Menu Close

सेनापती तात्या टोपे म्हणजे रणांगणावरील आदर्श नेतृत्व !

tatya_tope
सेनापती तात्या टोपे

१. तात्या टोपे म्हणजे रणांगणावरील आदर्श नेतृत्व !

१८५७ च्या स्वातंत्र्यसमराचे मर्म जाणून घ्यायचे असेल, तर तात्या टोपे यांच्या चरित्रातील एका पैलूकडे आपण सूक्ष्म दृष्टीने बघितले पाहिजे. हे स्वातंत्र्यसमर आपण हरल्यानंतर पुढचे दहा मास तात्या टोपे वृकयुद्धपद्धतीने म्हणजे गनिमी काव्याने हुलकावण्या देत आणि अचानक धाडी टाकून ब्रिटीश सैन्यास सळो कि पळो करून सोडत होते. काही वेळा ते शत्रूच्या मार्‍यात येत आणि त्यांच्या सैन्याची दाणादाण उडे. तात्या तेथून निसटत आणि दुसर्‍या ठिकाणी जाऊन नवे सैन्य उभे करत. तात्या टोपे हवे तेव्हा आणि हव्या त्या ठिकाणी नवे सैन्य उभे करू शकत असत, लोकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध इतका असंतोष साचला होता आणि त्यांना मुक्तीचा इतका ध्यास लागला होता की, मारत मारत मरण स्वीकारणार्‍या वृत्तीची माणसे सहज उभी करता येत. हेही तेवढेच खरे आहे की, लोकांचा तात्यांच्या रणधुरंधरपणावर विश्‍वास होता. हा माणूस दम न तोडता शेवटपर्यंत शक्ती-युक्ती एकवटून लढत राहील, हे निश्‍चितपणे लोकांना ज्ञात होते. तात्या टोपे म्हणजे रणांगणावरील आदर्श नेतृत्व ! – श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

२. क्षणाचे पराजित आणि अनंत काळाचे अपराजित तात्या टोपे !

तात्या टोपे क्षणाचे पराजित आणि अनंत काळाचे अपराजित होते ! ते तेव्हाचे बंडखोर आणि आजचे स्वातंत्र्यवीर होते ! ते तेव्हाचे अपराधी; पण आजचे अधिदेव होते ! सत्ताधारी इंग्रजांचा पराजय झाला होता आणि सेनापती तात्यांचा जय झाला होता ! तात्या टोपे यांचे स्वप्न आज अखेर साकार झाले होते ! पूर्णांशाने नव्हे, तरी बव्हंशाने ! सेनापती तात्याराव सावरकर तात्या टोपे यांच्या आत्म्यास आवाहन करून विनवत होते, आपण अद्यापी या अवकाशात कोठे अस्वस्थ असाल, तर शांत व्हा, शांत व्हा ! तुम्ही पराजित नव्हे, तर विजेते आहात ! अपराधी नव्हे, तर अवतारी आहात ! – पु.भा. भावे (स्वातंत्र्यवीर, दिवाळी विशेषांक २००८)

३. दुसरा शिवाजी अशी ओळख निर्माण करणारे तात्या टोपे !

१८५७ च्या युद्धात तात्या टोपे हे एकमेव सेनापती असते आणि ठरलेल्या दिवशी उठाव झाला असता, तर भारताला दीडशे वर्षांपूर्वीच स्वातंत्र्य मिळाले असते. लंडन टाईम्ससारख्या शत्रूराष्ट्राच्या वृत्तपत्रानेही तात्यांचे चातुर्य आणि कल्पकता यांचे कौतुक केले होते. त्या वेळी ब्रिटिश वृत्तपत्रे दुसरा शिवाजी, असा त्यांचा नामोल्लेख करत होती. – डॉ. सच्चिदानंद शेवडे, डोंबिवली (वाचा आणि गप्प बसा दैनिक तरुण भारत, बेळगाव आवृत्ती, १९.६.२००८)

तात्या टोपे यांच्यासारख्या क्रांतीकारकाच्या अर्धपुतळ्याचीदुरवस्था : तात्या टोपे यांचे जन्मस्थान येवला. तेथे त्यांचे छोटेखानी स्मारक आणि अर्धपुतळा आहे; पण स्मारकाचा उपयोग कुत्र्यांना बसण्यापुरता केला जातो. सभोवताली कचर्‍याचे साम्राज्य. या सर्वांतून पुढे जाऊन मी या पुतळ्याला वंदन करून आलो.

– डॉ. सच्चिदानंद शेवडे (श्रीगजानन आशिष, जानेवारी २०११)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

१८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील भारतियांचे सरसेनापती तात्या टोपे यांची पुण्यतिथी साजरी न करणारी नाशिक महानगरपालिका !

ख्रिस्ताब्द १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील सेनापती तात्या टोपे यांची पुण्यतिथी नाशिक जिल्ह्यातील त्यांच्या येवला या जन्मगावी २३ एप्रिल २०१० या दिवशी राष्ट्रभक्तांनी उत्साहाने साजरी केली. नाशिक महानगरपालिकेस मात्र तात्या टोपे यांच्या पुण्यतिथीचा विसर पडला होता. भारतीय विद्यार्थी सेनेने पूर्वकल्पना देऊनही महानगरपालिकेने तात्या टोपे यांच्या पुतळ्यास रोषणाई करणे वा त्यांचे पूजन करणे, असे काहीच केले नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात