणे
गायडिनलू ही जदोनांगची नातेवाईक होती. त्यामुळे जदोनांगचे गायडिनलू्च्या घरी जाणे-येणे असायचे. गायडिनलूदेखील जदोनांगला आपला नेता मानत असे. जदोनांगने इंग्रज सरकारविरुद्ध जनमत जागृत करणे चालू केले. त्याच्या या कार्यात लहानगी गायडिनलूदेखील आनंदाने आणि हिमतीने सहभागी व्हायची. थोड्याच दिवसांत गायडिनलू आपल्या कर्तृत्वामुळे जदोनांगचा जणू उजवा हातच झाली होती. गायडिनलूच्या विलक्षण बुद्धीमत्तेची आणि तिच्यातील धाडसी नेतृत्त्वगुणाची पारख असलेल्या जदोनांगला गायडिनलूच्या कार्यक्षमतेबद्दल प्रचंड विश्वास होता.
६. आदिवासी नागा जमातीचे पूर्वांचलात सार्वभौमत्व राखण्यासाठी जदोनांगने जुलमी इंग्रज राजवटीविरुद्ध युद्ध पुकारणे
जदोनांगवर प्रारंभी गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाचा प्रभाव होता. त्यामुळे गांधीजींच्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून जदोनांगने आपल्या आदिवासी जनतेसह इंग्रज अधिकार्यांच्या जुलमी सत्तेविरुद्ध दंड थोपटले. त्यामुळे चिडलेल्या इंग्रज अधिकार्यांनी आदिवासींवरील अत्याचार वाढविले. त्यामुळे निरपराध अन् निरक्षर आदिवासींचे जीवन उध्वस्त होऊ लागले. इंग्रजांच्या क्रूर वागणुकीने निष्पाप आदिवासींचे प्राणही जात होते. शेवटी जदोनांगचा अहिंसा तत्त्वावरील विश्वास पूर्णतः उडाला. जदोनांगने आपल्या सहकार्यांशी सल्ला-मसलत केली आणि जुलमी इंग्रज राजवटीविरुद्ध युद्ध पुकारण्याचे ठरविले. जदोनांगने तत्कालीन ईशान्य भारतातील विखुरलेल्या नागा आदिवासींना एकत्र केले आणि शस्त्रांची जमवाजमवही केली. जदोनांगने संपूर्ण पूर्वांचलात घोषणा केलीr, ‘‘आपल्या संस्कृतीचे, स्वधर्माचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन इंग्रजांचा सर्वशक्तीने प्रतिकार करावा. आपली आदिवासी नागा जमात स्वतंत्र आहे आणि या प्रदेशावरील सार्वभौमत्व हे नागा जमातीचे असल्याने येथे सत्ता चालेल ती फक्त नागांचीच ! येन केन प्रकारे येथून इंग्रजांना पळवून लावायचे आहे.’’
७. इंग्रज सरकारने खोटा आरोप ठेवून जदोनांगला २९ ऑगस्ट १९३१ रोजी फाशी देणे
जदोनांगने जुलमी इंग्रज सत्तेविरुद्ध लढा सुरू केला, तेव्हा तेथील राजकीय नेता जे.सी. हिगिन्स हा होता. त्याने इंग्रजांच्या सैन्यातील ‘आसाम रायफल्स’च्या साहाय्याने मणिपूर आणि आसपासच्या जंगलातील परिसर पिंजून काढला. अखेर बर्याच शोधाशोधीनंतर जे.सी. हिगिन्सला यश मिळाले आणि जदोनांगला पकडण्यात आले. एका व्यापार्याचा खून करून त्याची मालमत्ता जदोनांगने आणि त्याच्या साथीदारांनी लुटल्याचा खोटा आरोप इंग्रज सरकारने ठेवला. खोट्या आरोपाप्रमाणेच खोटा न्यायही देण्यात आला. २९ ऑगस्ट १९३१ रोजी जदोनांगला इंग्रज सरकारने फाशी दिली.
८. गायडिनलूने इंग्रज सरकारच्या जुलमी कृत्याचा बदला घेण्याचा निश्चय करणे
नागा जमातीच्या आराध्य दैवताला मृत्यूदंड देणार्या इंग्रज सरकारविरुद्ध संपूर्ण नागा जमातीत संतापाची आणि निराशेची लाट आली. गायडिनलू मनातून फक्त क्रोधाने धुमसत होती असे नाही, तर इंग्रज सरकारच्या या जुलमी कृत्याचा बदला घेण्याचा तिने मनाशी निश्चय केला. नागा लोकांचा गायडिनलूवर विश्वास होता. जदोनांगच्या पश्चात नेतृत्व करण्यासाठी सर्वांनी गायडिनलूची एकमताने निवड केली. जदोनांगच्या हौतात्म्याला स्मरून १६ वर्षीय गायडिनलूने नागांचे नेतृत्त्व स्वीकारले. गायडिनलूच्या मागे इंग्रज सेनेचा ससेमिरा लागला. गायडिनलू भूमीगत झाली. गायडिनलूने संपूर्ण पूर्वांचलात द्वाही फिरवली, ‘‘इंग्रज सरकारकडे कोणीही कोणत्याही प्रकारचा महसूलकर भरू नये. थोड्याच दिवसांत आपला विजय होणार आहे. त्यामुळे शेतसारा, घरपट्टी नागा सरकारकडे नंतर जमा करा, आताच्या इंग्रज सरकारला देऊ नका. शेतात स्वतःपुरतेच धान्य पिकवा. इंग्रज सरकारला कोणतीही मदत करू नका. याउलट त्यांच्यावर जमतील तेव्हा आणि जमतील तसे हल्ले करा. आपल्या सर्वोच्च नेत्याच्या (जदोनांग) मृत्यूचा बदला घ्या.’’ गायडिनलूच्या या परिणामकारक आणि झंझावाती प्रचारामुळे इंग्रज सरकारला कोणीही घरपट्टी-शेतसारा देईनासे झाले. तिने इंग्रज सरकारच्या विरोधात सशस्त्र लढा देणार्या काही बंगाली क्रांतीकारकांशीही संधान बांधले होते.
९. गायडिनलूने आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या इंग्रज सेनेला ‘दे माय धरणी ठाय’ करणे, गुप्तसंदेश पोहोचवण्यासाठी एक विशेष ‘लिपी’ सिद्ध करणे आणि इंग्रजांनी तिला पकडून देणार्यास बक्षीस जाहीर करणे
गायडिनलूने इंग्रजांशी लढा देतांना छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे गनिमीकाव्याचाही उपयोग केला. गायडिनलू दाट जंगलातून आपल्या साथीदारांसह अचानक इंग्रजांच्या सैन्यावर तुटून पडायची. धाड टाकून शस्त्रांची, सामानाची लुटालूट करून, जाळपोळ करून पसार व्हायची. ब्रिटिश राजवटीच्या विरोधात निरक्षर नागांमध्ये जनजागरण करतांना नागांच्या पारंपारिक नृत्याचा उपयोग करून त्यातील गाण्यातील शब्दांच्या माध्यमातून आपला संदेश ती नागा जनतेला देत असे. गायडिनलू स्वतः निरक्षर असूनही आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर एका विशेष ‘लिपी’ची तिने निर्मिती केली. ही लिपी तिने आपल्या सहकार्यांनाही शिकविली. दूर-दूर विखुरलेल्या आपल्या सहकार्यांशी या विशेष लिपीच्या माध्यमातून ती संपर्कात असायची. संदेशांची देवाण-घेवाण करायची. जसे औरंगजेबाला संताजी व धनाजी या मराठा सरदारांनी जेरीस आणले होते, तसे आपल्या विश्वासू सहकार्यांच्या साहाय्याने गायडिनलूने इंग्रजांच्या बलाढ्य आणि तत्कालीन आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या सेनेला ‘दे माय धरणी ठाय’ केले. इंग्रज सरकार गायडिनलूच्या गनिमीकाव्यासमोर हतबल ठरत होते. त्यामुळे चिडलेल्या इंग्रज अधिकार्यांनी जंगलातील नागा वस्तींवर हल्ले करून निरपराध नागा महिलांवर-मुलींवर बलात्कार करणे, मुलांचे-पुरुषांचे हात-पाय तोडणे, असे अत्याचार सुरू केले. नागा लोकांची देवळे फोडली. एवढेच नव्हे, तर ठिकठिकाणच्या वस्त्यांमध्ये, गावांमध्ये जाऊन तेथे ‘गायडिनलू’ नाव असलेल्या सर्व स्त्रियांना जबरदस्तीने तुरुंगात टाकले. गायडिनलूचा ठावठिकाणा सांगणार्याला ५०० रुपयांचे बक्षीस इंग्रज सरकारने जाहीर करूनही कोणी गायडिनलूबद्दल माहिती देण्यास पुढे येईना. शेवटी सरकारने जाहीर केले, ‘गायडिनलूचा ठावठिकाण सांगणार्याला बक्षीस देऊन त्या संपूर्ण गावाचा १० वर्षांचा सर्व महसूल माफ करण्यात येईल’; परंतु इंग्रज सरकारचे हे आमिषदेखील निरुपयोगी ठरले.
१०. गायडिनलूला अटक करण्यात इंग्रज अधिकार्यास यश
गायडिनलू आणि तिचा सहकारी यांच्याजवळ परंपरागत शस्त्रांचा भरपूर साठा होता; परंतु शस्त्र चालवण्यात वाकबगार असलेली माणसे कमी होती. पिस्तूल, रायफल ही शस्त्रे तर तिच्याजवळ नव्हतीच. त्यामुळे असमान शस्त्रबळावर आणि तुटपुंज्या संख्याबळावर ब्रिटीश सरकारशी गायडिनलूचा लढा जास्त दिवस चालणार नाही, याची जाणीव त्या दोघांनाही होतीच. गायडिनलू तग धरून होती, ते केवळ गनिमीकाव्यावर ! इंग्रज सेनेचा अधिकारी मॅकडोनाल्ड याने जंगलाची सर्व बाजूंनी नाकेबंदी करणे चालू केले. तेथे सैनिकबळ वाढविले आणि जंगलाच्या सर्व बाजूंच्या गावांना घेरल्यामुळे नागांच्या हालचालींवर आपोआपच नियंत्रण आले. गायडिनलूचा गावकर्यांशी संपर्क तुटला. अखेर नागा टेकड्यांतील पुलोमी खेड्यात १७ ऑक्टोबर १९३२ रोजी गायडिनलूला अटक करण्यात मॅकडोनाल्डला यश मिळाले.
११. आजही इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथील ‘पिट रिव्हर्स म्युझियम’मध्ये गायडिनलूची सांकेतिक लिपी, तसेच तिची वस्त्रे, दागिने आणि जदोनांग व तिची छायाचित्रेदेखील जपून ठेवलेली असणे
केवळ १७ वर्षांची असलेली रणझुंजार गायडिनलू पकडल्या गेल्याने हर्षभरीत झालेल्या कॅप्टन मॅकडोनाल्डने गायडिनलूच्या हाता-पायांमध्ये साखळदंड व बेड्या घातल्या. प्रथम तिला कोहिमाला नेले आणि त्यानंतर इंफाळला ठेवले. १७ ऑक्टोबरला गायडिनलूला जेव्हा जेरबंद करण्यात आले, तेव्हा तिच्याजवळ सांकेतिक चिन्ह आणि त्यांचे अर्थबोध करणार्या स्पष्टीकरणाच्या १०-१२ चोपड्या एका लाकडी खोक्यामध्ये ठेवलेल्या आढळल्या. कॅप्टन मॅकडोनाल्डने तो खोका जप्त केला; परंतु त्याला चोपड्यांच्या महत्त्वाविषयी कल्पना नव्हती. या लाकडी खोक्याशिवाय गायडिनलूच्या रोजच्या वापरातील वस्तू, म्हणजे पारंपारिक आदिवासींचे दागिने तसेच जदोनांगची व तिची छायाचित्रे इत्यादी सर्व जप्त करण्यात आले. या सर्व वस्तू आणि तिच्या महत्त्वाच्या चोपड्या तत्कालीन मणिपूरचे उपायुक्त जे.पी. मिल्स याने आपल्याजवळ ठेवून घेतल्या. त्या चोपड्यांमधील सांकेतिक लिपीचे इंग्लंडमध्ये संशोधन केले असता लक्षात आले की, आपल्या सहकार्यांशी संपर्क साधण्यासाठी, संदेशाची देवाण-घेवाण करण्यासाठी ही भाषा-लिपी वापरली जायची. निरक्षर असूनही या प्रकारे स्वतंत्र आणि नवीन अशी भाषा-लिपी तयार करण्याच्या या प्रकाराचे इंग्रजांनाच काय कोणालाही अचंबा वाटत होता. आजही इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथील ‘पिट रिव्हर्स म्युझियम’मध्ये गायडिनलूच्या चोपड्या तसेच तिचे दागिने, वस्त्रे आणि जदोनांग व तिची छायाचित्रेदेखील जपून ठेवलेली आहेत.
१२. मणिपूरच्या इंग्रज सरकारने गायडिनलूला सक्तमजुरीसह जन्मठेपेची शिक्षा दिली
गायडिनलूवर इंग्रज सरकारने राजद्रोहाचा खटला भरला. निकाल काय लागणार याची जाणीव गायडिनलूला होतीच. तिला दुःख होते, ते जदोनांगच्या मृत्यूचा बदला घेता न आल्याचे आणि आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त न करता आल्याबद्दल ! मणिपूरच्या इंग्रज सरकारने तिला सक्तमजुरीसह जन्मठेपेची शिक्षा दिली. १९३२ पासून तिचा सक्तमजुरीसह जन्मठेपेस प्रारंभ झाला. ती मणिपूर संस्थानच्या मध्यवर्ती करागृहात होती. इंग्रज सरकारला सदैव भीती वाटत होती की, गायडिनलूला तुरुंगातून सोडविण्याचे प्रयत्न तिचे उर्वरित साथीदार निश्चितपणे करतील. त्यामुळे गायडिनलूला सारखे एका तुरुंगातून दुसर्या तुरुंगात ठेवले जायचे. गायडिनलूला इंग्रजांनी पकडल्यानंतर तिच्या जागी नागांचे नेतृत्व करणारा सेनापती ‘हायदुआ’ला इंग्रजांशी लढता लढता १९३४ च्या मेमध्ये वीरगती प्राप्त झाली. त्यानंतर नागांचे नेतृत्व केले सेनापती ‘दिकेऊ’ याने. यानेसुद्धा जवळपास ६ वर्षांपर्यंत इंग्रजांशी लढा दिला. अखेर १९४० मध्ये त्याला इंग्रजांनी फितुरीने पकडले आणि फाशी दिली.
१३. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गायडिनलूूला गौरवाने ‘नागाराणी’ ही उपाधी देणे; मात्र तिची तुरुंगातून मुक्तता न करणे
१९३७ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू पूर्वांचलात दौर्यावर आले होते. त्या वेळी त्यांना जनतेने निवेदन दिले की, शिलाँगच्या कारागृहात बंदिस्त असलेल्या गायडिनलूच्या सुटकेसाठी त्यांनी विशेष प्रयत्न करावे. त्या वेळी नेहरूंनी गायडिनलूची तुरुंगात जाऊन भेट घेतली. तिच्या कार्याबद्दल गौरव करून तिला ‘नागाराणी’ ही उपाधी दिली. यामुळे नागा जनतेला आशा वाटली की, नेहरू काँग्रेस लवकरच गायडिनलूची तुरुंगातून सुटका करेल; कारण त्याच सुमारास हिंदुस्थानातील ७ प्रांतांमध्ये काँग्रेसचीच मंत्रिमंडळे सत्तेवर होती.
१४. नागाराणी गायडिनलू १५ वर्षे जुलमी इंग्रजांच्या कारागृहात खितपत असणे आणि स्वातंत्र्यानंतर सुटका केल्यावरही काँग्रेस सरकारने तिला नागालँड सोडून कोठेही जाण्याची मुभा न देणे
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसात्मक मार्गाने लढा देणार्यांना इंग्रज सरकारने तुरुंगात टाकले होते. त्या सर्वांची मुक्तता करण्याचे सत्तारूढ काँग्रेसने ठरविले आणि त्यानुसार सर्वांची मुक्तता झाली; परंतु ज्यांचा सशस्त्र क्रांतीवर विश्वास होता आणि ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या पारतंत्र्याच्या विरोधात इंग्रजांशी सशस्त्र लढा दिला, त्यांना मात्र काँग्रेस सरकारने तुरुंगातून मुक्त केले नाही. त्यामुळे नागाराणी गायडिनलूची तेव्हा सुटका झाली नाही, ती सुटका झाली भारताच्या स्वातंत्र्यादिनी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी ! नागाराणी गायडिनलू १५ वर्षे जुलमी इंग्रजांच्या कारागृहात खितपत होती. नागाराणी गायडिनलूची तुरुंगातून सुटका जरी झाली, तरीही तिला नागालँड सोडून इतरत्र कोठेही जाता येणार नाही, असे बंधन भारत सरकारने
घातले होते. एक प्रकारे ही स्थानबद्धताच होती. एकीकडे ‘नागाराणी’ म्हणून सन्मान करायचा अन त्याच वेळी कृती मात्र बंधनात ठेवण्याची पारतंत्र्याची करायची !
वा रे काँग्रेस तेरा खेल ।
‘नागाराणी’ को दिया नागालँड जेल ।।
१५. परकीय अन जुलमी असलेल्या इंग्रज सरकारच्या विरोधात प्राणपणाने लढा देणार्या नागाराणी गायडिनलूला राष्ट्राच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आत्मसन्मानासाठी स्वकीयांविरुद्धही लढा द्यावा लागणे
नागाराणी गायडिनलूने तुरुंगातून मुक्त होताच स्वतःला समाजसेवेत गुंतवून घेतले. खिस्ती धर्मोपदेशकांनी आरंभिलेल्या धर्मांतराच्या वादळाचा सामना करण्यासाठी तिने ‘हराका’ या नावाने एक पंथ स्थापन केला. या पंथाच्या माध्यमातून आपल्या पुरातन संस्कृतीचे महत्त्व सर्वांना सांगण्याचा तिचा उद्देश होता. हजारो नागांनी या पंथाची दीक्षा घेतली; परंतु काही स्वार्थी आणि धर्मांतरित झालेल्या लोकांनी तिच्या या कृतीला विरोध केला. त्यांनी तिच्यावर प्राणघातक हल्ले केले. स्वतःच्या रक्षणासाठी तिने स्वतंत्र १००० सैनिकांची एक संघटना निर्माण केली. त्यानंतर ती सदैव भूमीगत राहूनच आपल्या संघटनेचे आणि पंथाचे कार्य करायची. अखेर १९५६ च्या सुमारास भारत सरकानेही तिच्यावरील स्थानबद्धतेचा (?) आदेश मागे घेतला. परकीय अन जुलमी असलेल्या इंग्रज सरकारच्या विरोधात प्राणपणाने लढा देणार्या नागाराणी गायडिनलूला राष्ट्राच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आत्मसन्मानासाठी स्वकियांविरुद्धही लढा द्यावा लागला. याचे तिला अत्यंत क्लेश झाले.
१६. स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवदिनी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी नागाराणी गायडिनलूला ताम्रपत्र देऊन तिचा सन्मान करणे
१९७२ मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा झाला. या विशेष प्रसंगी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी राणी गायडिनलूला या विशेष सोहळ्यास उपस्थित रहाण्यासाठी अगत्याने निमंत्रण दिले आणि त्या कार्यक्रमात नागाराणी गायडिनलूला ताम्रपत्र देऊन सन्मान केला. अशा तर्हेने आजपर्यंत झालेल्या चुकीचे परिमार्जन केले. (हेही नसे थोडके !)
१७. १७ फेबु्रवारी १९९३ रोजी पहाटे पूर्वांचलाच्या सम्राज्ञीने रणझुंजार गायडिनलूने मृत्यूरूपी अंधःकाराला कवटाळले
नागाराणी गायडिनलूने आयुष्यभरअखंड हिंदुस्थानचे स्वप्न पाहिले होते; परंतु दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाही. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्यांनी आपल्या स्वार्थासाठी तत्त्वांचा बाजारच मांडला होता. त्यामुळे या सत्ताप्राप्तीच्या गलिच्छ राजकारणात नागाराणी गायडिनलू कदापीही सहभागी झाली नाही. नागाराणी गायडिनलूने वयाची ७७ वर्षे पूर्ण केली. आपल्या मातृभूमीला परकियांच्या, पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्याचे व्रत तिने केवळ वयाच्या १४ व्या वर्षीच स्वीकारले आणि ते ध्येय साध्य होईपर्यंत तिने खडतर हाल-अपेष्टा सहन केल्या. त्या नागाराणी गायडिनलूचे वास्तव्य होते स्वतंत्र भारताच्या पूर्वदिशेला असलेल्या ‘पूर्वांचलात’ ! जेथे सूर्याची तेजस्वी किरणे सर्वप्रथम येतात आणि त्यानंतरच उर्वरित भारतात ती निसर्गनियमानुसार पसरतात. १७ फेबु्रवारी १९९३ रोजी पहाटे सूर्योदय झाला; परंतु त्या दिवशी समस्त भारतियांच्या हृदयात केवळ अंधारच दाटला होता; कारण त्या दिवशी पूर्वांचलाच्या सम्राज्ञीने, रणझुंजार गायडिनलूने मृत्यूरूपी अंधःकाराला कवटाळले होते. एक धगधगती ज्वाला अखेर शांत झाली ! आजदेखील पूर्वांचलात २६ जानेवारी या दिवशी नागाराणी गायडिनलूचा जन्मदिवस उत्साहाने साजरा केला जातो. तसेच १७ फेबु्रवारी या दिवशी समस्त जनता कृतज्ञतेने नागाराणी गायडिनलूचे स्मरण करून श्रद्धांजली अर्पण करते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात