आचार्य वराहमिहीर यांच्या जयंतीच्या निमित्ताने…
कायथा : राजा विक्रमादित्य यांची राजधानी असलेल्या प्राचीन उज्जयिनी (सध्याचे उज्जैन) नगरापासून केवळ २५ किमी अंतरावर कायथा हे गाव आहे. ‘कपित्थक’ या नावावरून पुढे ‘कायथा’ हे नाव पडल्याचा उल्लेख ‘बृहज्जातक’ या ग्रंथात आढळतो. विशेष म्हणजे खगोलशास्त्र आणि फलज्योतिष्यविज्ञान यांत अद्भूत शोध लावणारे आचार्य वराहमिहीर यांचे हे जन्मस्थळ आहे; मात्र मध्यप्रदेश सरकारने आजपर्यंत त्याची नोंद घेतलेली नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कायथा या आचार्य वराहमिहीर यांच्या जन्मस्थळाच्या निमित्ताने त्यांचा नावलौकिक सर्वत्र व्हावा, या दृष्टीने सरकारने त्यांचे साधे स्मारकही येथे उभारलेले नाही. वर्ष २०१० मध्ये पंडित आनंद शंकर व्यास आणि त्यांच्या परिवाराने वराहमिहीर यांचे उभारलेले एकमेव स्मारक येथे आहे; मात्र त्याचीही सध्या उपेक्षाच होत आहे.
कोण होते आचार्य वराहमिहीर ?
५ व्या शतकात आचार्य वराहमिहीर यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. जोधपूर (राजस्थान) येथील ज्योतिषाचार्य पंडित रमेश भोजराज द्विवेदी यांच्या अभ्यासानुसार चैत्र शुक्ल पक्ष दशमीला त्यांचा जन्म झाला. वराहमिहिरांचे घराणे परंपरेने सूर्योपासक होते. त्यांचे वडील आदित्यदास हे त्यांचे ज्ञानगुरु होते. पारंपरिक सूर्योपासनेला तत्कालीन शिक्षण पद्धतीप्रमाणे केलेल्या ऋग्वेदाच्या अध्ययनामुळे तात्त्विक आणि शास्त्रशुद्ध आधार मिळाला असावा. प्राचीन काळी उदयाला आलेली भारतातील खगोलशास्त्र आणि फलज्योतिषशास्त्रही सूर्याला विश्वाचे केंद्र आणि विश्वातील घडामोडींचे आद्यकारण मानतात. सहाजिकच सूर्योपासक वराहमिहीर यांचे या दोन शास्त्रांच्या अध्ययनाकडे लक्ष वेधले गेले. वराहमिहीर यांनी या अध्ययनाला आपले जीवितकार्य मानले आणि मृत्यू येईपर्यंत ते अविरतपणे चालू ठेवले.
आचार्य वराहमिहीर यांची विद्वता आणि आधुनिक विज्ञानाला थक्क करणारे संशोधन
- गॅलिलियोच्या खूप पूर्वी पृथ्वी चेंडूसारखी गोल असल्याचे आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय विद्वत सभांमध्ये सप्रमाण सिद्ध केले.
- राजाच्या नवरत्नांपैकी ते प्रमुख म्हणजेच रत्नशिरोमणी होते. राजा विक्रमादित्यांच्या मुलाच्या मृत्यूविषयी आचार्य वराहमिहीर यांनी अत्यंत अचूक भविष्य वर्तवले होते. राजाने सर्व काळजी घेऊनही मुलाचा मृत्यू आचार्य वराहमिहीर यांच्या भाकिताप्रमाणेच झाला होता.
- बृहदसंहिता या ग्रंथात भूकंपाची कारणे, दिवस आणि वेळ यांचा विस्ताराने उल्लेख ! भूकंपाची पूर्व सूचना देणार्या भूकंप ढगाचे अचूक विवेचन केले.
- वराहमिहीर यांच्या बृहदसंहितेत ‘दकार्गल’ नावाचा अध्याय असून, त्यात भूमीवरील लक्षणांवरून भूगर्भांतर्गत पाण्याचा साठा कसा शोधून काढावा, याविषयी अत्यंत उद्बोधक आणि शास्त्रीय माहिती दिली आहे.
- अल-बिरौनी नावाचा अरब शास्त्रज्ञ आणि प्रवासी म्हणतो, ‘‘वराहमिहीर यांच्या प्रत्येक विधानाला शास्त्राचा आणि सत्याचा पाया आहे.’’
- वराहमिहीर यांच्या सिद्धांतांची उपयुक्तता १९८१ मध्ये आंध्रमध्ये चित्तूर जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळाच्या वेळी दिसून आली. त्या वेळी तिरुपतीच्या श्री. वेंकटेश्वर विद्यापिठाने इस्रो (भारतीय अवकाश संशोधन संस्था) आणि विद्यापीठ अनुदान मंडळ यांच्या साहाय्याने एक जलसंशोधन प्रकल्प हाती घेतला होता. त्याअंतर्गत बोअरवेल खोदल्या होत्या. एकूण १५० विहिरी खोदल्या आणि प्रत्येक विहिरीला पाणी लागले. या कामासाठी त्यांनी वराहमिहीराने दिलेल्या लक्षणांचे साहाय्य घेतले आणि पाणी शोधून काढले.
अध्ययन आणि ग्रंथसंपदा
खगोलशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भूगर्भशास्त्र, ज्योतिषशास्त्र, हवामानशास्त्र, प्राणिशास्त्र, जलशास्त्र या आणि अन्य शास्त्रांचा परस्परसंबंध आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास आणि विवेचन आचार्य वराहमिहीरांनी त्यांच्या ग्रंथात केला आहे. त्यांचा बृहदसंहिता हा ग्रंथ त्यांच्या या प्रदीर्घ, सखोल आणि व्यासंगपूर्ण अध्ययनाचा एक अनमोल ठेवाच आहे. वराहमिहीरांनी खगोलशास्त्रावर लिहिलेला पंचसिद्धांतिका ग्रंथ, तसेच बृहतजातक, लघुजातक हे ग्रंथही आज अभ्यासले जातात. आचार्य वराहमिहीरांनी या क्षेत्रात केलेले कार्य अचंबित करणारे आहे. त्यांच्या वैज्ञानिक विचारांची भारताने कास धरली असती, तर एव्हाना विज्ञानाच्या क्षेत्रात त्याने भरारी घेतली असती.
पुरातन गाव असलेल्या कायथा गावाचीही उपेक्षा !
कायथा या गावाविषयी ‘मिहीर विचार क्रांती मंच’चे श्री. महेश पाटीदार म्हणाले की, या गावात झालेल्या उत्खनात अनेक प्राचीन मूर्ती, ताम्रपत्रे सापडल्याने हे गाव ऐतिहासिक आणि पुरातत्व खात्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे. इतिहासतज्ञ श्री. विष्णुधर वाकणकर यांनी केलेल्या शोधामुळे १९६४ मध्ये कायथा गाव पुरातत्व खात्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर १९६५-१९६७ या काळात या गावात उत्खनन केले गेले. चित्रगुप्त यांची तपोभूमीही कायथाच आहे. असे असूनही या गावाची अद्याप उपेक्षाच होत आहे. किमान पर्यटनाच्या दृष्टीने तरी सरकारने या गावाचा विकास करायला हवा.
आचार्य वराहमिहीर यांच्या चरित्राच्या प्रसारासाठी प्रयत्न करणारे ‘मिहीर विचार क्रांती मंच’ !
कायथा येथील ‘मिहीर विचार क्रांती मंचा’चे श्री. अनिल पांचाळजी म्हणाले, ‘‘आचार्य वराहमिहीर यांच्या चरित्राचा प्रसार व्हावा, यासाठी आम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि ‘वराहमिहीर सन्मान’ देण्यास प्रारंभ केला आहे. हा सन्मान आचार्य वराहमिहीर यांच्यविषयी विशेष कार्य करणार्यांना दिला जातो. या वर्षी हा सन्मान जोधपूर येथील प्रसिद्ध भविष्यवक्ता, ज्योतिषाचार्य पं. रमेश भोजराज द्विवेदी यांना देण्यात येणार आहे.’’
आचार्य वराहमिहीर यांच्या खाजगी स्मारकाची दुःस्थिती !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात