Menu Close

श्री भवानीमातेच्या दर्शनाने ‘हिंदू जोडो’ यात्रेच्या जनजागृतीला तुळजापूर (महाराष्ट्र) येथून प्रारंभ

तुळजापूर (महाराष्ट्र) – महाराष्ट्राची कुलदेवता श्री भवानीमातेच्या दर्शनाने १३ नोव्हेंबर या दिवशी तुळजापूर येथून ‘हिंदू जोडो’ यात्रेच्या जनजागृती मोहिमेला प्रारंभ झाला. आदिनाथ संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष आणि पिठाधीश्वर श्री श्री २००८ महामंडळेश्वर कल्कीराम महाराज, उज्जैन येथील खाटुशाम श्री महाकाल आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सरस्वती आनंद महाराज (उज्जैन) यांच्या वंदनीय उपस्थितीत आदिनाथ संप्रदाय आणि शेकडो हिंदुत्वनिष्ठांनी ‘हिंदू जोडो’ यात्रेच्या यशस्वीतेसाठी श्री भवानीमातेचा आशीर्वाद घेतला. सर्व कार्यकर्त्यांनी श्री भवानीमातेची सामूहिक आरती केली. ढोल, ताशे, डमरू आदी पारंपरिक वाद्यांचा गजर करत श्री भवानीमातेच्या आशीर्वादाने ‘हिंदू जोडो’ यात्रेच्या जनजागृतीला शुभारंभ झाला.

या वेळी श्री पंतनाम जुना आखाड्याचे अध्यक्ष अनंत स्वरानंदगिरी महाराज, त्र्यंबकेश्वर येथील पू. कोडेश्वर महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. ‘हिंदू जोडो यात्रा’चे उत्तर प्रदेशचे राष्ट्रीय महासचिव आशुतोष आहिर, मुंबई अध्यक्ष मदन वाकडे, राष्ट्रीय संयोजक सौ. मनीषा गुरव यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

१. १८ नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ‘हिंदू जोडो’ यात्रेची जनजागृती केली जाणार आहे. ‘हिंदू जोडो’ यात्रेचा प्रचार करण्यासाठी राज्याचे मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर असे ७ विभाग करण्यात आले आहेत. नाशिक येथे जनजागृती यात्रेची सांगता होणार आहे.

२. ९ जानेवारी २०२५ पासून श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथील लाल चौक येथून यात्रेला प्रारंभ होणार आहे. १६ राज्यांतून मार्गक्रमण करत ही यात्रा कन्याकुमारीपर्यंत जाणार आहे. ७१ दिवस ही यात्रा चालणार आहे.

३. या यात्रेत देश-विदेशातील लाखो हिंदू धर्मप्रेमी सहभागी होणार आहेत. देशभरातील विविध भागांतील आणि संप्रदाय यांचे साधू-संत यात्रेत सहभागी होणार आहेत.

कार्यकर्त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या १ सहस्र अंकांचे वाटप !

या वेळी आदिनाथ संप्रदायाच्या कार्यकर्त्यांनी ‘हिंदू जोडो’ यात्रेच्या जनजागृती मोहिमेसाठी तुळजापूर येथे आलेल्या कार्यकर्त्यांना या मोहिमेचे वृत्त देणार्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या १ सहस्र अंकांचे वितरण केले. या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. सर्वाेत्तम जेवळीकर उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमित कदम, सनातन संस्थेचे श्री. संदीप बगडी उपस्थित होते.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News