Menu Close

हिंदु जनजागृती समितीकडून वृंदावन (उत्तरप्रदेश) येथे आयोजित प्रांतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन !

वृंदावन (उत्तरप्रदेश) – येथील बालाजी धाम मंदिर परिसरात हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने प्रांतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन आयोजित करण्‍यात आले होते. या अधिवेशनात उत्तरप्रदेश, पंजाब, राजस्‍थान, मध्‍यप्रदेश, हरियाणा, उत्तराखंड आणि जम्‍मू यांसह विविध राज्‍यांतील १२० हून अधिक हिंदुत्‍वनिष्‍ठ, संत, अधिवक्‍ता, विचारवंत, मंदिरांचे विश्‍वस्‍त, संपादक, उद्योजक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सहभागी झाले. या अधिवेशनाला आचार्य महामंडलेश्‍वर प्रणवानंद सरस्‍वती, ‘श्री वृंदावन बालाजी देवस्‍थान’चे संस्‍थापक पू. डॉ अनुराग कृष्‍ण पाठक, पू. पवन सिन्‍हागुरुजी आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्‍थिती लाभली.

या अधिवेशनात ‘हिंदु सेवा परिषदे’चे प्रदेशाध्‍यक्ष श्री. अतुल जेसवानी, ‘हिंदु टायगर फोर्स’चे जबलपूरचे अध्‍यक्ष श्री. नितेश पटेल, ‘श्रीराम युवा सेने’चे प्रदेश महामंत्री श्री. हरिश जोशी यांनी त्‍यांच्‍या संघटनेच्‍या माध्‍यमातून राष्‍ट्र आणि धर्म रक्षणाच्‍या केलेल्‍या कार्याविषयी अनुभवकथन केले.

संतांनी केलेले मार्गदर्शन

आचार्य महामंडलेश्‍वर प्रणवानंद सरस्‍वती

आचार्य महामंडलेश्‍वर प्रणवानंद सरस्‍वती

बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्‍याचार चिंताजनक आहेत. भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव टाकून तेथील हिंदूंच्‍या मानवी हक्‍कांचे संरक्षण करावे.

प. पू. त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍य महाराज, वृंदावन

प. पू. त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍य महाराज

भारत जेवढा समृद्ध होईल, तेवढे विश्‍व समृद्ध होईल. भारत शक्‍तीशाली होणे, म्‍हणजे मानवता शक्‍तीशाली होण्‍यासारखे आहे. कोणत्‍याही हिंदु राजाने इतरांचे धर्मांतर करण्‍यासाठी आक्रमण केले नाही. आज काही लोक विश्‍वात आतंकवाद पसरवत आहेत, ही त्‍यांची शिकवण आहे. त्‍यांच्‍या जीवनात मानवता आणि अहिंसा यांचे दर्शन नाही. जे भित्रे लोक होते, त्‍यांनी धर्मपरिवर्तन केले आहे.

पू. डॉ. अनुराग कृष्‍ण पाठक 

काशी आणि मथुरा येथील विवादास्‍पद जागेच्‍या खटल्‍याची सुनावणी जलद गती न्‍यायालयामध्‍ये करण्‍यात यावी.

पू. पवन सिन्‍हागुरुजी

पू. पवन सिन्‍हागुरुजी

उत्तरप्रदेश सरकारने राज्‍यात हलाल प्रमाणपत्रावर बंदी घातल्‍याच्‍या निर्णयाचे स्‍वागत आहे.देशभरात अवैध हलाल प्रमाणपत्रांवर बंदी घातली गेली पाहिजे.

भारताची सांस्‍कृतिक अस्‍मिता जपण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र आवश्‍यक ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

भारताची सांस्‍कृतिक अस्‍मिता आणि अखंडता जपण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना आवश्‍यक आहे. अमेरिकेतील ‘प्‍यू रिसर्च सेंटर’च्‍या अहवालाचा संदर्भ देत त्‍यांनी चेतावणी दिली की, वर्ष २०५० पर्यंत भारत हा जगातील सर्वांत अधिक मुसलमान लोकसंख्‍या असलेला देश होणार आहे. सद़्‍गुरु डॉ. पिंगळे यांनी मणीपूर आणि मिझोराम येथे ‘स्‍वतंत्र ख्रिस्‍ती राष्‍ट्र’ निर्माण करण्‍याच्‍या धमक्‍यांविषयी चिंता व्‍यक्‍त केली, तसेच वक्‍फ कायद्यांचा गैरवापर करून ‘लँड जिहाद’ चालू असल्‍याचा उल्लेख त्‍यांनी या वेळी केला.

‘श्री वृंदावन बालाजी देवस्‍थान’चे संस्‍थापक पू. डॉ. अनुराग कृष्‍ण पाठक यांनी हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याचे केलेले कौतुक !

पू. डॉ. अनुराग कृष्‍ण पाठक यांनी अधिवेशनासाठी ‘श्री वृंदावन बालाजी देवस्‍थान’चे सभागृह उपलब्‍ध करून दिले, तसेच अधिवेशनाच्‍या व्‍यवस्‍थेच्‍या अनुषंगाने त्‍यांनी सर्वोतोपरी साहाय्‍य केले. समितीने आयोजित केलेले अधिवेशन पाहिल्‍यानंतर त्‍यांना पुष्‍कळ आवडले आणि त्‍यांनी कौतुक केले. या वेळी त्‍यांनी ‘‘प्रतिवर्षी येथेच अधिवेशन घ्‍यावे’, अशी सूचना केली. ते म्‍हणाले, ‘‘इतक्‍या शांततेत इतक्‍या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन पहिल्‍यांदा पाहिले.’’ समितीच्‍या साधकांचा सेवाभाव पाहून त्‍यांना पुष्‍कळ आनंद झाला. पू. डॉ. पाठक हे ‘आध्‍यात्मिक गुरु’ म्‍हणून प्रसिद्ध आहेत. सनातन धर्म आणि इतिहास यांविषयी  त्‍यांचा गाढा अभ्‍यास आहे. श्री वृंदावन बालाजी देवस्‍थानातील त्‍यांचा कक्ष म्‍हणजे जणू ग्रंथालय आहे.

हिंदुत्‍वनिष्‍ठांनी अधिवेशनात केलेले मार्गदर्शन

१. श्री. समीर कुमार, सेवानिवृत्त सनदी अधिकारी, देहली

देवीदेवतांचा अवमान करणार्‍या फेसबुकच्‍या खात्‍यांवर बंदी आणायचे, हे फेसबुकच्‍या धोरणांमध्‍ये बसत नसेल, तर त्‍यांनी ते पालटण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यासाठी फेसबुकसारख्‍या विदेशी आस्‍थापनांवर दबाव आणायला हवा. त्‍यांना भारतात कार्य करायचे असेल, तर त्‍यांना देशाच्‍या मानबिंदूंचा आदर करावा लागेल.

२. श्री. राहुल दिवाण, सरयू फाऊंडेशन

भारतात हिंदु राष्‍ट्र आणायचे असेल, तर एकमेव उपाय म्‍हणजे मोठ्या प्रमाणात मुसलमानांची ‘घरवापसी’ करणे. इराण, सौदी अरेबिया येथील लोक आज मोठ्या प्रमाणात इस्‍लामला सोडचिठ्ठी देत आहेत. भारतातही असे मुसलमान आहेत, ज्‍यांना इस्‍लाम सोडायचा आहे. ‘एक्‍स मुस्‍लिम’ (पूर्वी इस्‍लाममध्‍ये असलेले मुसलमान) नावाने एक अभियान चालू झाले आहे, ज्‍या माध्‍यमातून लोक इस्‍लामचे खरे स्‍वरूप पुढे आणत आहेत. त्‍यामुळे हिंदु संघटनांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन अशा लोकांना ‘घरवापसी’साठी साहाय्‍य करावे.

३. श्री. ललित महेश्‍वरी, विश्‍व हिंदु परिषद, मुजफ्‍फरनगर  

उत्तर भारतात तरुणी मोठ्या प्रमाणात मेहंदी काढतात. करवा चौथ सणाच्‍या वेळेस तर मेहंदी लावण्‍याचा भाग अधिक असतो. अशा वेळी अनेक अन्‍य धर्मीय तरुण मेहंदी काढण्‍याच्‍या माध्‍यमातून हिंदु मुलींना त्‍यांच्‍या जाळ्‍यात ओढायचे प्रयत्न करतात. त्‍यामुळे विश्‍व हिंदु परिषदेने मुजफ्‍फरनगरमधील हिंदु तरुणींना मेहंदी लावण्‍याचे प्रशिक्षण दिले आणि हिंदु मुलींना मोठ्या प्रमाणात या व्‍यवसायात येण्‍यासाठी साहाय्‍य केले.

४. सुश्री नीरा मिश्र, अध्‍यक्षा, द्रौपदी ड्रीम ट्रस्‍ट

वर्ष १९६५ मध्‍ये यमुना नदीवर पहिले धरण बांधण्‍यात आले. त्‍यानंतर अनेक ठिकाणी धरणे बांधून पाणी अडवण्‍यात आले, तसेच अनेक ठिकाणी मोठमोठी इंजिन लावून वीजनिर्मिती प्रकल्‍प उभारण्‍यात आले. याचसमवेत हरियाणामध्‍ये शेतीसाठी कालव्‍याच्‍या माध्‍यमातून पाणी सोडण्‍यात आले. परिणामी देहलीमध्‍ये पुष्‍कळ न्‍यून पाणी यायला लागले आणि देहलीतूनच २ राज्‍यांना पाण्‍याचे विभाजन करण्‍यात आले. त्‍यामुळे देहलीच्‍या पुढे यमुनेचे अस्‍तित्‍व राहिले नाही. आज जे पाणी येत आहे, ते नाल्‍याचे आहे. यमुना नदी लुप्‍त होण्‍याच्‍या मार्गावर आहे.

५. सौ. तुलिका सिंह, लेखिका, ‘अश्‍वत्‍थ ट्री बुक्‍स’, संस्‍थापक, देहली

आज कथांच्‍या पुस्‍तकांमध्‍ये ‘हिंदु’ आणि ‘सनातन’ असे शब्‍द पाहिल्‍यावर अनेक शाळांच्‍या मुख्‍याध्‍यापकांनी ‘आमची पुस्‍तके छान आहेत; पण ती वाचनालयात ठेवू शकत नाही’, असे सांगितले; कारण त्‍यांच्‍या शाळेत अन्‍य पंथीय शिक्षकही आहेत. यातून हिंदूची स्‍वधर्माविषयी असलेली शोकांतिका लक्षात येते.

६. श्री. आझाद विनोद, सुदर्शन वाहिनी संघटना, देहली

हिंदु जनजागृती समिती ही एक व्‍यासपीठ आहे, ज्‍याच्‍या माध्‍यमातून संघटित होऊन सर्व संघटना एकत्रित कार्य करत आहेत.

७. श्री. विनोद यादव, धर्मरक्षक, भोपाळ, मध्‍यप्रदेश 

आजच्‍या हिंदूंना शत्रूबोध नाही. ते रामाचे भक्‍ती करतात; पण रामाचे कार्य, म्‍हणजेच धर्माचे कार्य करायला पाहिजे, हे त्‍यांच्‍या लक्षात येत नाही. जसे विभीषण रामाचा भक्‍त होता; पण तो रावणाच्‍या लंकेतून जेव्‍हा रामाकडे आला आणि त्‍याने रामाच्‍या कार्यासाठी रावणाचे गुपित उघड केले, तेव्‍हा तो खर्‍या अर्थाने कृपेस पात्र झाला. त्‍यामुळे हिंदूंनी देवाच्‍या कृपेसाठी धर्माचे कार्य करणे आवश्‍यक आहे. हिंदु जनजागृती समिती मला पुष्‍कळ जवळची वाटते; कारण ही ईश्‍वरी प्रेरणेने कार्य करणारी एकमेव संस्‍था आहे.

क्षणचित्रे

१. हिंदु विधीज्ञ परिषदेच्‍या अधिवक्‍त्‍या अमिता सचदेवा या न्‍यायालयीन मार्गाने लढा देत असतात. या कार्यासाठी त्‍यांचा पू. समानंद गिरी महाराज यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

२. या अधिवेशनात ‘बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या आक्रमणातून आपण काय शिकलो ?,’ या विषयावर एक परिसंवाद घेण्‍यात आला.

३. जयपूर, अजमेर, झुनझुनू येथून आलेल्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांनी ‘आम्‍ही आमच्‍या भागात अशा प्रकारचे अधिवेशन आयोजित करू’, असे सांगितले.

४. या वेळी काशी आणि मथुरा या दोन्‍ही न्‍यायालयीन विवादासंदर्भात ‘स्‍वाक्षरी अभियान’ प्रारंभ करण्‍यात आले आणि ‘ऑनलाईन याचिके’चाही प्रारंभ करण्‍यात आला.

अभिप्राय

१. पिंकी कौशिक, संयोजिका, दुर्गावाहिनी, सोनिपत : हिंदु जनजागृती समितीच्‍या सर्व साधकांना भेटून पुष्‍कळ आनंद झाला. एवढा आनंद आपल्‍या नातेवाइकांनाही भेटून होत नाही.

२. अधिवक्‍ता मोहन कौशिक, विधी प्रकोष्‍ठ, विश्‍व हिंदु परिषद, सोनिपत : हिंदु जनजागृती समिती एक माळ आहे, ज्‍यात सर्व मोतीरूपी संघटना एकत्रित आल्‍या आहेत.

Related News