Menu Close

नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिलांमध्ये स्वसंरक्षणार्थ जागृती

भायखळा, काळाचौकी, वरळी आणि वसई येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांचा सहभाग !

भायखळा येथे मार्गदर्शन ऐकतांना हिंदू
काळाचौकी येथे प्रात्यक्षिकांत सहभागी हिंदू

मुंबई – नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिलांमध्ये स्वसंरक्षणार्थ जागृती व्हावी, कुणावरही अवलंबून न रहाता त्यांनी स्वतः स्वरक्षणाचे प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हावे, यासाठी जागृती करण्यात आली. यामध्ये ‘महिलांची सद्य:स्थिती आणि प्रशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. शारीरिक स्तरावर सक्षम होण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर करून त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. यामध्ये भायखळा येथील श्री बाबदेव नवरात्रोत्सव मंडळ, काळाचौकी येथील अमर क्रीडा मंडळ नवरात्रोत्सव, वरळी येथील नेहरूनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आणि वसई येथील मंडळ यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचा शेकडो युवा-युवतींनी लाभ घेतला. हिंदु जनजागृती समितीने विरार फुलपाडा येथील दुर्गामाता दौडीत सहभाग घेतला.

वरळी येथे प्रात्यक्षिकांनंतर जमलेले हिंदू
वसई येथे मार्गदर्शन ऐकतांना महिला

सनातन संस्थेच्या वतीने ‘महिलांची सद्यस्थितीत आणि प्रशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान !

जे.जे. हॉस्पिटल कंपाऊंड येथील दैवत रंगमंच सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘महिलांची सद्यस्थिती आणि प्रशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. संस्थेच्या प्रवक्त्या सौ. धनश्री केळशीकर यांनी उपस्थित महिलांना संबोधित केले. त्या म्हणाल्या की, ‘सद्यस्थितीत महिलांवरील वाढते अत्याचार पाहता स्वसंरक्षण महत्त्वाचे ठरते. यासाठी महिलांनी कुणाच्या साहाय्याची अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर व्हावे. नवरात्रीमध्ये दुर्गामातेची उपासना करून स्वतःमधील शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढवावी. परिसरातील १०० महिला या वेळी उपस्थित होत्या. मंडळाच्या वतीने सौ. धनश्री केळशीकर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Related News