अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून चौकशीचे आश्वासन !
अहिल्यानगर (महाराष्ट्र) – मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि मंदिरांचे सुव्यवस्थापन सुनिश्चित करण्याच्या उदात्त उद्देशाने २४ ते २५ डिसेंबर २०२४ दरम्यान शिर्डीत तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली होती; मात्र तिस्ता सेटलवाड आणि फादर सेर्डिक यांच्या ‘सिटीझन फॉर जस्टीस ॲण्ड पीस’ (CJP) या संघटनेने या मंदिर परिषदेविरुद्ध खोट्या तक्रारी करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी लिखित तक्रार मंदिर महासंघाच्या कु. प्रतिक्षा कोरगांवकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोअर टीमचे सदस्य तसेच बुर्हानगर जगदंबा भवानी मंदिराचे प्रमुख अधिवक्ता अभिषेक भगत, स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी श्री. अजिंक्य गायकवाड यांनी अहिल्यानगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांच्याकडे केली. या प्रसंगी मा. अधीक्षक यांनी चौकशी करण्याचे आश्वासन तक्रारदारांना दिले. या वेळी अहिल्यानगर येथील श्री तुळजाभवानी मंदिर, सब जेल चौकचे श्री. गणेश पलंगे उपस्थित होते. अशीच तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यातही दाखल करण्यात आली आहे.
‘महाराष्ट्र मंदिर महासंघ,’ विरार येथील श्री जीवदानी देवी संस्था, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान, श्री साई पालखी निवारा, आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने शिर्डीत शांततेत आणि यशस्वीपणे हा कार्यक्रम पार पडला. इतकेच नव्हे, तर २०२३ मध्ये जळगाव आणि २०२४ मध्ये ओझर (पुणे) येथेही यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सर्व आयोजनांमधून कोणाही अनुचित प्रकार घडलेले नाही, तसेच धार्मिक सलोखा बिघडलेला नाही.
तरीदेखील ‘सिटीझन फॉर जस्टीस ॲण्ड पीस’ या संस्थेने जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी करून भारतीय संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य या मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेवर पूर्वीपासूनच भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध खोटे आरोप करणे, बेस्ट बेकरी प्रकरणात साक्षीदारांना पैसे देऊन खोट्या साक्षी देण्यास भाग पाडणे, न्यायालयात खोटे पुरावे देऊन न्यायालयाची दिशाभूल करणे, संस्थेत आर्थिक गैरव्यवहार करणे, विदेशातील फंडिंगमध्ये घोटाळे करणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत. त्यामुळे ‘सिटीझन फॉर जस्टीस ॲण्ड पीस’कडून मंदिर परिषदेच्या विरुद्ध खोटी तक्रार करण्यामागे हिंदुविरोधी कटाचा भाग आहे का, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय फंडिंग घेतले आहे का, तसेच तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न होत आहे का, या सर्व गोष्टींची चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे.
‘सिटीझन फॉर जस्टीस ॲण्ड पीस’ ही संस्था पूर्वीपासूनच धार्मिक सलोखा बिघडविण्याचे काम करत असल्याचा आरोप आहे. जाणीवपूर्वक केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ नेते यांच्या विरोधात तक्रारी करणे, खोट्या आरोपांची मालिका उभी करण्याचे प्रकार या संस्थेने केले आहेत. सदर तक्रारीची प्रत राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच शिर्डी पोलीस ठाणे यांना पाठवण्यात आली आहे.