सारणी
१. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा संगम; राणी तपस्विनी
२. इंग्रजांविरुद्धचा छुपा लढा
३. इंग्रजांविरुद्ध उठाव करण्यास सैनिकांचे प्रबोधन करणे
४. उठावाचे गुप्त कार्य
५. राणी तपस्विनी वृद्धावस्थेने थकल्या असूनही त्यांनी वंगभंग चळवळीत भाग घेणे
१. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा संगम; राणी तपस्विनी
राणी तपस्विनी ही झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची भाची आणि झाशीचे सरदार नारायणराव यांची कन्या. बालपणीच ती विधवा झाली. तिचे मूळ नाव सुनंदा. या विरक्त बालविधवेचा दिनक्रम पूजापाठ, धार्मिक ग्रंथांचे वाचन, देवीची उपासना असा होता. जणू ती संन्यासिनीच बनली. ऐहिक जीवनात तिला रस नव्हता. तरीही तिच्या धार्मिक वृत्तीमुळे आणि वैराग्यामुळे ती प्रजेच्या आधाराचे स्थान बनली. गोरा रंग, तेजस्वी चेहर्याची ती शक्ति-उपासकच होती. सदैव चंडीमातेचा जप ती करीत असे. साहस आणि धैर्य या गुणांची ती प्रतिमूर्तीच होती. राणी लक्ष्मीबाईप्रमाणेच ती घोडेस्वारी, शस्त्रचालन यांचा अभ्यास करीत असे. निराशा तिला माहीतच नव्हती. वडिलांच्या मृत्यूनंतर ती त्यांच्या जहागिरीचा कारभार उत्तमपणे बघू लागली. तिने वडिलांचा किल्ला दुरुस्त करून भक्कम बनवला. नवीन सैनिकांची भरती केली आणि त्यांचे सैनिकी शिक्षण चालू केले.
२. इंग्रजांविरुद्धचा छुपा लढा
इंग्रजांविषयी तिच्या मनात भयंकर तिरस्कार होता. तो ती अधूनमधून बोलण्यातून प्रकटही करीत असे. इंग्रजांना तिच्या कार्याची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी तिला विनाचौकशी नजरकैदेत ठेवले. तिची संन्यस्त वृत्ती पाहून इंग्रज अधिकार्यांना वाटले की, ही स्त्री आपल्याला धोकादायक नाही. म्हणून त्यांनी तिला नजरकैदेतून मुक्त केले. त्यानंतर ती नैमिषारण्यात राहून चंडीमातेची उपासना अन् साधना करू लागली. इंग्रजांना वाटले ती तर संन्यासिनीच झाली. म्हणून ते तिच्याविषयी निश्चिंत झाले. नैमिषारण्यात लोक नेहमी तिच्या दर्शनास जात असत. ती त्या लोकांना उपदेश करीत असे आणि चंडीमातेची उपासना करायला सांगत असे. तेव्हापासून लोक तिला ‘माता तपस्विनी’ असे म्हणू लागले.
३. इंग्रजांविरुद्ध उठाव करण्यास सैनिकांचे प्रबोधन करणे
राणी तपस्विनीच्या नैमिषारण्यातील आश्रमात आशीर्वाद घेण्यासाठी सतत लोक येत. ती त्यांना उपदेश करीत असे. विश्वासू भक्तांना आणि इंग्रजांच्या छावण्यांतील देशी सैनिकांना इंग्रज शासनाविरुद्ध उठाव करण्यासाठी तिने प्रवृत्त केले. १८५७ च्या प्रारंभापासून हे ‘साधू आणि फकीर’ छावण्यांमधून हिंडू लागले. ते सैनिकांना सांगायचे, ‘इंग्रज लोक तुम्हाला हीन लेखतात. ‘काला निगर’ म्हणून तुमचा अपमान करतात. लुटारू इंग्रजांनी आपल्या देशाला कंगाल बनवले. ते तुम्हाला थोडा आणि गोर्या सैनिकांना मात्र भरपूर पगार देतात. तुमचा आणि गोर्या सैनिकांचा पगार देशाच्या उत्पन्नातूनच दिला जातो. त्यांच्या हुकूमानेच तुम्ही आपली राज्ये बुडवण्यास त्यांना साहाय्य केले. हे कसे तुमच्या लक्षात येत नाही ? बहुतेक छावण्यांतील आपले सैनिक उठाव करण्यास सिद्ध झाले आहेत. इंग्रजांनी आपला देश हडप केला आहे. ते आता आपला धर्म बुडवून आपल्याला ईसाई बनवण्याच्या उद्योगास लागले आहेत. तुम्हाला ईसाई होणे मान्य आहे का ? म्हणून जागे व्हा. उठाव करण्यास सज्ज व्हा.’’ अर्थात हे सारे राणी तपस्विनीनेच या साधू-फकिरांना शिकवले होते.
४. उठावाचे गुप्त कार्य
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध चालू व्हायच्या आधी नानासाहेब, बाळासाहेब, तात्या टोपे आणि अजीमुल्ला खाँ, राणी तपस्वीनीच्या दर्शनासाठी येऊन गेले. त्यांची उठावाविषयी चर्चा झाली. अजीमुल्ला खाँने छावण्यातून उठावाची निशाणी म्हणून लाल कमळ प्रत्येक छावणीत साधू-फकिरांकरवी पाठवण्यास सुचवले. एखादे मोठे संकट येणार आहे, सैन्य येणार आहे, लढाई होणार आहे, याची सूचना गावागावांतून देण्यासाठी गावोगाव चपात्या पाठवण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत होती. चपात्या पाठवून जनतेला उठावासाठी सिद्ध रहाण्याचा संदेश देण्याचेही ठरले. त्याचप्रमाणे साधू, फकीर गावागावांतून हिंडू लागले. हे कार्य इतक्या गुप्तपणे चालले होते की, एकाही इंग्रज अधिकार्याला ते समजू शकले नाही. ठरल्याप्रमाणे निश्चित तारखेआधीच उठाव झाला. राणी तपस्वीनीच्या प्रभावाने गावोगावचे लोक उठावात सामील झाले. इंग्रजांच्या आधुनिक शस्त्रांमुळे आणि देशाचा खजिना त्यांच्याच ताब्यात असल्यामुळे त्यांनी हा उठाव दडपून टाकला आणि जनतेवर आपल्या क्रौर्याने मोठी दहशत बसवली. राणी तेजस्वीनीच्या लक्षात येऊन चुकले की, इंग्रजांशी युद्ध केल्याने काहीच लाभ होणार नाही. आपल्या देशातील राजे रजवाड्यांनी इंग्रजांपुढे लाचारी आणि धन लोभाने फितुरी केल्यामुळे युद्ध करून यश मिळवणे कठीण आहे. ती नानासाहेबांबरोबर नेपाळात गेली. नेपाळचा राजा जंगबहाद्दुर हा इंग्रजांचा मित्र होता. नेपाळातही तिने प्रवचनांतून स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. त्या लाचार राजाच्या राज्यात रहाणे तिला आवडले नाही. तेथून ती दरभंग्याला आणि तेथून कोलकात्याला गेली.
५. राणी तपस्विनी वृद्धावस्थेने थकल्या असूनही त्यांनी वंगभंग चळवळीत भाग घेणे
राणीने कोलकात्यात ‘महाभक्ती पाठशाळा’ चालू केली. लोकमान्य टिळक यांनी तेथे राणी तपस्वीनींची भेट घेतली. त्यांच्यासमवेत ‘केसरी’चे उपसंपादक खाडीलकर हेही होते. खाडीलकर यांना नेपाळात शस्त्रांचा कारखाना गुप्तरीतीने चालू करायचा होता. नेपाळचे सेनापती समशेरजंग यांच्याशी राणीचा परिचय होता. राणीच्या ओळखीमुळे नेपाळात वरकरणी टाईल्स बनवण्याचा कारखाना आणि त्याच्याबरोबर तिथे शस्त्रनिर्मितीही चालू झाली. ती शस्त्रे बंगालकडे पाठवण्यात येत असत. फितुरीमुळे खाडीलकर पकडले गेले. मोठ्या शिताफीने त्यांनी त्यांची सुटका करवून घेतली आणि ते महाराष्ट्रात परतले. आपल्याच लोकांकडून क्रांतीचे प्रयत्न विफल केले जात, हे तिला आवडले नाही. हा आपल्या देशाला परमेश्वराचा शापच आहे, असे समजून त्या खिन्न झाल्या. राणी तपस्विनी वृद्धावस्थेने थकल्या होत्या. त्यांचे मनही उदास झाले होते. तरीही त्यांनी वंगभंग चळवळीत भाग घेतला. अखेर भारताची ही महान विदुषी आणि क्रांतीकारिणी खिस्ताब्द १९०५ मध्ये कोलकात्यात निधन पावली. महाराष्ट्राच्या या महान कन्येचा महाराष्ट्रालाच विसर पडावा, याचाच मनाला खेद वाटतो. त्यांच्या जीवनाविषयी संशोधन करायची आवश्यकता आहे.’
(संदर्भ : महान भारतीय क्रांतीकारक, प्रथम पर्व १७७० ते १९००, लेखक : श्री. स.ध. झांबरे, (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई)) (दैनिक सनातन प्रभात, ज्येष्ठ अमावास्या, कलियुग वर्ष ५११२ (११.७.२०१०))