१. मराठेशाहीही खालसा करण्याची जिद्द बाळगत महाराष्ट्रात छावणी करून बसलेला औरंगजेब !
‘छत्रपती संभाजी महाराजांच्या मोगली छावणीत झालेल्या अत्यंत क्रूर आणि दारुण वधाने हिंदवी स्वराजाचा पायाच हादरून गेला होता. मोगली फौजा स्वराज्यात सर्व बाजूंनी घुसून आक्रमण करत होत्या. स्वराज्याचे गडकोट, ठाणी एकामागून एक याप्रमाणे शत्रूच्या हाती पडत होती. प्रत्यक्ष राजधानी रायगडला औरंगजेबाचा सेनापती जुल्फीकार खान याचा वेढा पडला होता आणि सर्व मराठा राजकुटुंबांसह मराठ्यांची राजधानी हस्तगत करून दक्षिणेतील आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्या पाठोपाठ मराठेशाहीही खालसा करण्याचा दुराग्रह (जिद्द) बाळगत औरंगजेब महाराष्ट्रात छावणी करून बसला होता.
२. राजाराम महाराजांनी रायगडाबाहेर पडून अनेक किल्ल्यांवर जाणे, ते जेथे जेथे गेले, तेथे तेथे मोगली फौजांनी त्यांचा पिच्छा पुरवणे आणि त्यांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे जिंजीकडे जाण्याचा निर्णय घेणे
अशा भयंकर संकटात रायगडावर संभाजी महाराजांची राणी येसूबाई आणि स्वराज्यातील प्रमुख अधिकारी यांनी एकत्र येऊन राजाराम महाराजांना मंचकारोहण करून त्यांना ‘छत्रपती’ म्हणून घोषित केले आणि ‘मराठ्यांचे राज्य बुडालेले नाही, एवढेच नव्हे, तर मराठ्यांचे शत्रूंशी निकराने युद्ध
चालूच राहील’, हे त्यांनी बादशहास दाखवून दिले. अशा प्रसंगी रायगडावर राजकुटुंबातील सर्वच व्यक्तींनी एकाच स्थानी अडकून रहाणे धोक्याचे होते; म्हणून राजाराम महाराजांनी आपल्या सहकार्यांसह गडाबाहेर पडावे, किल्लो-किल्ले फिरते राहून शत्रूशी प्रतिकार चालू ठेवावा आणि त्यातूनही बिकट
परिस्थिती उद्भवली, तर जीव वाचवण्यासाठी कर्नाटकात जिंजीकडे निघून जावे, अशी मसलत येसूबार्इंच्या मार्गदर्शनाखाली ठरली. त्यानुसार राजाराम महाराज रायगडाबाहेर पडून प्रतापगडास आले. प्रतापगडाहून सज्जनगड, सातारा, वसंतगड असे करत पन्हाळ्यास पोहोचले. ते जेथे जेथे गेले, तेथे तेथे
मोगली फौजांनी त्यांचा पिच्छा पुरवला. लवकरच पन्हाळ्यासही मोगलांचा वेढा पडला. स्वराज्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट बनू लागली. तेव्हा पूर्वनियोजित मसलतीप्रमाणे राजाराम महाराजांनी आपल्या प्रमुख सहकार्यांनिशी जिंजीकडे जाण्याचा निर्णय घेतला.
३. कोणत्याही परिस्थितीत राजास पकडायचे, असा चंग औरंगजेबाने बांधला असणे आणि कोणत्याही परिस्थितीत शत्रूस चकवा देऊन जिंजीस पोहोचायचे, असा राजाचा कूटनिश्चय असणे
‘आपल्या दबावामुळे मराठ्यांचा नवा राजा महाराष्ट्रातून निसटून जिंजीकडे जाण्याची शक्यता आहे’, याचा अंदाज चाणाक्ष औरंगजेबाने अगोदरच बांधला होता आणि त्या दृष्टीने दक्षिणेतील सर्व संभाव्य मार्गावरील किल्लेदार आणि ठाणेदार यांना त्याने सावधानतेचा आदेश पाठवला होता. राजा कदाचित समुद्रमार्गावरून पळून जाईल; म्हणून त्याने गोव्याच्या पोर्तुगीज व्हॉईसरॉयलाही लक्ष ठेवण्यास सांगितले होते. ‘कोणत्याही परिस्थितीत राजास पकडायचे’, असा चंग त्याने बांधला होता आणि ‘कोणत्याही परिस्थितीत शत्रूस चकवा देऊन जिंजीस पोहोचायचे’, असा राजाचा कूटनिश्चय होता.
४. पन्हाळगडाहून सरळ दक्षिणेचा मार्ग न धरता महाराजांनी शत्रूस चकवण्यासाठी पूर्वेचा मार्ग धरणे
पन्हाळ्याचा वेढा चालू असतांनाच २६.९.१६८९ या दिवशी राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी िंलगायत वाण्याचा वेश परिधान करून गुप्तपणे वेढ्याबाहेर पडले. सोबत मानसिंग मोरे, प्रल्हाद, निराजी, कृष्णाजी अनंत, निळो मोरेश्वर, खंडो बल्लाळ, बाजी कदम इत्यादी मंडळी होती. वेढ्याबाहेर
पडताच घोड्यावरून प्रवास चालू झाला. सूर्योदयाच्या वेळी सर्व जण कृष्णातीरावरील नृसिंहवाडीजवळ पोहोचले. पन्हाळगडाहून सरळ दक्षिणेचा मार्ग न धरता महाराजांनी शत्रूस चकवण्यासाठी पूर्वेचा मार्ग धरला होता. आग्र्याहून निसटतांना शिवछत्रपतींनी अशी युक्ती अवलंबली होती. ते सरळ दक्षिणेस न जाता प्रथम उत्तरेस नंतर पूर्वेस आणि नंतर दक्षिणेस वळले होते. कृष्णेच्या उत्तरतिराने काही काळ प्रवास करून त्यांनी पुन्हा कृष्णा पार करून दक्षिणेचा रस्ता धरला; कारण जिंजीकडे जायचे, तर कृष्णा आणखी एकदा पार करणे गरजेचे होते. हा सर्व वरवर ‘अव्यापारेषु व्यापार’ केवळ शत्रूस हुलकावणी देण्यासाठी होता. शिमोग्यापर्यंतचा महाराजांचा प्रवास गोकाक-सौंदत्ती-नवलगुंद-अनेगरी-लक्ष्मीश्वर-हावेरी-हिरेकेरूर-शिमोगा असा झाला.
५. मराठ्यांचा राजा आपल्या हातातून निसटला आहे, हे मोगलांना माहीत होणे आणि स्वतः बादशहाने निरनिराळ्या मार्गांनी त्यांच्या पाठलागावर सैन्य पाठवणे
मार्गात ठिकठिकाणी महाराजांनी बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे, संताजी जगताप, रूपाजी भोसले इत्यादी आपले सरदार यापूर्वीच रवाना केले होते. ते प्रवासात महाराजांना मिळत गेले. इकडे महाराष्ट्रात मोगलांना उमजून चुकले होते की, मराठ्यांचा राजा आपल्या हातातून निसटला आहे. स्वतः बादशहाने निरनिराळ्या मार्गांनी त्यांच्या पाठलागावर सैन्य पाठवले होते. अशाच एका सैन्याने महाराजांना वरदा नदीजवळ गाठले. तेव्हा त्यांनी बहिर्जी आणि मालोजी या बंधूंच्या साहाय्याने शत्रूला हुलकावणी देऊन नदी पार केली; पण पुढे मोगलांच्या दुसर्या एका सैन्याने त्यांची वाट अडवली. तेव्हा रूपाजी भोसले आणि संताजी जगताप या शूर भालाइतांनी (भाल्यांनी युद्ध करणारे) भीम प्रकार गाजवून मोगलांना थोपवून धरले. लवकरच महाराजांनी संताजीस आघाडीस आणि रूपाजीस पिछाडीस ठेवून पुढचा मार्ग धरला. शत्रूंशी लढत लढत, त्यास अनपेक्षितपणे हुलकावणी देऊन त्यांनी तुंगभद्रेचा तीर गाठला.
६. चन्नम्मा राणीने हिंदु धर्म आणि संस्कृती यांना इस्लामी आक्रमणापासून वाचवण्याचे शिवछत्रपतींचे कार्य ज्ञात असल्यामुळे राजाराम महाराजांना तिच्या राज्यातून सुखरूपपणे जाण्यासाठी सर्व प्रकारचे साहाय्य करणे
ही हुलकावणी मार्गातील बिदनूरच्या चन्नमा राणीच्या सहकार्याने शक्य झाली. हिंदु धर्म आणि संस्कृती यांना इस्लामी आक्रमणापासून वाचवण्याचे
शिवछत्रपतींचे कार्य चन्नमास ज्ञात होते आणि म्हणूनच राजाराम महाराजांनी तिच्या राज्यातून सुखरूपपणे जाऊ देण्याचे आवाहन करताच तिने त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य देऊ केले. संकटग्रस्त मराठा राजास साहाय्य करणे हा तिने राजधर्म मानला आणि औरंगजेबाच्या संभाव्य क्रोधाची तमा न बाळगता तिने महाराजांच्या प्रवासाची गुप्तपणे चोख व्यवस्था केली. राणीच्या या साहाय्यामुळेच मराठ्यांचा राजा आपल्या सहकार्यांनिशी तुंगभद्रेच्या तिरावरील शिमोग्यास सुखरूपपणे पोहोचला. राणीच्या या साहाय्याची वार्ता औरंगजेबास समजताच त्याने तिला शिक्षा करण्यासाठी मोठी फौज रवाना केली; पण या फौजेचा समाचार मार्गातच संताजी घोरपड्याने घेऊन राणीचा बचाव केला.
७. राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी तुंगभद्रेच्या पात्रात असणार्या एका बेटावर मुक्काम करत असतांना मध्यरात्रीच्या प्रहरी त्यांच्यावर मोगलांच्या एका मोठ्या लष्करी तुकडीने छापा टाकणे
राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी तुंगभद्रेच्या पात्रात असणार्या एका बेटावर मुक्काम करून होते. ऐन मध्यरात्रीच्या प्रहरी त्यांच्यावर मोगलांच्या एका मोठ्या लष्करी तुकडीने छापा टाकला. या तुकडीचे नेतृत्व करत होता विजापूरचा सुभेदार सय्यद अब्दुल्ला खान. स्वतः औरंगजेबाच्या हुकमाने ३ दिवस ३ रात्र अखंड घोडदौड करून अब्दुल्ला खानाने राजाराम महाराजांस गाठले होते. सर्व दिशांनी मोगलांचा वेढा पडताच मराठ्यांनी सावध होऊन आपल्या राजाच्या रक्षणार्थ जोराचा प्रतिकार चालू केला. मोठी धुमश्चक्री उडाली.
८. खानाला कैद केलेल्यांमध्ये प्रत्यक्ष मराठ्यांचा राजा दिसणे आणि नंतर तो नकली असल्याचे त्याच्या लक्षात येणे
या चकमकीत अनेक मराठे मारले गेले. कित्येक कैद झाले. खानाला कैद केलेल्यांमध्ये प्रत्यक्ष मराठ्यांचा राजा दिसला. त्याच्या आनंदास पारावार राहिला नाही. त्याने तातडीने बादशहाकडे हे वृत्त धाडले. बादशहाने राजास सुरक्षाव्यवस्थेने (बंदोबस्ताने) आणण्यासाठी विशेष सैन्य रवाना केले; पण लवकरच अब्दुल खानाच्या लक्षात आले की, आपण पकडलेला मराठ्यांचा राजा नकली आहे. सिद्दी जोहरच्या वेढ्यात शिवछत्रपतींचे असेच सोंग करून शिवा काशीद याने शत्रूस चकवले होते. हिंदवी स्वराज्याच्या होमकुंडात या वेळी अशाच प्रकारे आत्मबलिदान करून एका अनामिक मराठ्याने
मराठ्यांच्या छत्रपतीस वाचवले होते. धन्य तो अनामिक मराठा बहाद्दूर वीर ! त्याच्या बलिदानाने मराठ्यांचे स्वातंत्र्य-समर अधिक तेजस्वी झाले.
९. आता मोगलांनी सर्व संभाव्य मार्र्गांवर हेरांचे जाळे पसरल्याने राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी नाना प्रकारची वेषांतरे करून आपला खडतर प्रवास चालूच ठेवणे
शिमोग्यापर्यंतचे अंतर राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी घोड्यांच्या पाठीवरून तोडले होते; पण आता मोगलांनी त्यांच्या सर्व संभाव्य मार्गांवर हेरांचे जाळे पसरल्याने घोड्यावरून प्रवास धोक्याचा ठरला. तेव्हा त्यांनी यात्रेकरू, तडीतापडी, कापडी, व्यापारी, भिक्षेकरी अशी नाना प्रकारची वेषांतरे करून आपला खडतर प्रवास चालूच ठेवला. ठिकठिकाणचे चौक्या-पहारे चुकवत त्यांनी शिमोग्याच्या आग्नेयेस १७० मैलांवर असणारे बंगळूर गाठले.
१०. बंगळूरच्या मुक्कामी महाराजांकडे पाहून ‘हा कोणी मातब्बर माणूस दिसतो’ हे स्थानिक लोकांच्या लक्षात येणे आणि त्यांनी ही वार्ता लगेच मोगली ठाणेदारास सांगणे
बंगळूरच्या मुक्कामी महाराजांवर आणखी एक संकट गुजरले. त्यांचे पाय एक सेवक धूत असता काही स्थानिक लोकांच्या लक्षात आले की, हा कोणी मातब्बर माणूस दिसतो. त्यांनी ही वार्ता लगेच मोगली ठाणेदारास सांगितली. त्या कालावधीत मराठी मंडळीही सावध झाली. त्यांना कोसळणार्या संकटाची चाहूल लागली. तेव्हा खंडो बल्लाळाने पुढाकार घेऊन महाराजांस विनंती केली की, त्यांनी आपल्या सहकार्यांनिशी भिन्न भिन्न मार्गांनी पुढे निघून जावे, मागे आम्ही २-४ आसामांrनिशी आल्या प्रसंगाला तोंड देऊ आणि त्यातून निसटून मार्गात ठराविक ठिकाणी येऊन मिळू. खंडो बल्लाळच्या या सल्ल्याप्रमाणे महाराज निघाले. इकडे ठाणेदाराची धाड पडली आणि त्याने खंडो बल्लाळ प्रभृतींना वैâद करून ठाण्यात नेले.
११. छत्रपती आणि हिंदवी स्वराज्य यांसाठी मोठा देहदंड सोसणारे खंडो बल्लाळ आणि इतर प्रभृती !
ठाण्यात खंडो बल्लाळ आणि त्यांचे सोबती यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले. त्यांना चाबकाने फोडून काढले. डोक्यावर दगड दिले. तोंडात राखेचे तोबरे दिले; पण ‘आम्ही यात्रेकरू’ याव्यतिरिक्त अधिक माहिती त्यांच्या तोंडून बाहेर पडली नाही. तेव्हा ‘हे खरेच यात्रेकरू आहेत. महाराजांचे असते, तर इतक्या मारापुढे बोलते’, असा विचार करून ठाणेदाराने त्यांना सोडून दिले. सुटका होताच ते राजाराम महाराजांना विवक्षित ठिकाणी येऊन मिळाले. खंडो बल्लाळ प्रभृतींनी छत्रपती आणि हिंदवी स्वराज्य यांसाठी मोठा देहदंड सोसला. स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यनिष्ठा यांचे हे एक प्रकरण दिव्यच होते. या दिव्याच्या कसोटीस ते उतरले.
१२. पुढे राजाराम महाराज मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या अंबूर या ठिकाणी पोहोचणे
राजाराम महाराजांचा प्रवास पुढे चालूच राहिला. बंगळूरपासून पूर्वेस ६५ मैलांवर असणार्या अंबूर या ठिकाणी ते पोहोचले. अंबूर हे ठाणे मराठ्यांच्या ताब्यात होते आणि तेथे बाजी काकडे हा मराठा सरदार छावणी करून होता. त्याला महाराज आल्याची वार्ता समजताच तो त्वरेने दर्शनास आला आणि त्याने महाराजांचा यथोचित सत्कार करून त्यांचा गुप्तवास संपवला. आता महाराज उघडपणे आपल्या सैन्यासह अंबूरहून वेलोरकडे निघाले. वेलोरचा कोटही मराठ्यांच्या ताब्यात होता. २८.१०.१६८९ या दिवशी महाराज वेलोरास पोहोचले. पन्हाळगड ते वेलोर हे अंतर कापण्यास त्यांना ३३ दिवस लागले होते. वेलोर मुक्कामी कर्नाटकातील आणखी काही सरदार आपल्या सैन्यासह त्यांना येऊन मिळाले. वास्तविक अंबूरहून थेट दक्षिणेस असणार्या जिंजीकडे त्यांनी जावयास हवे होते; पण जिंजीकडे जाण्यात त्यांच्यासमोर एक अडचण उपस्थित झाली होती.
१३. जिंजी किल्ला म्हणजे कर्र्नाटकातील मराठी राज्याचे प्रमुख केंद्र असणे
स्वतः शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याला अभेद्य करून ठेवले होते. पुढे महाराष्ट्रात मराठी राजाला संकटकाल प्राप्त झाला, तर येथे त्यास आश्रय घेता यावा, अशी त्यांची दूरदृष्टी होती. शिवछत्रपतींनी औरंगजेबाचा धोका जाणला होता. भाकीत केले होते. त्याचप्रमाणे घडले. औरंगजेब दक्षिणेस चालून आला. मराठी राजा संकटात पडला. तेव्हा जिंजी किल्ला साहाय्यास आला.
१४. राजाराम महाराजांच्या सावत्र बहिणीने महाराजांना विरोध करायचे ठरवून तशी सिद्धता करणे; पण सैन्यातील अधिकार्यांनी तिला त्या अविचारापासून परावृत्त करणे आणि महाराज आपल्या सहकार्यांनिशी जिंजी किल्ल्यात येणे
संभाजीराजांच्या काळात हरजीराजे महाडीक हा कर्नाटकातील मराठ्यांचा मुख्य सुभेदार होता. त्याचे नुकतेच निधन झाले होते. त्यांची बायको, म्हणजे
राजाराम महाराजांची सावत्र बहीण. हरजीराजांच्या मागे तिचा स्वतंत्र होण्याचा उद्योग चालू होता. तिने जिंजीचा किल्ला साधनसंपत्तीसह बळकावला होता. आता तिने महाराजांना विरोध करायचे ठरवून तशी सिद्धता चालू केली. ‘किल्ला आपल्या स्वाधीन करावा’, हा महाराजांचा निरोप तिने धुडकावून लावला. एवढेच नव्हे, तर त्यांना लष्करी प्रतिकार करण्यासाठी ती आपले सैन्य घेऊन जिंजीबाहेर पडली; पण काही अंतर गेल्यावर तिच्याच सैन्यातील अधिकार्यांनी तिला त्या अविचारापासून परावृत्त केले. शेवटी आपली बाजू दुर्बळ झाल्याचे पाहून निरुपायाने ती किल्ल्यात परतली. जिंजीतील मराठ्यांनी राजाराम महाराजांचा पक्ष उचलून धरला. परिणामी अंबिकाबाईस आपल्या बंधूच्या स्वागतासाठी जिंजीचे द्वार उघडावे लागले. नोव्हेंबर १६८९ च्या पहिल्या आठवड्यात राजाराम महाराज आपल्या सहकार्यांनिशी जिंजी किल्ल्यात आले. जिंजीचा प्रवास असा सुखान्त झाला.
१५. जिंजीत मराठ्यांच्या राज्याचे नवे पर्व आरंभ होणे
मराठा मंडळींनी कर्नाटकात आणि जिंजीत राजाराम महाराजांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केल्याने मद्रास किनारपट्टीवरील राजकारणाचे रंग पालटू
लागले. नव्या मराठा राजाने जिंजीत आपली नवी राजधानी उभी केली. दरबार सज्ज झाला. मराठ्यांच्या राज्याचे नवे पर्व आरंभ झाले.
१६. संताजी, धनाजी अशा अनेक प्रभृतींनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मोगलांशी निकराची झुंज देणे आणि नंतर महाराजांनी महाराष्ट्रात येऊन मोगलांविरुद्ध मोठी धामधूम माजवणे
पुढे जिंजी जिंकून राजाराम महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानास धाडले. खिस्ताब्द १६९० या वर्षी खानाने जिंजीस वेढा दिला तो ८ वर्षे चालू राहिला. त्या काळात रामचंद्र पंडित, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी प्रभृतींनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मोगलांशी निकराची झुंज दिली. संताजी-धनाजींनी याच काळात गमिनी काव्याने लढून मोगलांची हैराणगत केली. नाशिकपासून जिंजीपर्यंत मराठ्यांच्या फौजा सर्वत्र संचार करू लागल्या. शेवटी खिस्ताब्द १६९७ या वर्षी जुल्फिकार खानाने जिंजी जिंकली खरी; पण तत्पूर्वीच महाराज किल्ल्यातून निसटले. महाराष्ट्रात येऊन त्यांनी मोगलांविरुद्ध मोठी धामधूम माजवली. शत्रूच्या प्रदेशावरील स्वारीत असतांनाच त्यांचा प्रकृतीने घात केला आणि सिंहगडावर फाल्गुन कृ. नवमी, शके १६२१ या दिवशी त्यांचे निधन झाले.’
– डॉ. जयसिंगराव पवार (पुढारी, २९.३.२०००)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात