कोल्हापूर (महाराष्ट्र)– सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये घुसखोरीच्या विरोधात रोखठोक भूमिका घेण्याची नोंद असावी. त्यासाठी जागृत मतदारांनी जनमताचा दबाव निर्माण करावा, असे आग्रही प्रतिपादन राष्ट्रीय प्रवक्ते आणि ‘सुदर्शन’ टीव्हीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. कोल्हापुरातील कळंबा येथे शिवप्रेरणा यात्रेअंतर्गत थेट मतदार संपर्क आणि विविध सामाजिक संस्था पदाधिकार्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. प्रबोधन मंच आणि सकल हिंदु समाज यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते.
‘आगामी निवडणुकांमध्ये हिंदु घोषणापत्र सिद्ध करून ते सर्व पक्षांसमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय भूमिकेतून ठेवावे. त्याविषयी पक्ष आणि उमेदवार यांची भूमिका घोषित करून घ्यावी. हिंदूबहुल समाजाच्या हितासाठी याची नोंद सर्व राजकीय पक्ष घेतील, यासाठी व्यापक प्रमाणात प्रबोधन करावे’, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.
प्रारंभी श्री महालक्ष्मीदेवीची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी ‘प्रबोधन मंच’चे सुनील वांकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, गजानन तोडकर, दीपक देसाई, उदय भोसले, प्रसन्न शिंदे, निरंजन शिंदे, राजू तोरस्कर, विकास जाधव यांच्यासह विविध संस्था पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेंद्र अहिरे यांनी श्री. सुरेश चव्हाणके यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना हिंदु जनजागृती समितीचा ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथ भेट दिला.