-
सोमेश्वर देवस्थानानंतर श्री काळेश्वर महादेव संस्थानची कोट्यवधी रुपयांची जमीन लाटण्याचे षड्यंत्र!
-
महाराष्ट्रातील अनेक हिंदू मंदिरांच्या जमीनी संकटात !
अमरावती जिल्ह्यातील श्री सोमेश्वर देवस्थानची ५० कोटी रुपयांची जमीन कवडीमोल भावात विकण्याचा घोटाळा ताजा असतांना आता दर्यापुर तालुक्यातील श्री काळेश्वर महादेव संस्थानची कोट्यवधी रुपयांची जमीन लाटण्याचे दुसरे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे कोअर टीमचे राज्य पदाधिकारी श्री. अनुप जयस्वाल आणि महासंघाचे अमरावती जिल्हा निमंत्रक श्री. कैलास पनपालीया यांनी दर्यापुरच्या तहसिलदारांकडे लेखी तक्रार केली आहे. सदर देवस्थानच्या जमीनीच्या खरेदीचे बेकायदेशीर प्रकरण तात्काळ रद्द करण्याची आग्रही मागणी केली आहे.
पूर्वी ‘श्री काळेश्वर महादेव संस्थान’ या नावाने प्रसिद्ध असलेले देवस्थान ‘श्री कोंडेश्वर महादेव संस्थान’ या नावाने ओळखले जाते. या मंदिराच्या मालकीच्या भुजवाडा, ता. दर्यापुर, जि. अमरावती येथे शेत गट क्र. ६८ व ९२ या शेतजमीन आहे. सदर शेतजमीनी संस्थानला अनुक्रमे वर्ष १९१० व वर्ष १९१२ ला मिळालेल्या होत्या. सदर शेतजमीनीमधून मिळणारे उत्पन्नातून संस्थानवर खर्च होणे अपेक्षीत असतांना जमीन कब्जेदाराकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मंदिराला मिळत नाही. तसेच हे मंदिर अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या संस्थानचे सर्व विश्वस्त मृत झाल्याचा फायदा घेत सदर १५ एकर शेतजमीनीपैकी ६ एकर जमीन हडप करण्यासाठी दर्यापूर तहसिलदारांकडे शेतजमीनी खरेदी प्रकरण सुरू करण्यात आलेले आहे. या संदर्भातील खरेदीसाठीचा अर्ज पुरूषोत्तम पुंडलिकराव टाले यांनी केला आहे. खरे तर मंदिराच्या जमीनीचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासन आणि न्यायालय यांची असल्याचे निर्देश यापूर्वीच मा. सर्वाेच्च न्यायालयाने विविध न्याय-निवाड्यात दिलेले आहेत. तसेच कायद्यानुसार देवस्थानच्या जमीनीना कुळ कायदा लागू नसतांना महसूल विभागातील काही अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदेशीररित्या शेतजमीनी इतरांच्या घश्यात घालत आहे.
या मंदिराला कुळ कायद्याच्या तरतुदीनुसार सूट प्रमाणपत्र प्राप्त असल्याने मंदिराची शेतजमिनीला विक्री प्रमाणपत्र देण्याचे तहसिलदारांकडील प्रकरण त्वरीत रद्द करून दफ्तरी दाखल करण्याची मागणीही मंदिर महासंघाने केली आहे. शेतजमिनी प्रकरणात मंदिर महासंघाच्या वतीने पुढील पाठपुरावा सुद्धा करण्यात येणार आहे. सदर निवेदन देतांना दर्यापूर येथील मंदिराचे हितचिंतक सर्वश्री प्रदिप मलिये, गौरव बैताडे, ओम राणे, संदीप राजगुरे, गजानन शेंडोकार, अक्षय सरडे, दिनेश धोत्रे, तेजस गीरी आदी उपस्थित होते.
राज्यव्यापी अभियान !
संपूर्ण महाराष्ट्रात मागील काही काळापासून असे अनेक गैरप्रकार सुरू झाले असून याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. तसेच असे प्रकरण अन्य कुठे होत असल्याचे निदर्शनास आल्यास सर्व माहितीसह त्या विषयी मंदिर महासंघाला कळवण्यात यावे. या विरोधात लवकरच मंदिर महासंघातर्फे राज्यव्यापी अभियान चालवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली आहे.