पोलिसांशी साटेलोटे करून गुन्हा लपवण्यासाठी चित्रे हटवली; समितीची कारवाईची मागणी !
‘दिल्ली आर्ट गॅलरी’मध्ये ‘हुसेन : द टाइमलेस मॉडर्निस्ट’ या नावाने भरवण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनामध्ये हिंदुद्वेषी चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांनी रेखाटलेली हिंदु देवीदेवतांची नग्न आणि आक्षेपार्ह चित्रे लावण्यात आली होती. ती आक्षेपार्ह चित्रे तात्काळ हटवण्यात यावी, तसेच दिल्ली आर्ट गॅलरीच्या संचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली होती. या संदर्भात समितीच्या वतीने अधिवक्ता अमिता सचदेवा यांनी ‘संसद मार्ग पोलीस ठाण्यात ९ डिसेंबरला तक्रार केली होती. त्यानंतर सदर आक्षेपार्ह चित्रे आयोजकांकडून रातोरात हटवण्यात आली आणि ‘तशी चित्रे नव्हतीच’ असा दिखावा करण्यात आला. आमच्या तक्रारीनंतर देवतांची चित्रे हटवली गेली, हे साध्य झाले असले, तरी जोवर आयोजकांवर कारवाई होत नाही, तोवर आम्ही हा लढा चालूच ठेवू, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी मांडली. धर्मयोद्धा अधिवक्ते, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संघटितपणे दिलेल्या लढ्याला आलेले यश आहे, असेही श्री. सुर्वे या वेळी म्हणाले.
जरी ‘तेथे अशी चित्रेच नव्हती’, असा कांगावा आयोजकांनी पोलिसांसमोर केला असला; तरी त्या चित्रांचे फोटो आणि अन्य पुरावे आमच्याकडे आहेत. आयोजकांनी जाणीवपूर्वक स्वत:चा गुन्हा लपवण्यासाठी ती चित्रे रातोरात हटवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भातील दुसरी तक्रारही हिंदु जनजागृती समितीने संसद मार्ग पोलीस ठाण्यात करत प्रदर्शनस्थळी असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेण्याची मागणीही समितीने केली आहे.
या चित्रप्रदर्शनातील एका चित्रांमध्ये भगवान श्री गणेशाच्या मांडीवर एका नग्न स्त्री (अर्थात् रिद्धी/सिद्धी या देवींपैकी एक) बसलेले दर्शवले आहे. दुसर्या एका चित्रात भगवान हनुमान एक नग्न स्त्रिला (अर्थातच सीतामातेला) एका हातात घेऊन उडत असल्याचे दाखवले आहे. तर अन्य एका चित्रात शिर नसलेले भगवान शिव आणि त्यांच्या मांडीवर एक नग्न स्त्री असे अत्यंत आक्षेपार्ह चित्र रेखाटले आहे. ही चित्रे हिंदूंच्या धार्मिक भावना हेतूतः दुखावणारी असून आयोजकांवर भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (अ) आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी समितीने केली आहे. हेच जर अन्य धर्मीयांच्या श्रद्धास्थानांच्या बाबतीत घडले असते, तर दिल्लीतही ‘सर तन से जुदा’चे नारे लावत दंगली झाल्या असत्या, असेही श्री. सुर्वे या वेळी म्हणाले.
यापूर्वीही हिंदुद्वेषी चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांनी रेखाटलेल्या भारतमाता आणि हिंदु देवता यांची नग्न आणि अश्लील चित्रे रेखाटून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. त्यांच्याविरोधात देशभरात १२५० अधिक पोलीस तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर हुसेन यांनी देश सोडून पळ काढला आणि वर्ष २०११ मध्ये त्यांचे निधन झाले. दिल्ली ऑट गॅलरीतील लढ्यामध्ये सर्वाेच्च न्यायालयातील जेष्ठ अधिवक्ता मकरंद अडकर, अधिवक्ता शांतनू, अधिवक्ता केसरी, अधिवक्ता विक्रम, अधिवक्ता यादवेंद्र, सनातन स्वाभिमान सभा अध्यक्ष ब्रिजेश शर्मा आणि समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे सहभागी झाले होते.