बांगलादेशातील हिंदूंच्या हत्येला कारणीभूत असलेले पंतप्रधान महंमद युनूस शांतीचा ‘नोबेल’ पुरस्कारप्राप्त असणे हास्यास्पद – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था
मुंबई (महाराष्ट्र) – बांगलादेशातील हिंदूंच्या हत्येला कारणीभूत असलेले बांगलादेशाचे पंतप्रधान महंमद युनुस हे शांतीचा ‘नोबेल’ पुरस्कारप्राप्त असणे हे हास्यास्पद आहे. भारतात सर्व सुखसोयी उपभोगूनही असुरक्षित म्हणवणार्यांना आणि ‘गाझा वाचवा’ म्हणून रस्त्यावर आंदोलन करणार्यांना बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार दिसत नाही का ? असा प्रश्न सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी येथे उपस्थित केला. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ मुंबईतील वरळी येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आयोजित आंदोलनात त्या बोलत होत्या. या वेळी भाजपच्या सौ. आरती खुळे, सर्वश्री दीपक सामंत, नागेश तांबेडकर, विजय गोवळकर, शैलेश सिंह, डॉ. नीलेश मानकर या मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.
आंदोलनात श्रीबोधानंद भक्त समाजाचे श्री. रापलेली ज्ञानेश्वर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. संदीप देसाई आणि श्री. महादेव कन्ना, शिवसेनेचे श्री. रमेश साधुला, बजरंग दलाचे श्री. गंगाप्रसाद गजुला आणि ‘श्री सत्यानंद महर्षी मंडळा’चे श्री. मार्गम राजपाल, तसेच सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते अन् श्री. अनिल मांडवकर, श्री. मनीष सायिनी, श्री. गंटुका परशुराम आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
बांगलादेशाने भारताचा विश्वासघात केला ! – शैलेश सिंह, वरळी विधानसभा महामंत्री, भाजप
वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तान आजच्या बांगलादेशातील जनतेवर सैन्याच्या साहाय्याने अत्याचार करत होता. तेथील हिंदु, बौद्ध, मुसलमान अशा सर्वच धर्मांतील लोकांच्या हत्या करत होता. त्या वेळी भारताने सैनिकी कारवाई करून बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तोच बांगलादेश आज तेथील अल्पसंख्यांक हिंदु, बौद्ध आणि शीख धर्माच्या लोकांची हत्या करत आहे. बांगलादेशाने भारताचा केलेला हा विश्वासघात आहे.
बांगलादेशातील हिंदु बांधवांचे रक्षण करणे हे आपले नैतिक दायित्व ! – सौ. आरती खुळे, दक्षिण मुंबई जिल्हा महामंत्री, भाजप
‘धर्मो रक्षित रक्षितः’ या उक्तीप्रमाणे आपण आपल्या धर्माचे रक्षण केले, तर धर्म आपले रक्षण करील. म्हणून हिंदु धर्माचे आचरण करणार्या बांगलादेशातील हिंदु बांधवांचे रक्षण करणे हे आपले नैतिक दायित्व आहे.