Menu Close

वक्फ बोर्ड बरखास्त करा, हिंदु मंदिरे आणि हिंदूंच्या मालमत्ता मुक्त करा – संजय मरकड, अध्यक्ष, मढी कानिफनाथ देवस्थान

नगर येथील पत्रकार परिषदेत मागणी !

हिंदु देवस्थानांच्या भूमी आणि मालमत्ता यांवर दावा ठोकणारा वक्फ कायदाच रहित करणे आवश्यक ! – संपादक 

पत्रकार परिषदेत बोलतांना श्री. संजय मरकड (मध्यभागी), श्री. प्रसाद कोळसे (डावीकडे), श्री. अमोल वाघ

अहिल्यानगर (महाराष्ट्र) – महाराष्ट्रातील अनेक नाथभक्तांमध्ये एका ‘व्हिडिओ क्लिप’मुळे संभ्रम निर्माण झाला आहे. या क्लिपमध्ये वक्फ बोर्डाचा दावा दाखवला गेला असून मढी देवस्थानचे छायाचित्र दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक भाविकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून आमची भूमिका मांडण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे, असे पाथर्डी, मढी येथील ‘कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष संजय मरकड यांनी सांगितले. संजय मरकड यांनी ‘वक्फ बोर्ड बरखास्त करून, हिंदु मंदिरे आणि हिंदूंच्या मालमत्ता मुक्त करा’, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे. या पत्रकार परिषदेत अमोल वाघ आणि गुहा येथील देवस्थानचे कायदेशीर सल्लागार डॉ. प्रसाद कोळसे हेही उपस्थित होते. सर्व नाथपंथीय देवस्थाने अतिक्रमणापासून मुक्त करून ती देवस्थाने त्यांच्या पंथांना देण्याची मागणी या पत्रकार परिषदेत केली आहे.

नाथांची ठाणी परत मिळवल्याविना आम्ही हा लढा थांबवणार नाही ! – संजय मरकड

‘पुजारी’ हे देवस्थानच्या भूमींचे मालक नाहीत, ते भाडेपट्टेधारक अथवा कूळही ठरत नाहीत, ते केवळ व्यवस्थापकाच्या भूमिकेत आहेत, त्यामुळे या भूमी देवस्थानच्या आहेत, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याची प्रतही आम्ही जिल्हाधिकार्‍यांना दिली आहे; मात्र यावर अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. जी काही नाथांची ठाणी आहेत, नाथांचे पीर आहेत, त्या सर्व भूमी या नाथांच्याच आहेत, हे सर्व कह्यात घेतल्याविना आम्ही हा लढा थांबवणार नाही. हिंदूंच्या भूमी बळकावणारे हे वक्फ बोर्ड केंद्र सरकारने लवकरात लवकर बरखास्त करावे आणि हिंदु देवतांच्या भूमी मुक्त कराव्यात.

संजय मरकड यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !

१. वक्फ बोर्डाने वर्ष २०११, वर्ष २०१२ आणि वर्ष २०१७ मध्ये कानिफनाथ देवस्थानला नोटीस दिली आहे. सध्या ३ प्रकरणे वक्फ बोर्डामध्ये चालू आहेत आणि चौथे प्रकरण मढी येथील कानिफनाथ देवस्थानचे असून तेही वर्ष २००९ पासून चालू आहे. वक्फ बोर्डाने, मुसलमान समाजाने या देवस्थानावर त्यांचा हक्क सांगितला आहे. म्हणजेच सामाजिक माध्यमावर जी क्लिप प्रसारित होत आहे ती चुकीची नसून योग्य आहे.

२. कानिफनाथ एक राजयोगी होते. ७०० हत्ती, घोडे, उंट घेऊन ते फिरायचे. त्या काळामध्ये राजे महाराजांनी त्यांना इनामी भूमी दिल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ ७ ते ८ सहस्र एकर भूमी ही कानिफनाथ देवस्थानची आहे. त्यामुळे या सर्व भूमी या कानिफनाथ देवस्थानच्या असून वक्फ बोर्ड हे चुकीच्या पद्धतीने दावा सांगत आहे. जवळजवळ १ सहस्र एकर भूमीवर वक्फ बोर्डाने स्वत:चा हक्क सांगितला आहे.

३. आजही सातबारा पाहिल्यास नाव कानिफनाथ देवस्थानचे आहे; पण त्यावर दावा हा वक्फ बोर्डाचा आहे. मोगल आल्यानंतर त्यांनी देवस्थानचे नामांतर केले; पण मूळ जी ठिकाणे आहेत ती नाथ संप्रदायाची आहेत. मुसलमानांनी त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ही सर्व देवस्थाने अतिक्रमणमुक्त झाली पाहिजेत, त्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. सरकारने ही देवस्थाने अतिक्रमणमुक्त करून वक्फ बोर्डाने बळकावलेल्या सर्व भूमी देवस्थानच्या कह्यात द्याव्यात, अशी आम्ही मागणी करत आहोत.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News