पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पन्हाळा गडावर ‘एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सान्निध्यात’ ही मोहीम शौर्यपूर्ण वातावरणात पार पडली. यात गडहिंग्लज, संकेश्वर, निपाणी आणि कोल्हापूर परिसरांतील एकूण ५० धर्मप्रेमींचा सहभाग होता.
प्रथमतः जुना बुधवार पेठ येथे शिवकालीन मुद्रांचे पूजन करून जयघोषात मोहिमेचा प्रारंभ झाला. त्यानंतर नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीला वंदन करून मोहिमेचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. प्रथमेश गावडे यांनी स्पष्ट केला. यानंतर राजमार्गाने नायकीन सज्जा, सोमेश्वर तलाव, सज्जाकोटी, छत्रपती संभाजी महाराज मंदिर, शिवमंदिर यांचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व सांगितले. शेवटी अंबरखाना येथील शंभु महादेव मंदिराची सामूहिक स्वच्छता करण्यात आली.
मोहिमेच्या समारोपप्रसंगी श्री. प्रथमेश गावडे, मंदिर महासंघाचे जिल्हा समन्वय श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना ‘हर हर महादेव’च्या जयघोषात हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ दिली. या मोहिमेसाठी हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे आणि श्री. शंकर साठे उपस्थित होते.
विशेष
१. नरवीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद यांनी उपस्थितांना शिवा काशीद यांच्या बलीदानाचा प्रसंग आणि त्यातून प्रेरणा कशी घ्यायची ? हे विशद करून सांगितले.
२. पन्हाळा येथील श्री. विकास फल्ले यांनी धर्मप्रेमींच्या अल्पाहाराची सोय केली, तर श्री. अमरसिंह भोसले (सरकार) यांनी भोजनाची व्यवस्था केली.