‘सती सावित्रीची कथा महाभारतात आली आहे. पांडव वनवासात असतांना जयंद्रथाने द्रौपदीचे हरण केले. जयंद्रथाचा पराभव करून परतलेले युधिष्ठिरादी पांडव आणि द्रौपदी ऋषीमुनींसह बसले असतांना मार्कंडेयऋषींनी सावित्रीची कथा सांगितली. प्रातःस्मरणीय अशा पंचकन्यांंमध्ये जिचा समावेश आहे, अशा द्रौपदीला मुख्यत्वेकरून ही कथा सांगण्यात आली. त्यावरूनही सावित्रीचे महत्त्व लक्षात येते.
१. सावित्री वरसंशोधनासाठी बाहेर पडणे
तपस्व्यांप्रमाणे निरागस अंतःकरण, देवांगनेसारखे लोभस लावण्य आणि राजसभेतील श्रेष्ठ संस्काराने उत्पन्न झालेली ऋजुता यांचा त्रिवेणी संगम असलेले सावित्रीचे सुमधुर व्यक्तिमत्त्व महर्षींच्याही आदराला पात्र होणे आणि यौवनात पदार्पण केल्यावर वडिलांची आज्ञा मान्य करून सावित्री वरसंशोधनासाठी बाहेर पडणे
जन्मतःच भाग्यशाली असणार्या मुलांच्या वाट्याला जे वातावरण येते, तेच राजकन्या सावित्रीच्या वाट्याला आले होते. भद्र देशाच्या महापराक्रमी राजाची ती एकुलती एक कन्या होती. सावित्रीच्या मंत्राने हवन केल्यामुळे सावित्रीदेवीने प्रसन्न होऊन ही सुंदर कन्या राजाला दिली; म्हणून तिचे नाव ‘सावित्री’ ठेवण्यात आले. सावित्रीचे वडील अश्वपती हे पराक्रमी, धर्मनिष्ठ, प्रजाहिततत्पर आणि भारतीय राजधर्माचा आदर्श म्हणून विख्यात होते. स्त्री-जीवनाला आवश्यक असे संस्कार तर तिच्यावर झालेच होते; पण राजाची एकुलती एक कन्या असल्यामुळे क्षत्रियोचित आणि राजपुत्राला योग्य अशा सर्व विद्या अन् कला यांतही ती निष्णात झाली होती. तपस्व्यांप्रमाणे निरागस अंतःकरण, देवांगनेसारखे लोभस लावण्य आणि राजसभेतील श्रेष्ठ संस्काराने उत्पन्न झालेली ऋजुता यांचा त्रिवेणी संगम असलेले तिचे सुमधुर व्यक्तिमत्त्व महर्षींच्याही आदराला पात्र झाले होते. सावित्रीने आपल्या बाल्याचा उंबरठा ओलांडून यौवनात पदार्पण केल्यावर तिच्या पित्याने तिला स्वतःचा पती निवडण्याची अनुमती दिली आणि आपल्या मंत्र्यांना सैन्यासह तिच्यासमवेत जायची आज्ञा केली. मोठ्या संकोचाने वडिलांची आज्ञा मान्य करून सावित्री वरसंशोधनासाठी बाहेर पडली.
२. सत्यवानाची निवड
एके दिवशी देवर्षी नारद राजा अश्वपतीच्या राजसभेत आले. राजाने त्यांचा सन्मान केला. ते दोघे परस्परांशी संवाद करत असतांनाच सावित्री परत आली. सभेत येताच तिने आपल्या पित्याला आणि नारदांना वंदन केले. नारदांनी तिच्याकडे एकवार दृष्टीक्षेप टाकून राजाला विचारले, ‘‘या कन्येचा विवाह अजून झाला नाही असे दिसते, याचे कारण काय ?’’ ‘‘तिला वरसंशोधनासाठी पाठवले होते’’, असे राजाने नारदांना सांगितले आणि मधल्या काळात काय घडले, ते सावित्रीला कथन करण्यास सांगितले. राजाच्या सांगण्यावरून सावित्री म्हणाली, ‘‘शाल्व देशात द्युमत्सेन नावाचा एक प्रसिद्ध धर्मात्मा राजा होता. काही काळानंतर तो अंध झाला. त्याचा पुत्रही लहान होता. ही संधी साधून शेजारच्या राजाने त्याचे राज्य बळकावले. तेव्हा द्युमत्सेन आपली राणी आणि पुत्रासह वनात निघून गेला आणि तेथेच तपस्वी जीवन जगू लागला. त्याचा आता तरुण झालेला सत्यवान नावाचा पुत्र मला योग्य वर वाटला आणि त्यालाच मी मनाने वरले आहे.’’
३. सत्यवान-सावित्रीचा विवाहसंस्कार होणे आणि सावित्रीने मधुर भाषण, सेवेतील तत्परता, संयम आदी गुणांनी सासू-सासर्यांना, तर मनोभावे सेवा करून पतीलाही प्रसन्न ठेवणे
सत्यवानाच्या गुणांचे कौतुक करून नारद म्हणाले, ‘‘या सत्यवानाचे मातापिता सत्यवादी असल्याने ब्राह्मणांनी त्याचे नाव सत्यवान ठेवले आहे. राजा, तरीही एक फार दुःखाची गोष्ट आहे. आजपासून एक वर्षाने सत्यवान मृत्यू पावणार आहे.’’ आपल्या भावी पतीचे आयुष्य केवळ एक वर्षाचे आहे, हे कळूनही सावित्री विचलीत झाली नाही. ते पाहून नारद म्हणाले, ‘‘राजा, तुझ्या मुलीची-सावित्रीची बुद्धी निश्चयात्मक आहे; म्हणून तिला कोणत्याही प्रकारे या निर्णयापासून विचलीत केले जाऊ शकत नाही. सत्यवानात जे गुण आहेत, ते कोणत्याही दुसर्या पुरुषात नाहीत; म्हणून मलाही असेच वाटते की, तू त्यालाच कन्यादान करावे.’’ एका शुभमुहूर्तावर सत्यवान-सावित्रीचा विवाहसंस्कार झाला. पतीगृही आल्यावर सावित्रीने आपली मौल्यवान वस्त्रे आणि अलंकार उतरवून ठेवले. तिची नम्रता, सेवा, संयम इत्यादी गुण पाहून सर्वांनाच संतोष झाला. मधुर भाषण, सेवेतील तत्परता, संयम आदी गुणांनी तिने सासू- सासर्यांना, तर मनोभावे सेवा करून पतीलाही प्रसन्न ठेवले. काही काळ आनंदात गेला.
४. सत्यवानाचे प्राणहरण होणे आणि दु:खाने व्याकुळ झालेली सावित्रीही त्यांच्या मागोमाग जाणे
सावित्री मनाशी एकेक दिवस मोजत होती. नारदांचे बोल तिच्या स्मरणात होते. जेव्हा तिच्या लक्षात आले की, आजपासून चौथ्या दिवशी सत्यवानाचा अंतसमय आहे, तेव्हा तीन रात्री अगोदर तिने व्रत धारण केले. रात्रंदिवस ती अगदी स्थिर होऊन बसून राहिली. पतीच्या मृत्यूदिनाची आधीची रात्र तिने जागून काढली. दुसर्या दिवशी दैनंदिन कामे उरकून सूर्य आकाशात थोडा वर आल्यावर तिने अग्नीला आहुती दिल्या. सत्यवान हातात कुर्हाड घेऊन समिधा आणि फळे आणण्यासाठी वनात जाण्यास निघाला. सावित्रीही सासू-सासर्यांची अनुज्ञा घेऊन सत्यवानासह जायला निघाली. वनात काम करता करता सत्यवान सावित्रीला म्हणाला, ‘‘मला थकवा आला आहे. मी आता झोपू इच्छितो.’’ हे ऐकून सावित्री त्याच्याजवळ आली. भूमीवर बसून तिने त्याचे मस्तक मांडीवर घेतले. तितक्यात तेथे तिला एक पुरुष दिसला. त्याची वस्त्रे लाल असून त्याच्या डोक्यावर मुकुट होता. त्याचे डोळे लाल होते. हातात पाश होता आणि तो अत्यंत भयंकर दिसत होता. तो सत्यवानाजवळ उभा राहून त्याच्याकडेच पहात होता. त्याला पाहून सावित्रीने सत्यवानाचे मस्तक भूमीवर ठेवले आणि ती उभी राहिली. तिचे हृदय धडधडत होते. अतिशय दुःखी होऊन हात जोडून ती त्याला म्हणाली, ‘‘आपण कोणी देवता आहात, असे मी समजते. आपली इच्छा असल्यास मला सांगा की, आपण कोण आहात आणि येथे काय करू इच्छिता ?’’
ती देवता म्हणाली, ‘‘सावित्री, तू पतिव्रता आणि तपस्विनी आहेस. म्हणून मी तुझ्याशी बोलेन. मी यमराज आहे. सत्यवानाचे आयुष्य संपले आहे. हा धर्मात्मा गुणांचा सागरच आहे. त्यामुळे त्याला नेण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आता मी याला पाशात बांधून घेऊन जाणार आहे.’’ असे बोलून सत्यवानाच्या शरिरातून अंगुष्ठमात्र पुरुष आपल्या पाशात बांधून यमराज दक्षिणेकडे जाण्यास निघाले. तेव्हा दुःखाने व्याकुळ झालेली सावित्रीही त्यांच्या मागोमाग जाऊ लागली.
५. यमधर्माकडून पहिला वर
काही अंतर गेल्यावर यमराज म्हणाले, ‘‘सावित्री, तू परत जा. आता याची उत्तरक्रिया कर. तू पतीसेवेच्या ऋृणातून मुक्त झाली आहेस. पतीसमवेत तुला जेथपर्यंत यायला पाहिजे, तेथपर्यंत तू आली आहेस.’’ सावित्री म्हणाली, ‘‘माझ्या पतीदेवांना जेथे नेले जाईल किंवा ते स्वतः जेथे जातील, तेथे मलाही गेले पाहिजे. हाच सनातन धर्म आहे. तपश्चर्या, गुरुभक्ती, पतीप्रेम, व्रताचरण आणि आपली कृपा यांमुळे माझी गती कोठेही थांबू शकत नाही.’’ तिच्या या बोलण्यावर यमराज प्रसन्न झाले. त्यांनी तिला सत्यवानाचे प्राण सोडून कोणताही वर माग म्हटले. त्या वेळी एकुलता एक पुत्र गमावलेल्या सासर्यांची मूर्ती तिच्या दृष्टीसमोर आली. तिने आपल्या सासर्यांसाठी दृष्टी, बल आणि तेज मागितले. यमराजांनी तिला ‘तथास्तु ।’ म्हणून परत फिरण्यास सांगितले. सत्यवानाच्या मागे स्वतःचे काय होईल, याचा विचार न करता तिने आपल्या सासर्यांसाठी वर मागितला. केवढा हा त्याग !!
६. यमधर्माकडून दुसरा वर
सावित्री यमराजाच्या मागे जातच राहिली. परत जायला सांगणार्या यमराजाला ती म्हणाली, ‘‘जेथे माझे प्राणनाथ रहात आहेत, तेथेच मी असले पाहिजे. याविना माझी आणखी एक गोष्ट ऐका. सत्पुरुषांचा तर एका वेळचा सहवासही अत्यंत लाभप्रद असतो. त्यापेक्षा त्यांच्याशी मैत्री होणे श्रेष्ठ आहे. सत्संगती कधीच वाया जात नाही; म्हणून नेहमी सत्पुरुषांसमवेत राहिले पाहिजे.’’ तिच्या या कल्याणकारी बोलण्यामुळे यमराजांनी तिला ‘पतीचे प्राण सोडून दुसरी कोणतीही गोष्ट माग’, असे म्हटले. सावित्रीने आपल्या सासर्यांचे गेलेले राज्य त्यांना आपोआप प्राप्त व्हावे आणि त्यांनी आपल्या धर्माचा त्याग करू नये, हा वर मागितला. यमराजाने ‘तथास्तु ।’ म्हणून तिला परत जाण्यास सांगितले. सासर्याने राज्यकारभार ‘धर्माने’ करावा, या मागणीत तिची धर्मावरील अढळ निष्ठा दिसून येते !
७. दुहिता !
चालता-चालता सावित्री यमराजाला म्हणाली, ‘‘सर्व प्रजेचे आपण नियमाने संयमन करून तिला इच्छित फळही देता; म्हणून आपण ‘यम’ नावाने प्रसिद्ध आहात. म्हणून आता मी जे सांगेन ते ऐका. मन, वचन आणि कर्म यांनी सर्व प्राण्यांशी द्रोहरहित असणे, सर्वांवर कृपा करणे अन् दान देणे हा सत्पुरुषांचा सनातन धर्म आहे. अशा प्रकारचाच तर बहुतेक हा सर्व लोक आहे. सर्वच माणसे आपापल्या शक्तीप्रमाणे कोमलतेने वागतात; पण जे सत्पुरुष असतात, ते तर आपल्याजवळ आलेल्या शत्रूंवरही दया करतात.’’ तिच्या या बोलण्यावर संतुष्ट होऊन यमराजांनी तिला ‘तिसरा वर माग’, असे म्हटले. तिसर्या वराने सावित्रीने आपल्या पित्यासाठी १०० पुत्र मागितले. यमराजांनी तीही इच्छा पूर्ण करून तिला परत जायला सांगितले. सासू-सासर्यांचे कल्याण करून घेतल्यावर आपल्या वडिलांना आपल्या माघारी कोणीच संतान नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तर सत्यवानासमवेतच जाण्याचा निर्णय मनोमन घेतला होता. कन्येला ‘दुहिता’ म्हणतात. सासर आणि माहेर या दोघांचे हित साधणारी ती ‘दुहिता’ ! किती उत्तम प्रकारे तिने आपले कर्तव्य पार पाडले !
८. यमधर्माकडून चौथा वर
काही अंतर चालून गेल्यावर सावित्री यमधर्माला म्हणाली, ‘‘पतीदेवांच्या सान्निध्यामुळे मला हे अंतर काही जास्त जाणवत नाही. माझे मन तर फार दूर दूर धावत असते; म्हणून मी जे बोलणार आहे, ते ऐकण्याची कृपा करावी. आपण विवस्वान (सूर्य) यांचे पराक्रमी पुत्र आहात; म्हणून आपणांस ‘वैवस्वत’ म्हणतात. आपण शत्रू-मित्रादिक भेदभाव सोडून सर्वांचा समानतेने न्याय करता. त्यामुळेच सर्व प्रजा धर्माचे आचरण करते. त्यामुळे आपणास ‘धर्मराज’ म्हटले जाते.’’ याही बोलण्यावर प्रसन्न होऊन यमराजांनी सावित्रीला चौथा वर दिला. या वराने तिने तिच्या कुलाची वृद्धी करणारे बलवान आणि पराक्रमी असे १०० पुत्र मागितले. पहिल्यांदाच सावित्रीने स्वतःसाठी काहीतरी मागितले ! यमराजांनी आनंदाने तिला हा वर दिला आणि म्हटले की, तू फार दूरवर आली आहेस. आता परत जा.
९. यमधर्माकडून सत्यवानाचे प्राण परत मिळाले !
सावित्री यमधर्मासमवेत पुढे-पुढे जातच राहिली. ती म्हणाली, ‘‘सत्पुरुषांची वृत्ती नेहमी धर्मातच रहात असते. ते कधी दुःखी किंवा व्यथित होत नाहीत. सत्पुरुषांशी सत्पुरुषांचा जो समागम होतो, तो कधीही निष्फळ होत नाही. सत्पुरुष सत्याच्या बळावर सूर्यालासुद्धा आपल्या जवळ बोलावून घेतात. ते आपल्या तपाच्या प्रभावाने पृथ्वीलाही धारण करतात. सत्यात राहिल्याने सत्पुरुषांना कधी खेद होत नाही. हा सनातन सदाचार सत्पुरुषांनी आचारलेला आहे, असे जाणून सत्पुरुष परोपकार करतात आणि परतफेडीकडे कधी दृष्टी ठेवत नाहीत.’’ तिचे हे धर्मानुकूल वचन ऐकून यमाने पाचवा वर मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्री म्हणाली, ‘‘हे धर्मराजा, आपण मला जो पुत्रप्राप्तीचा वर दिला आहे, तो दांपत्यधर्माविना पूर्ण होऊ शकत नाही; म्हणून आता मी हाच वर मागते की, माझे पती जिवंत व्हावेत. यामुळे आपले वचन सत्य होईल; कारण पतीवाचून तर मी मृत्यूच्या मुखातच पडले आहे. पतीविना मला अन्य कोणत्याही सुखाची इच्छा नाही. स्वर्गाचीही मला कामना नाही. प्रत्यक्ष लक्ष्मी आली, तरी मला तिचीही आवश्यकता नाही. इतकेच नव्हे, तर पतीवाचून मी जिवंतही राहू इच्छित नाही. आपणच मला १०० पुत्र होण्याचा वर दिला आहे आणि तरीही आपण माझ्या पतीला घेऊन जात आहात; म्हणून मी जो हा वर मागितला आहे, त्यानेच आपले वचन सत्य होईल.’’
१०. सूर्यपुत्र यमराज यांनी प्रसन्न होऊन सत्यवानाचा पाश काढून त्याला मुक्त करणे आणि त्यांच्या देहात चैतन्य येऊन तो उठून बसणे
हे ऐकून सूर्यपुत्र यमराज फार प्रसन्न झाले आणि त्यांनी ‘तथास्तु ।’ म्हणत सत्यवानाचा पाश काढून घेतला. ते म्हणाले, ‘‘हे कल्याणी ! घे, मी तुझ्या पतीला मुक्त केले आहे. आता हा सर्व प्रकारे निरोगी होईल. याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा तुझ्यासह चारशे वर्षे जिवंत राहील. धर्मपूर्वक यज्ञ-अनुष्ठान करून सर्व लोकांत कीर्ती मिळवेल. त्याच्यापासून तुला १०० पुत्र होतील !’’ यमराज परत जायला निघाले. सावित्रीने त्यांना वंदन केले आणि त्यांनी केलेल्या कृपेमुळे कृतज्ञता व्यक्त केली. यमराज निघून गेल्यानंतर सावित्री सत्यवानाच्या अचेतन देहाजवळ आली. तिने त्याचे मस्तक पुन्हा आपल्या मांडीवर घेतले. हळूहळू सत्यवानाच्या देहात चैतन्य आले. तो उठून बसला !
११. यमधर्माशी धर्मानुकूल संभाषण करून शीलवती, कुलवती, गुणवती सावित्रीने आपल्या पतीचे पंचप्राण परत आणणे
आज अनेकांना हिंदु धर्मात सांगितलेले परलोक, परलोकांचा प्रवास आणि अन्य सूक्ष्म भाग प्रत्यक्षात आहेतच, हे कळत नाही आणि पटत नाही. काहींना पटले, तरी दिसू शकत नाही. येथे तर प्रत्यक्ष यमधर्माशी धर्मानुकूल संभाषण करून शीलवती, कुलवती, गुणवती सावित्रीने आपल्या पतीचे पंचप्राण परत आणले. प्रत्येक हिंदु पतीव्रतेच्या हृदयात अढळ स्थान मिळवणार्या सती सावित्रीला शतशः प्रणाम !’
– श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी (दैनिक सनातन प्रभात, ३०.६.२००७)