Menu Close

ब्रिटनच्या संसदेत बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांवर व्यक्त करण्यात आली चिंता !

भारताच्या संसदेत अशी चिंता अद्याप व्यक्त करण्यात आलेली नाही, तसेच तेथील हिंदूंचे रक्षण करण्याच्या संदर्भात पावले उचलण्याचेही प्रयत्न अद्याप दिसून आलेले नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक 

ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमन व परराष्ट्रमंत्री कॅथरिन वेस्ट

ढाका (बांगलादेश) – ब्रिटनच्या संसदेतील हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहामध्ये खासदारांनी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांविषयी चिंता व्यक्त केली.

बांगलादेशावर कारवाई करण्याचे ब्रिटनचे दायित्व ! – खासदार बॉब ब्लॅकमन

हुजूर (कंझर्व्हेटिव्ह) पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन म्हणाले की, बांगलादेशामध्ये शेख हसीना सत्तेतून बाहेर पडल्यानंतर हिंदूंना नष्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. हिंदूंची घरे जाळण्यात आली आहेत. त्यांची दुकाने आणि घरे यांची तोडफोड केली जात आहे. पुजार्‍यांना अटक केली जात आहे. या प्रकरणावर कारवाई करण्याचे दायित्व ब्रिटनचे आहे; कारण त्यानेच बांगलादेशला मुक्त केले. (ब्रिटनमधील एका ख्रिस्ती खासदाराला बांगलादेशातील हिंदूंविषयी जे वाटते, ते भारतातील किती हिंदु खासदारांना वाटते ? – संपादक)

भारत सरकारच्या चिंतेची आम्हाला जाणीव ! – ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री

परराष्ट्रमंत्री कॅथरिन वेस्ट गेल्या महिन्यात बांगलादेशात गेल्या होत्या. त्या वेळी युनूस सरकारने अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण करण्याचे आश्‍वासन दिले होते, याची माहिती वेस्ट यांनी संसदेत दिली. (ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री बांगलादेशात जाऊन हिंदूंच्या संरक्षणाचे सूत्र उपस्थित करतात; मात्र भारतातून असा कोणताही प्रयत्न होत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक) त्या म्हणाल्या की, आम्हाला भारत सरकारच्या चिंतेची जाणीव आहे.

आमची सहानुभूती बांगलादेशातील हिंदूंसमवेत ! – खासदार प्रीती पटेल

ब्रिटनच्या खासदार प्रीती पटेल

हुजूर (कंझर्व्हेटिव्ह) पक्षाच्या खासदार प्रीती पटेल म्हणाल्या की, बांगलादेशामध्ये हिंसाचार चालू आहे जो तेथील सरकार थांबवू शकत नाही. याचा आम्हाला खूप त्रास झाला आहे. आमची सहानुभूती बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंसमवेत आहे.

मजूर (लेबर) पक्षाचे खासदार बॅरी गार्डिनर म्हणाले की, ब्रिटीश सरकार बांगलादेशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News