Menu Close

हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळा, मुंबई यांच्या वतीने सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती अन् ‘सनातन प्रभात’च्या प्रदर्शनांना आरंभ

सनातन संस्थेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाहक श्री. राजेंद्र वराडकर

मुंबई – ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळा, मुंबई’च्या वतीने गोरेगाव (प.) येथील लक्ष्मी पार्कमधील महाराणी अहिल्याबाई होळकर मैदानावर ९ जानेवारीपासून ‘भव्य सेवा मेळ्या’चा प्रारंभ झाला. या ठिकाणी विविध आध्यात्मिक, राष्ट्रप्रेमी आणि सेवाभावी संस्था यांचे प्रदर्शन येथे उपलब्ध आहे. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि ‘सनातन प्रभात’ यांच्या प्रदर्शनांचासुद्धा येथे आरंभ झाला. याप्रसंगी सनातन संस्थेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाहक श्री. राजेंद्र वराडकर यांच्या शुभहस्ते येथील श्रीकृष्णाच्या प्रतिमेला ओवाळून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. बळवंत पाठक, सनातन संस्थेचे श्री. महेश पेडणेकर यांच्यासह संस्थेचे साधक उपस्थित होते. हे प्रदर्शन १२ जानेवारीपर्यंत खुले रहाणार असून जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

भारतमातेला जगात सर्वोच्च स्थानावर नेण्याचे कार्य सर्वांनी मिळून करूया ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळ्या’च्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘आपल्या भारतीय हिंदु जीवनपद्धतीत साधनेला सर्वोच्च स्थान आहे. त्यातही शास्त्रे, वेद आणि भगवद्गीता यांनी सेवा करण्यास अनन्य महत्त्व दिले आहे. असेच सेवाकार्य ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळा’ यांनी येथे आरंभले आहे. हिंदूंना जागृत करण्याचे काम हा मेळा करत आहे. आपल्या पुढील पिढीला आणि हिंदू बांधवांना जागृत करण्याचे काम मेळ्याच्या माध्यमांतून विविध संस्था करत आहेत. हा मेळा छोट्या कुंभमेळ्याप्रमाणेच आहे. आपला देश आणि धर्म यांवर संकटे येत रहातील; मात्र भारतमातेला जगात सर्वोच्च स्थानावर नेण्याचे कार्य आपण सर्वांनी मिळून करायचे आहे.’’ या वेळी व्यासपिठावर विविध संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.

Related News