Menu Close

तमिळनाडू येथील शिवाचे प्रत्यक्ष हृदयस्थान असलेल्या चिदंबरम् क्षेत्रातील प्रसिद्ध नटराज मंदिर !

chidambaram_nataraja_temple

चिदंबरम् म्हणजे आकाशतत्त्वाशी संबंधित शिवक्षेत्र !

हे तीर्थक्षेत्र आकाशतत्त्वाशी संबंधित शिवक्षेत्र आहे. हे मंदिर म्हणजे शिवाचे एक गूढ रहस्यच आहे. यालाच चिदंबरम् रहस्य, असे म्हणतात. हे अधिकतर शिवाच्या निर्गुण तत्त्वाशी संबंधित क्षेत्र आहे.

मंदिराचे स्थानमाहात्म्य

chidambaram_nataraja_temple_9
मानवी देहातील नवद्वाराचे प्रतीक म्हणून नटराज मंदिरावर बसवलेले नऊ कलश

अ. व्याघ्रपाद महर्षि आणि पतंजली महर्षि यांचे तपोस्थान : येथे पूर्वी जंगलच होते. याच जंगलात व्याघ्रपाद महर्षि आणि पतंजलि महर्षि तप करत असत. एकदा या दोघांनीही शिवाला प्रार्थना करून सांगितले, हे देवा, आम्हाला तुमचे तांडवनृत्य बघण्याची इच्छा आहे.

natraja
आनंद तांडव नृत्य करतांना शिव आणि पार्वती असे दृश्य असलेले मंदिरातील चित्र

आ. प्रत्यक्ष कैलासातून भूतलावर उतरून शिव-पार्वती यांनी या दोन महर्षींसाठी तांडवनृत्याचे दर्शन घडवणे : यावर कैलासातून शिव आणि पार्वती प्रत्यक्ष भूतलावर उतरले आणि त्यांनी या दोन महर्षींना याच ठिकाणी एकत्र येऊन आनंदतांडव दाखवले. याच ठिकाणी त्यांनी रुद्रतांडवाचेही दोघांना दर्शन घडवले.

chidambaram_nataraja_temple_2

इ. शिवाने आपली सगुण खूण म्हणून प्रत्यक्ष नटराज मूर्तीच्या रूपात प्रकट होणे आणि ही नटराज मूर्ती चिदंबरम् क्षेत्रात असणे : तांडवनृत्य पाहून देहभान हरपलेल्या महर्षींनी शिवाला प्रार्थना केली, हे देवा, तुमच्या या नृत्याच्या अस्तित्वाची खूण म्हणून आम्हाला काहीतरी सगुण रूपात द्या ! त्या वेळी स्वतःच शिव त्यांच्या नटराज रूपात मूर्तीतून येथे प्रकट झाले. याच स्वयंभू मूर्तीचे येथे आपल्याला दर्शन होते.

ई. चिदंबरम् मंदिरात शिवाने प्रत्यक्ष दिलेल्या चंद्रमौलेश्‍वर या स्फटिक लिंगाची पूजा होणे : याच ठिकाणी प्रत्यक्ष शिवाने स्वतःच चंद्रमौलेश्‍वर स्फटिक लिंगही अभिषेकासाठी व्याघ्रपाद ऋषींना दिले. शिवाच्या डोक्यावर असणार्‍या चंद्रापासून उत्पन्न झालेले हे स्फटिक लिंग असल्याने याला चंद्रमौलेश्‍वर असे नाव आहे.

उ. ब्रह्मलोकातून आलेली माणिक रत्नाची शिवमूर्तीही चिदंबरम् या क्षेत्रात असणे : याच वेळी ब्रह्मलोकातूनही ब्रह्मदेवाने माणिकाची शिवमूर्तीही महर्षींना दिली. यालाच रत्नाधिराज असे म्हणतात. ही शिवमूर्तीही येथे नटराज मूर्तीच्या चरणांशी एका बंद पेटीत ठेवलेली आढळून येते.

ऊ. मंदिरातील चिदंबरम् रहस्य म्हणजे शिवयंत्र आणि श्री यंत्र यांचा मिलाप होऊन तयार झालेले संमेलन यंत्र आणि या क्षेत्रात केवळ एक पोकळी आहे, असे पुराणकालापासून सांगण्यात येणे : जेथे प्रत्यक्ष शिव आणि पार्वती यांचे आनंदतांडव झाले, त्या जागेतील गूढ रहस्य अजून कोणालाच उमगलेले नाही. येथे शिवयंत्र आणि श्री यंत्र यांचा मिलाप होऊन तयार झालेले संमेलन यंत्रही पुराणकालापासून आहे. या ठिकाणी केवळ एक पोकळी आहे, असे म्हणतात. या चिदंबरम् रहस्याचे दर्शन तुम्हाला मंदिराला लावलेल्या पितळ्याच्या जाळीतून होते. त्या वेळी तुम्हाला तेथे वाहिलेली सोन्याची बिल्वपत्रे दिसतात; परंतु आत काय आहे, हे कळत नाही. सर्वांच्या मते हाच निर्गुण ईश्‍वर आहे.

ए. रुद्रतांडवामध्ये शिवाबरोबर नृत्य करतांना पार्वतीने महाकालीचे रूप धारण करणे, नृत्य करतांना शिवासारखी एक मुद्रा करता न आल्याने हरल्याने तेथून काली बाहेर निघून जाणे आणि आताही महाकालीचे हे स्थान चिदंबरम् क्षेत्राच्या बाहेरच असणे : ज्या ठिकाणी शिव आणि पार्वती यांनी रुद्रतांडव केले, तेथे त्या वेळी शिव आणि पार्वती यांच्यात नृत्याशी संबंधित स्पर्धा झाली. ती स्पर्धेतील चढाओढ इतकी रंगली की, देवीने साक्षात महाकालीचे रूप धारण करून रुद्र नर्तन करण्यास प्रारंभ केला. या वेळी नृत्य करतांना शिवाच्या कानातील रिंग खाली पडल्याने नाचता नाचता शिवाने एका पायाने ती रिंग उचलून तो पाय वर करून तेवढाच ताणून ती रिंग कानात घातली. भर सभेत शिवाने एक पाय ऊर्ध्व दिशेला नेल्याने अशी मुद्रा पार्वतीला करणे अशक्य झाले आणि ती येथे हरली आणि तशीच ती कालीच्या रूपात तेथून निघून गेली; म्हणूनही येथेही कालीचे मंदिर गावाबाहेरच आहे. म्हणून हे क्षेत्र शिव-पार्वतीच्या नृत्याशी संबंधित मानले जाते. शिव-पार्वतीचे नृत्य म्हणजेच संपूर्ण ब्रह्मांडाला प्राप्त होणारी गती असल्याने याचे विशेष महत्त्व आहे.

एे. देवळाचे शिखर, त्याची केलेली रचना ही प्रत्यक्ष मानवाच्या देहाशी संबंधित असणे आणि त्याचे विवरण : या देवळाचे शिखर सोन्याचे आहे. या शिखरावर आपल्या देहातील नवद्वारांचे प्रतीक म्हणून नऊ कलश बसवले आहेत. आपल्या शरिरात ७२ सहस्र नाड्या असल्याने तेवढे खिळेही यात बसवले आहेत. शिवाय आपला श्‍वासोच्छ्वास दिवसाला २२ सहस्र वेळा होत असल्याने तेवढ्या सोन्याच्या पट्ट्याही या शिखरात गुंफलेल्या आपल्याला आढळून येतात. त्यामुळे हे मंदिर म्हणजे आपल्या संपूर्ण देहाचेच प्रतीक आहे, असे लक्षात येते.

आे. चिदंबरम् क्षेत्र म्हणजे शिवाचे प्रत्यक्ष हृदयस्थान ! : हे मंदिर म्हणजे शिवाचे प्रत्यक्ष हृदयस्थान आहे, असे मानले जाते. तिरुवण्णामलई हे अग्नीक्षेत्र, म्हणजे शिवाचे नेत्रस्थान आहे, तर तिरुवानैकोईल येथे असणारे जंबुकेश्‍वर मंदिर म्हणजे शिवाचे कपाळ आहे, असे म्हणतात.

आै. व्याघ्रपाद, पतंजली आणि जैमिनी ऋषी यांच्याप्रती कृतज्ञता ! : येथेच व्याघ्रपाद, पतंजली आणि जैमिनी ऋषी यांच्या एकत्रित तपस्थानाचेही आपल्याला दर्शन घडते. ज्यांच्यामुळे साक्षात् शिव-पार्वतीच्या या तांडवातील सात्त्विकता नटराज मूर्तीच्या रूपात चिदंबरम् क्षेत्रात जतन करता आली, त्या महर्षींच्या चरणी कृतज्ञता.

जय शंभो शिव ! जय शंभो शिव !

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, तिरूचानूर, आंध्रप्रदेश

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात