सिंहगडावर धर्मप्रेमींनी छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात अनुभवला शक्ती आणि भक्ती यांचा अभूतपूर्व संगम !
पुणे (महाराष्ट्र) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात सिंहगडावर २४ नोव्हेंबर या दिवशी ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ ही मोहीम घेण्यात आली. आदिशक्ती भवानीमातेच्या चरणी, तसेच श्री कोंढाणेश्वर आणि श्री अमृतेश्वर यांच्या चरणी सामूहिक प्रार्थना करून या मोहिमेला आरंभ झाला. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून समितीचे श्री. श्रीकांत बोराटे आणि श्री. दीपक आगावणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपस्थित धर्मप्रेमींनी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ नामजप केला, तसेच रामराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. या मोहिमेला पुणे जिल्हा, तसेच भोर, वाघळवडी, दौंड, नवलेवाडी आदी ठिकाणचे १७० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
तानाजी मालुसरे यांचा जाज्वल्य इतिहास !
तानाजी कडा, बुलंद दरवाजा कल्याण दरवाजा, तानाजी मालुसरे यांचे समाधी स्थान, कोंढाणेश्वर मंदिर यांसारख्या अनेक ठिकाणची माहिती उपस्थित धर्मप्रेमींना देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी आध्यात्मिक बळाच्या आधारावर कशा प्रकारे धर्मकार्य केले, याविषयी मार्गदर्शन झाले.
गड-दुर्ग स्फूर्तीस्थळे व्हावीत, यासाठी प्रयत्नशील असणार्या समितीच्या उपक्रमांचे कौतुक !
मोहिमेच्या अंतिम टप्प्यात सर्व धर्मवीरांनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. ज्याप्रमाणे गडावर मावळ्यांना तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी यांचे प्रशिक्षण दिले जायचे, त्याच प्रकारचे प्रशिक्षण आज आपल्याला या काळात मिळत आहे, असे सर्वांनी अनुभवले.
छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने आणि मावळ्यांच्या पवित्र रक्ताने पावन होऊन त्यांच्या अतुलनीय साहसाची, बलीदानाची आठवण करून देणारे हे गड-दुर्ग केवळ पर्यटनस्थळे न रहाता स्फूर्तीस्थळे व्हावीत, यासाठी प्रयत्नशील असणार्या समितीच्या या उपक्रमाचे गडावरील उपस्थित पर्यटक, व्यावसायिक, शिवप्रेमी, दुर्गप्रेमी यांनी कौतुक केले.