तंत्रज्ञानाच्या या युगातील झगमगीत शहरांनाही मागे टाकेल, अशी सुपरक्लास सिटी सहस्रो वर्षांपूर्वी भारतात होती, ते शहर होते मोहेंजोदडो ! सिंधू संस्कृतीमधील मोहेंजोदडो शहरात हडाप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत, याची माहिती इतिहासाच्या पुस्तकातून मिळते; परंतु त्यापेक्षा अधिक वैशिष्ट्ये मोहेंजोदडोत प्रत्यक्षात होती. सहस्रो वर्षांपूर्वीचे हे शहर नियोजनपूर्ण उभे करण्यात आले होते. मुंबईतील ट्रॅफिक जॅम आणि खड्ड्यांंच्या रस्त्यांनाही लाजवेल, असे प्रशस्त रस्ते मोहेंजोदडोत होते. पूर्व-पश्चिम आणि दक्षिण-उत्तर पसरलेले ९ मीटर रुंदीचे रस्ते अन् त्यांना जोडणारे ५ मीटर रुंदीचे पोटरस्ते हे मोहेंजोदडोचे वैशिष्ट्य होते. पिण्याच्या पाण्यासाठी नद्यांव्यतिरिक्त प्रत्येक घरासमोर एक अतिरिक्त विहीर, श्रीमंतांच्या वाड्यांबरोबर श्रमिक वर्गासाठी विशेष वसाहत, अशी अनेक वैशिष्ट्ये मोहेंजोदडोत होती. ड्रेनेज लाईन, विटांनी व्यवस्थित झाकलेली गटारे, व्यापारी, उद्योजक यांसाठी वेगळा विभाग, असे योजनाबद्ध आणि सर्व सुविधा असलेले हे शहर वर्ष १९२७ मध्ये उत्खननानंतर जगासमोर आले. नगररचना, वास्तूरचना, पायाभूत सुविधा आणि शेती उद्योग या सगळ्याच बाबतीत सुनियोजित असलेल्या या शहराचा आदर्श जगातील कुठल्याही देशाने घ्यावा, असाच आहे; कारण त्या वेळचे तंत्रज्ञान आजच्या अतिप्रगत देशांनाही आश्चर्यचकीत करणारे आहे.
भारतातील प्रगत प्राचीन तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना असलेले शहर : मोहेंजोदडो !
मोहेंजोदडोच्या भागात हड्डप्पन तंत्रज्ञान प्रगत होते. ख्रिस्तपूर्व ५ सहस्र वर्षांपूर्वीही मातीची भांडी वापरली जायची. काळी, लाल माती, हड्डप्पा गेरू यांपासून ही भांडी बनवली जात होती. भांड्याला आकार देण्यासाठी कुंभार तेव्हाही चाकाचा वापर करायचा. ही भांडी भाजण्यासाठी ६ x ४ फुटांची भट्टीही तेव्हा होती, याचे पुरावेही उत्खननातून मिळाले आहेत.
मातीच्या भांड्यांबरोबर सिरॅमिकपासून सिद्ध केलेल्या वस्तू, बांगड्या, तसेच शंख-शिंपल्यांपासून बनवलेले दागिनेही सहस्रो वर्षांपूर्वी वापरले जात होते.
सोने, चांदी, तांबे, जस्त, लोखंड या संदर्भात भारतात संशोधन झाले. धातूंच्या शुद्धीकरणाची प्रक्रियाही सर्वप्रथम भारतात सहस्रो वर्षांपासून ज्ञात आहे; म्हणूनच आधी माती, लाकूड आणि धातूचा शोध लागल्यावर त्याचा वापर चलनी शिक्क्यांसाठी होऊ लागला.
३ अ. तांबे : राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये ५ ते ६ सहस्र वर्षांपूर्वीही तांब्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असे. १ सहस्र ८३ अंश सेंटिग्रेडपर्यंत कच्चा धातू तापवून त्यातून शुद्ध तांबे मिळवण्याची कला तेव्हा कारागिरांना चांगलीच अवगत होती. त्याचप्रमाणे १ सहस्र ६३ अंश सेंटिग्रेडची उष्णता देऊन सोन्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जायची. विटांपासून बनवलेली लोहभट्टी तेव्हा विशेषत्वाने वापरली जायची.
३ आ. जस्त : जस्त या धातूचा वापरही तेव्हा केला जायचा. हिंदुस्थान जंक लिमिटेड, ब्रिटीश म्युझियम आणि बडोद्याच्या विश्वविद्यालयाने राजस्थानच्या जावरमध्ये संयुक्तपणे उत्खनन केले. तेव्हा त्यांना जस्ताची एक भट्टी सापडली होती. या भट्टीत प्रतिदिन २० ते २५ किलो जस्तावर प्रक्रिया केली जायची. त्यावरून पाचव्या आणि सहाव्या शतकात जवळपास ६० सहस्र टन जस्त वापरले गेले, असा अंदाज या गटाने काढला.
३ इ. धातूंपासून मूर्ती बनवणे : मूर्ती बनवण्यासाठी मेणाच्या साच्याचा सर्रास वापर केला जायचा. मेणापासून मूर्ती बनवून त्यावर रेती आणि मातीचे मिश्रण ओतून साचा बनवला जायचा. या साच्यात धातू ओतून मूर्ती घडवल्या जायच्या. भाजणी आणि पॉलिशिंगही त्या वेळी व्हायचे. अशाच प्रकारे केवळ १ ते २ टक्के कार्बन असलेले उच्च दर्जाचे पोलाद (स्टील) भारतात बनायचे. चीन आणि भारताच्या पूर्वेकडील काही देशांकडून भारतीय पोलादाला (स्टीलला) विशेषत्वाने वूटज स्टीलला मोठ्या प्रमाणावर मागणी असायची. इराणसाठी भारत ही कापूस आणि कपडे यांची मोठी बाजारपेठ होती. याच कापसामुळे इराणसह इतर देशांतील व्यापारी तेव्हा भारतात येऊ लागले. मालाच्या आयात-निर्यातीसाठी तेवढीच सक्षम वाहतूकयंत्रणा भारताकडे होती.
याचा शोध लागल्यावर त्याचा विविध प्रकारे वापर करण्यास भारतात प्रारंभ झाला. लाकडापासून चौकट बनवून त्याला चाक लावून बैलगाडी, घोडागाडी बनवली गेली. त्याचप्रमाणे विहिरीतून पाणी काढण्यासाठी रहाट बनवले गेले. ख्रिस्तपूर्व ३५० मध्ये भारतात पाणी खेचण्यासाठी रहाट वापरले जायचे.
काश्मीर, हिमाचल प्रदेशात धबधब्यांमधून जोरात वहाणार्या पाण्याचा वापर करून धान्य दळण्याची चक्की बनवली गेली. याची माहिती देतांना केनेड म्हणाले, दगड कोरून त्याचे दात्यांचे चाक बनवले जायचे. त्यात झाडाचा मोठा आेंडका अडकवून वर चक्की उभारली जायची. अर्थात त्यासाठी जवळ असलेल्या दोन मोठ्या खडकांचा आधार घेतला जायचा. पाण्याच्या वेगामुळे दगडी चाक फिरले की, चक्कीतील दगड फिरायचे. ही जगातील पहिली पिठाची गिरणी होती.
सिंधू संस्कृतीत वजन-मापांचाही वापर व्हायचा. १.७, ३.४, १३.६ आणि १३६ ग्रॅम अशी वजने तेव्हा होती.
शल्यचिकित्सा (ऑपरेशन) ही इंग्रजांकडून भारतियांना मिळालेली देणगी आहे, हा अनेकांचा गैरसमज आहे. सुश्रुताचार्यांच्या सुश्रुतसंहिता या ग्रंथातच शल्यचिकित्सेची माहिती मिळते. इतकेच नाही, तर युद्धप्रसंगात जखमी योद्ध्यांवर वेळप्रसंगी शल्यचिकित्सा झाल्या असल्याची माहिती इतिहासाच्या बखरींमधून मिळत आहे. अगदी ४ ते ५ सहस्र वर्षांपूर्वीही भारतात वैद्यांकडून शस्त्रकर्म केले जायचे. ३०० पेक्षा जास्त प्रकारचे शस्त्रकर्मे शरिरावर होत होती.
७ अ. शस्त्रकर्मांसाठी लागणारी उपकरणे : घाव, अपघात यांवर तेव्हाही शस्त्रकर्म होत असत. त्यासाठी आवश्यक अवजारे, उपकरणे तेव्हा बनवून घेतली जायची. ही उपकरणे प्राण्यांचे जबडे, पक्ष्यांच्या चोची, तसेच धातूंपासून बनवल्या जायच्या.
७ आ. प्लॅस्टिक सर्जरी : एखाद्या अवयवावर प्लॅस्टिक सर्जरीही केली जायची. गालावरील त्वचा काढून नाक, हनुवटी अथवा कपाळावर जोडून तोंडवळा सुंदर करण्याची हातोटी काही वैद्यांकडे होती. त्यामुळे प्लॅस्टिक सर्जरीचे जनक भारतात असल्याचा दुजोरा मिळत आहे.
सुंदरतेसमवेत सुगंधालाही मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान असते. हे महत्त्व भारतियांनी सहस्रो वर्षांपूर्वीच ओळखले होते. आता पेठेत (बाजारात) परदेशी बनावटीचे महागडे परफ्युम्स मिळत असले, तरी सुगंधी द्रव्याचा ठेवा भारताने आरंभापासूनच जपला आहे. त्वचारक्षक पदार्थांची निर्मिती करतांना सुवासिक फुले, वनस्पतींपासून सुवासिक द्रव्ये निर्माण होऊ लागली. सुगंधी तेल, चूर्ण/भुकटी (पावडर) अन् सुगंधी द्रव्यासाठी कन्नौज हे तत्कालीन शहर प्रसिद्ध होते. सुगंधी द्रव्य हा तेव्हाही कुटीरोद्योग होता.
– श्री. नीलेश करंजे (संदर्भ : मासिक चित्रलेखा, ८ जानेवारी २००७)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात