Menu Close

हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांच्या वर येऊन राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी हिंदुत्वाची वज्रमूठ सिद्ध करावी – प.पू. गोविंददेव गिरी, कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास

आळंदी येथील अधिवेशनात वारकर्‍यांचा ‘धर्मजागर’ करण्याचा एकमुखी निर्धार !

आळंदी येथील अधिवेशनात वारकर्‍यांना मार्गदर्शन करताना प.पू. गोविंददेव गिरी महाराज

पुणे (महाराष्ट्र) – महाराष्ट्राच्या विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत प्रथमच हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांसह कशातच न अडकता हिंदु धर्मीय म्हणून हिंदुत्वाच्या सूत्रावर मतदान केले. जे हिंदु धर्माचे रक्षणकर्ते आहेत अशांना सत्तेपर्यंत पोचवणे यालाच आजच्या काळातील धर्मसंस्थापना म्हणता येईल. सद्यस्थितीत बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहे, हे त्यामुळे संकट आता आपल्या उंबरठ्यापर्यंत आले आहे. तरी यापुढील काळात हिंदूंनी सजग राहून जात-पात, संप्रदाय यांच्यावर येऊन राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी हिंदुत्वाची वज्रमूठ सिद्ध करावी, असे आवाहन अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. गोविंददेव गिरी यांनी केले. २६ नोव्हेंबरला श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे १८ वे वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा पार पडली. त्या प्रसंगी त्यांनी हे आवाहन केले. हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने पू. अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात वारकर्‍यांनी ‘धर्मजागर’ करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला. अधिवेशनाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय वारकरी परिषेदेचे प्रवक्ता ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर यांनी रसाळ वाणीत केले.

प.पू. गोविंददेव गिरी पुढे म्हणाले, ‘‘समाजाला, देशाला तारुन जाण्यासाठी, लोकांना जागवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा एकच शब्द पुरे आहे. त्यामुळे मी ‘शिवचैतन्य जागरण यात्रा’ चालू केली आहे. महाराष्ट्रात गेल्या ७०० वर्षांपेक्षा अधिक काळ वारकरी संप्रदाय-संत परंपरा यांनी लोकांना जागृत करण्याचे मोठे कार्य केले आहे. पंतप्रधानांनी ‘वक्फ बोर्ड’ रहित करण्याची घोषणा दिल्यावर काही लोकांनी या विरोधात आता रस्त्यावर उतरून विरोध करण्याची सिद्धता केली. त्यामुळे हिंदूंनीही यापुढील काळात त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची सिद्धता ठेवली पाहिजे, तसेच यापुढील काळात ‘हिंदू-हिंदू, भाई-भाई’ हीच घोषणा आपण दिली पाहिजे.’’

मान्यवरांनी व्यक्त केलेली विविध मनोगते

पू. अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) म्हणाले, ‘‘स्वामी विवेकानंद यांनी ज्याप्रमाणे धर्मयोद्धाचे कार्य केले त्याप्रमाणेच आज प.पू. गोविंद देवगिरी महाराज कार्य करत आहेत. प.पू. वक्ते बाबा यांनी हिंदुत्वासाठी फार मोठे कार्य केले. या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी धर्माचे कार्य करावे !’’ पालघर हिंदू शक्तीपीठाचे हिंदूभूषण श्री. भारतानंद सरस्वती महाराज म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे आम्ही पालघरसारख्या भागातही हिंदुत्वाचे कार्य चालू ठेवलेले आहे. या अधिवेशाच्या माध्यमातून सातत्यने धर्मजागृती करण्याचा प्रयत्न चालू आहेत. तरी आपण सर्वांनी यापुढील काळात संघटितपणे कृती करण्याचा निर्धार केला पाहिजे.’’ ह.भ.प. जर्नादन महाराज मेटे म्हणाले, ‘‘गेल्या पाच वर्षांपासून आम्ही गाव तिथे हनुमानचालिसा हा उपक्रम चालू केला असून देवगिरी प्रांतात ७०० हून अधिक गावात हा उपक्रम चालतो. लहान पिढी हीच पुढे जाऊन राष्ट्रासाठी कार्य करणारे असणारे त्यांच्यावर संस्कार होण्यासाठी गावागावात बालसंस्कार वर्ग चालू करणे आवश्यक आहे.’’ लातूर येथील शिवयोग भवन मठाधिपती श्री श्री आदिनाथ स्वामीजी म्हणाले, ‘‘तरुणांच्या हातात धर्माची धुरा देण्याची आवश्यकता असून देव, देश, धर्म यांसाठी युवकांनी सतत कृतीशील रहाण्याचा संकल्प केला पाहिजे.’’ स्वराज्य संघाचे अध्यक्ष प्रबोधनकार, कथाकार बाजीराव महाराज बांगर म्हणाले, ‘‘या निवडणुकीत वक्फ बोर्डाला कोट्यवधी रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. मुल्ला-मौलवी यांना १५ सहस्र रुपये वेतन देण्याची मागणी करण्यात आली होती. हे सर्व ‘फतवे’ हिंदूंनी मोडून काढले.’’ वीर देवस्थान येथील गुरव प्रसाद दळवीगुरुजी म्हणाले, ‘‘सद्यस्थितीत तरुण जागृत होत असतांना दिसतोय; मात्र तो अजून जागृत झाला पाहिजे. येणारी पिढी धर्मकार्यात सहभागी होण्यासाठी तिला धर्माचे आरचण शिकवावे लागेल !’’

आळंदी येथील अधिवेशनात उपस्थित वारकरी, भाविक

१० वर्षांच्या कु. ईश्‍वरी गजानन पाटील हिने सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या माध्यमातून धर्मशिक्षण घेण्याचे आवाहन केले. या अधिवेशनात मुंबई येथील ह.भ.प. विश्‍वनाथ महाराज वारींगे, ह.भ.प. रामकृष्ण महाराज लवीतकर, ह.भ.प. कारभारी अंभोरे महाराज यांसह अन्य मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी ‘लव्ह जिहाद’ची भयावहता सर्वांसमोर मांडली. विविध ठरावांचे वाचन करून पसायदानाने अधिवेशनाची सांगता झाली.

विशेष – हिंदूभूषण श्री. भारतानंद सरस्वती महाराज यांनी अधिवेशनात कालावधीत दिलेल्या घोषणांनी अधिवेशनात वारकर्‍यांमध्ये नवचैतन्य पसरले, तसेच श्री. विवेक सिन्नरकर यांनी ‘भारत हिंदुस्थान है-हिंदूओ की शान है’, हे गीत सर्वांकडून गावून घेतले. यामुळे हिंदुत्वाचा जागर जागवला गेला.

या प्रसंगी करण्यात आलेले विविध ठराव

‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण आदी तीर्थक्षेत्रे यांसह राज्यातील सर्व मंदिरे, तीर्थक्षेत्रे यांचा परिसर 100 टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावीत, पंढरपूर येथील चंद्रभागा अन् आळंदी येथील इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी, हिंदूंची भूमी-मंदिरे बळकावणारा ‘वक्फ’ कायदा रहित करावा, जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कायक्रम अंमलबजावणी समितीच्या सहअध्यक्ष पदावरून शाम मानव यांची तात्काळ हकालपट्टी करावी, देशात समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा यांसह विविध ठराव या अधिवेशनात करण्यात आले.

अधिवेशनात घोषणा देतांना वारकरी, भाविक

निरंजन शास्त्री कोठेकर महाराज आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी यांचे सत्कार !

ह.भ.प. निरंजन शास्त्री कोठेकर महाराज (डावीकडून तिसरे) यांचा सत्कार करतांना प.पू. गोविंददेव गिरी महाराज

या प्रसंगी वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष भागवताचार्य ह.भ.प. केशव महाराज उखळीकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी प.पू. गोविंददेव गिरी यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. सातत्याने धर्मकार्यासाठी देवीदास धर्मशाळा उपलब्ध करून देणारे आणि धर्मकार्यात अग्रेसर असणारे देवीदास धर्मशाळेचे अध्यक्ष ह.भ.प. निरंजन शास्त्री कोठेकर महाराज यांचा, तसेच वारकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांचा दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यातून वृत्त, लेख या माध्यमातून सातत्याने वाचा फोडणारे, इंद्रायणी-चंद्रभागेच्या प्रदूषणासाठी सातत्याने आवाज उठवणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. अजय केळकर यांचा प.पू. गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवर – ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे, सांस्कृतिक वार्तापत्राचे विश्‍वस्त आणि कीर्तनकार श्री. विवेक सिन्नरकर, कोल्हापूर येथील ह.भ.प. मधुसूदन महाराज पाटील, ह.भ.प.जगन्नाथ महाराज मस्के, अच्युत महाराज दस्तापूरकर, ह.भ.प. तुणतुणे महाराज, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित, पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्‍वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, पालघर हिंदू शक्तीपीठाचे हिंदूभूषण श्री. भारतानंद सरस्वती महाराज, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर.

Related News