कर्नाटक राज्यातील ‘हलालमुक्त दीपावली अभियान’ला प्रारंभ !
शिवमोग्गा (कर्नाटक) – काही वर्षांपासून भारतात हेतूपुरस्सर हलाल उत्पादनांसाठी मागणी केली जात आहे, त्यामुळे हिंदु व्यापार्यांना व्यापार करण्यासाठी हलाल प्रमाणपत्र घेणे आवश्यक झाले आहे. पूर्वी हलाल संकल्पना केवळ मांसाचे उत्पादन आणि इस्लामी देशांमध्ये निर्यात करण्यापुरती मर्यादित होती; परंतु आता भारतात पीठ, साखर, चॉकलेट, बिस्किटे इतर दैनिक उत्पादने, औषधे, सौंदर्यवर्धक, अशा विविध उत्पादनांचे हलाल प्रमाणिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदू दीपावलीच्या सणाच्या वेळी वस्तू खरेदी करतांना हलाल प्रमाणित वस्तू खरेदी करत नाही ना ?, याची तपासणी करावी लागेल. ही दीपावली ‘हलालमुक्त दीपावली’ साजरी करूया, असे आवाहन हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे शिवमोग्गा संयोजक श्री. दिनेश चौहान यांनी केले. ते २५ ऑक्टोबर या दिवशी शिवमोग्गा येथील रामण्णा श्रेष्ठी पार्कजवळ आयोजित केलेल्या हिंदु जागृती आंदोलनात बोलत होते.
भारत सरकारचे अधिकृत खाद्य सुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरण असूनही हलाल प्रमाणिकरण व्यवस्थेची आवश्यकता नाही; परंतु भारतात आज मोठ्या प्रमाणात हलाल अर्थव्यवस्था कार्यरत आहे. उत्तरप्रदेशसह अनेक राज्यांमध्ये हलाल प्रमाणपत्र अधिकृतपणे प्रतिबंधित केले गेले आहे. ‘हलाल जिहाद’ एक आर्थिक युद्ध आहे. हलाल जिहादच्या माद्यमांतून देशविरोधी शक्ती भारताला इस्लामी देशांत रूपांतरित करण्यासाठी स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करत आहेत, जी अनेक देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाला आव्हान देण्यास सिद्ध आहे. एकदा का ही अर्थव्यवस्था जगाला अस्थिर करण्यास इच्छुक जिहाद्यांच्या हाती गेली, तर त्याचे परिणाम भयंकर असू शकतात. त्यामुळे असे होऊ नये, यासाठी हिंदु जनजागृती समिती, हिंदु राष्ट्र समन्वय समिती आणि सर्व हिंदू संघटना एकत्र येऊन या दीपावलीत हलालमुक्त दीपावली साजरी करण्याविषयी जनजागृती करत आहेत. याअभियानांतर्गत आतापर्यंत मंगळुरूमध्ये जागृती आंदोलन झाले आहे. आता धारवाड, उडुपी, तुमकुरू, बेंगळुरूसह राज्यभर हे अभियान राबवण्यात येणार आहे.