पणजी (गोवा) – गेले काही महिने बांगलादेशातील हिंदूंची मंदिरे, घरे, दुकाने आदी नष्ट केली जात आहेत आणि हिंदूंच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांखाली कारागृहात टाकण्यात येत आहे. एकीकडे बांगलादेशातील हिंदूंचा वंशविच्छेद चालू आहे आणि दुसरीकडे भारत बांगलादेशी घुसखोरांचे नंदनवन बनला आहे. परिणामी बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात भारतात सर्वत्र तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गोव्यात बांगलादेशी घुसखोर येऊन स्थायिक होऊ लागल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर गोव्यात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ (एन्.आर्.सी. – नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटीझनशिप) लागू करून बांगलादेशी घुसखोरांना गोव्यातूनच नव्हे, तर देशातून बाहेर हाकलून लावावे, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने ४ जानेवारी या दिवशी पणजी येथील आझाद मैदानात आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली. आंदोलनामध्ये हिंदु रक्षा महाआघाडी, विश्व हिंदु परिषद, इस्कॉन, बजरंग दल, भारत माता की जय, गोमंतक मंदिर महासंघ, अस्नोडा येथील शिवप्रेमी, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी, सनातन संस्था आदी संघटनांचा सहभाग होता.
आंदोलनाच्या प्रारंभी श्री. युवराज गावकर यांनी आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर वक्त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. वक्त्यांच्या संबोधनातून सरकारकडे पुढील मागण्या मांडण्यात आल्या.
१. गोव्यात निरनिराळ्या व्यवसायात गुंतलेल्या बांगलादेशी घुसखोरांना कुणाचा पाठिंबा आहे, हे शोधून काढून संबंधितांवर कारवाई करावी.
२. घुसखोरांची सूची, छायाचित्रे संबंधित भागांमध्ये प्रसारित करावीत, नोकरी देतांना संबंधितांची पार्श्वभूमी नीट तपासावी, तसेच अशा शंका असलेल्यांना कुठेही नोकरी, भाड्याने अथवा विकत घर मिळू नये, अशी व्यवस्था करावी.
३. घुसखोरांना आश्रय देणार्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी.
४. भारताच्या सीमा अवैधपणे ओलांडून भारतात येण्यास कुणी धजावणार नाही, अशी या घुसखोरांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
५. वेश्याव्यवसायात बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती मिळूनही पोलिसांनी त्यांच्या विरोधात कारवाई केल्याचे दिसत नाही. अशा कर्तव्यचुकार पोलिसांवरही कारवाई करावी.
आंदोलनाच्या अखेर हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी वरील मागण्यांविषयी मांडलेल्या ठरावांना सर्वांनी अनुमती दिली. या मागण्या राज्य आणि केंद्र सरकारांना पाठवण्यात येणार आहेत. आंदोलनाला ‘हिंदू रक्षा महाआघाडीचे’चे श्री. नितीन फळदेसाई, विश्व हिंदु परिषदेचे श्री. संजीव कोरगावकर आणि गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी आदींनी संबोधित केले.