‘भारताच्या दक्षिण-पूर्व किनार्यावरील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे रामेश्वरम् ! रामेश्वराच्या दर्शनाला हिंदु धर्मपरंपरेत विशेष महत्त्व आहे.
१. इतिहास
दशग्रंथी ब्राह्मण असलेल्या रावणाच्या वधानंतर अगस्ती ऋषींनी प्रभु श्रीरामाला ब्रह्महत्या निरसनार्थ सागरतीरावर ज्येष्ठ शुक्ल पक्ष दशमीच्या मुहुर्तावर शिवलिंगाची स्थापना करण्याचा आदेश दिला. या कार्यार्थ शिवाचे दिव्य लिंग आणण्यासाठी मारुति कैलासावर गेला; परंतु शिवाचे दर्शन न झाल्याने त्याने तप आरंभले. कालांतराने शिवाने प्रगट होऊन हनुमंताला स्वतःचे दिव्य लिंग दिले. या प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे मारुतीला मुहुर्ताची वेळ साधता आली नाही. त्या वेळी सीतेने एक वालुकामय लिंग बनवून दिले. ऋषींच्या आदेशानुसार रामाने मग त्याचीच स्थापना केली. हेच हे रामेश्वरलिंग होय. स्थानिक लोक त्याला ‘रामनाथ स्वामी’ असे म्हणतात. मारुति परतल्यानंतर जेव्हा त्याला श्रीरामाने लिंग स्थापन केलेले दिसले, तेव्हा त्याला फार दुःख झाले. मग रामाने त्याला स्थापित लिंगाच्या जवळच त्याने आणलेल्या लिंगाची स्थापना करण्यास सांगितले. तसेच त्याने स्थापलेल्या लिंगाचे दर्शन घेतल्या वाचून यात्रिकांना रामेश्वर दर्शनाचे फल मिळणार नाही, असेही सांगितले. या लिंगाला ‘काशीविश्वनाथ’ किंवा ‘हनुमदीश्वर’ असे नाव आहे
२. क्षेत्रमाहात्म्य
२ अ. काशीयात्रेला पूर्णत्व प्रदान करणारे तीर्थस्थान !
उत्तर भारतामध्ये जे काशीचे धार्मिक महत्त्व आहे, तेच महत्त्व दक्षिण भारतात रामेश्वरमला आहे. धर्मग्रंथांनुसार काशीची तीथर्यात्रा बंगालचा उपसागर (महोदधि) आणि हिंदी महासागर (रत्नाकर) यांच्या संगमावर असलेल्या धनुषकोडी येथे स्नान केल्यानंतर आणि त्यानंतर काशीच्या गंगाजलाने रामेश्वराला अभिषेक केल्यानंतरच पूर्ण होते.
२ आ. चारधाम यात्रेतील एक धाम !
रामेश्वरम् हे हिंदूंच्या पवित्र चारधाम यात्रेपैकी दक्षिणधाम आहे. हिंदूंच्या जीवनयात्रेची पूर्णता बद्रीनाथ, द्वारका, पुरी आणि रामेश्वरम् अशा चार धामांच्या यात्रेनंतरच होते.
२ इ. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग !
रामेश्वर हे भारतवर्षातील १२ प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे.
३. मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण स्थाने
३ अ. रामेश्ववर (रामनाथस्वामी) : सीतेने वाळूने बनवलेले हे शिवलिंग मुख्य दर्शनस्थान आहे.
३ आ. विश्वनाथ (हनुमदीश्वर) : हे हनुमंताने आणलेले शिवाचे आत्मलिंग होय.
३ इ. आत्मलिंगेश्वर : प्रभु श्रीरामाच्या पूजेसाठी आत्मलिंग मागतांना हनुमंताने शिवाकडे स्वतःसाठीही एक आत्मलिंग मागितले. हे शिवलिंग आत्मलिंगेश्वर म्हणून ओळखले जाते.
३ ई. नंदीदेव : रामेश्वरलिंगाच्या समोरच मृण्मय (मातीपासून बनवलेली) आणि श्वेतवर्णीय नंदीदेवाची मोठी मूर्ती आहे. या मूर्तीची उंची २२ फूट असून लांबी १७ फूट एवढी आहे. त्यासाठी मंदिराच्या आतच एक मंडपही आहे. या नंदीची उंची, लांबी अन् रुंदी दिवसेंदिवस वृद्धींगत होत असून त्याचे मस्तक सध्या मंडपाच्या छताला टेकले आहे. १९७४ मध्ये या नंदीची उंची १३ फूट आणि लांबी ८ फूट एवढी होती.
३ उ. गरुडस्तंभ : नंदीदेवाच्या जवळच सुवर्णाच्या पत्र्याने मढवलेला गरुडस्तंभ आहे.
३ ऊ. आंजेयन मंदिर : येथे १६ फुटाची हनुमतांची स्वयंभू मूर्ती आहे. तिचा खालील ८ फूट भाग हिंदी महासागरात असून वरील ८ फूट भाग मंदिरात दर्शनासाठी दिसतो. (मंदिर सागरी किनार्यावर असल्याने मंदिराच्या खालील भागात समुद्राचे पाणी आहे.)
३ ए. २२ तीर्थ : रामेश्वराच्या मंदिरात एकूण २२ तीर्थे असून त्यांपैकी ६ तीर्थे सर्वांत बाहेरच्या तिसर्या दालनात आहेत. या सर्व तीर्थांचे स्नान केल्यानंतरच रामेश्वराचे पूजन, अर्चन आणि दर्शन करायचे असते.
३ ऐ. रामकुंड, सीताकुंड आणि लक्ष्मणकुंड : ही कुंडे देवालयाच्या बाहेर आहेत. याच कुंडांवर यात्रेकरू स्नान, श्राद्धविधी इत्यादी धार्मिक कृत्ये करतात.
४. यात्राविधी
भाविक यात्रेकरू येथील सर्व पवित्र तीर्थांत क्रमाने स्नान करतात आणि नंतर रामेश्वराला काशीहून आणलेल्या गंगाजलाने अभिषेक करतात. तसेच रामेश्वरापासून बारा मैल दूर असलेल्या सेतुबंधावरील सेतू (वाळू) आणून आणि तो सेतू रामेश्वराच्या मंदिरातील सेतुमाधवाजवळ ठेवून त्याची पूजा करतात. हा सेतू प्रयाग येथील त्रिवेणीसंगमात विधीपूर्वक विसर्जित केल्यानंतरच या यात्रेची खरी सांगता होते.
५. हिंदुऐक्य साधणारे पुण्यस्थळ !
५ अ. सांप्रदायिक एकतेचे प्रतीक !
भारतातील सर्व धर्मस्थळे ही शैव आणि वैष्णव संप्रदायांमध्ये विभागली आहेत. रामेश्वरम् मात्र याला अपवाद आहे; कारण रामेश्वरम् हे शैव आणि वैष्णव या दोन्ही संप्रदायांसाठी वंदनीय आहे. विष्णूचा सातवा अवतार असलेल्या प्रभु श्रीरामाने साक्षात रामेश्वराची स्थापना केल्यामुळे हे स्थान
शैवक्षेत्र असूनही वैष्णवांसाठी वंदनीय आहे. प्रभु श्रीरामाने स्थापना केल्यामुळे येथील शिवलिंगाला ‘रामेश्वर’ असे म्हणतात.
५ आ. राष्ट्रीय एकतेचे प्रतीक !
रामायणाच्या काळापासून आजपर्यंत रामेश्वरम् हे भारताच्या एकात्मतेचे प्रतीक असलेले पुण्यस्थळ आहे; कारण काशीच्या विश्वेश्वराची यात्रा रामेश्वराच्या दर्शनाविना पूर्ण होत नाही. यातूनच हिंदु धर्मात भारताला एक सूत्रात बांधण्याची अद्भुत परंपरा आहे, हे लक्षात येते. या परंपरेमुळेच
येथे बाराही मास (महिने) यात्रिकांची गर्दी असते आणि सहस्रो वर्षे आसेतुहिमाचल भारतवर्षाचे एकात्म्य अनंत आघात होऊनही टिकून राहिले आहे.
६. रामेश्वर मंदिर
६ अ. इतिहास
या मंदिराची उभारणी प्रामुख्याने रामनाडच्या (आताच्या रामनाथपूरच्या) सेतुपती राजघराण्याने केलेली आहे. सांप्रतचे मंदिर वर्ष १४१४ मध्ये उदयन सेतुपती राजाने लंकेचा राजाधिपती परराजशेखर याच्या साहाय्याने उभारले आणि पुढे साडेतीनशे वर्षे सेतुपती घराण्यातील राजपुरुषांनीच त्याचा विस्तार केला. देवाची पहिली पूजा याच राजघराण्याची असते. येथील उपाध्ये महाराष्ट्रीय ब्राह्मण आहेत.
६ आ. मंदिराच्या वास्तूची भव्यदिव्यता !
हे मंदिर प्रचंड असून विस्तार आणि भव्यता यांच्या संदर्भात त्याच्याशी बरोबरी करणारे दुसरे मंदिर भारतात नाही. मंदिर द्राविड शिल्पपद्धतीने बांधलेले आहे. मंदिराचे क्षेत्रफळ १५ एकर भूमी एवढे आहे. मंदिराचे आवार उत्तुंग भिंतींनी बंदिस्त आहे. या आवाराची पूर्व-पश्चिम लांबी ८२५ फूट आणि दक्षिणोत्तर रुंदी ६५७ फूट आहे. मंदिराच्या चारही बाजूंना चार गोपुरे आहेत. त्यांपैकी पूर्वद्वारावरील गोपुराला दहा माळे (मजले) असून, पश्चिम द्वारावरील गोपुराला सात माळे (मजले) आहेत. चारही गोपुरांवर असंख्य मूर्ती कोरलेल्या आहेत. आतील मंदिरात तीन विस्तीर्ण दालने असून ती भव्य स्तंभांच्या रांगांनी विभागलेली आहेत. या दालनांची उंची इतकी आहे की, देवाच्या उत्सवमूर्तीच्या मिरवणुकीतील हत्ती अंबारीसह चालला, तरी छताच्या हंड्या-झुंबरे, दिवे यांना अंबारीचा धक्काही लागत नाही. प्रत्येक दालनाची लांबी ४०० फूट असून, रुंदी १७ ते २१ फूट आहे. या दालनांच्या घडणीत वापरलेल्या अनेक शिळा चाळीस-चाळीस फूट लांबीच्या आहेत.’
– श्री. चेतन राजहंस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात