आता लढा मथुरा श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीचा ! – पू. देवकीनंदन ठाकूर
बेंगळुरू (कर्नाटक) : अयोध्येत श्रीराम मंदिर बनले. जय श्रीराम पूर्ण झाले. आता तुम्ही (हिंदू) मथुरेला येणार कि नाही ? मथुरेत जन्मभूमी बनवायची आहे कि नाही ? ‘बहुत सह लिया, अब ना सहेंगे; हिंदू हक अब लेकर रहेंगे !’ या प्रभावी घोषणेने प्रसिद्ध कथावाचक पू. देवकीनंदन ठाकूर मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी हिंदूंना पुढे येण्याचे आवाहन केले. कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथे ‘कर्नाटक मंदिर महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने आयोजित द्वितीय ‘कर्नाटक मंदिर अधिवेशन’त ते बोलत होते. या वेळी राज्यभरातील मंदिर विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित आणि मंदिर संरक्षणासाठी लढणारे अधिवक्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी पू. देवकीनंदन ठाकूर पुढे म्हणाले की, जसे मुसलमानांचे धार्मिक स्थळांच्या रक्षणासाठी वक्फ बोर्ड आहे, तसे हिंदूंची मंदिरे मुक्त करून त्यांच्या व्यवस्थापनासाठी ‘सनातन बोर्ड’ बनवणे आवश्यक आहे. संस्कृतीचे संरक्षण हवे असेल, तर मंदिरांचे रक्षण आवश्यक आहे आणि हे केवळ हिंदू एकत्र आल्यास शक्य आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांना मंदिर संरक्षणासाठी लढा देण्याचे आवाहन केले.
कर्नाटक राज्यातील ‘गंगम्मा तिम्मय्या कन्व्हेन्शन हॉल’, बसवेश्वरनगर, बेंगळुरूमध्ये मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी मंदिर विश्वस्तांच्या मंदिर अधिवेशनाचा प्रारंभ शंखनादाने झाला. या वेळी पू. रामानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था; ज्येष्ठ अधिवक्ता प्रमिला नेसरगी, कर्नाटक उच्च न्यायालय; श्री. नंदकुमार आयएएस, माजी आयुक्त, मुजराई विभाग, कर्नाटक सरकार; पद्मश्री श्री. आर. व्ही. गौरीशंकर, माजी प्रशासकीय अधिकारी, श्रृंगेरी महासंस्थान आणि श्री. सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ‘रुग्णाची सेवाशुश्रूषा साधना म्हणून कशी करावी ?’ या सनातननिर्मित कन्नड भाषेतील लघुग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
भारतभर मंदिर महासंघाच्या कार्याला हिंदू समाजाकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. कर्नाटक राज्यातील मंदिरांच्या संवर्धनासाठी आणि रक्षणासाठी हिंदूंनी एकत्र यावे, असे आवाहन कर्नाटक मंदिर महासंघाचे संघटक श्री. मोहन गौडा यांनी केले.