Menu Close

पाटणे, काणकोण (गोवा) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा संपन्न

हिंदू संघटित न झाल्यास देशाचे आणखी तुकडे होण्याची शक्यता – नितीन फळदेसाई, राष्ट्रीय बजरंग दल

काणकोण (गोवा) – जिजाऊ माता आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व हिंदु मातांनी शिवाजी महाराजांसारखे संस्कार आपल्या मुलांवर करावे. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण होणार आहे. आमच्या आया- बहिणी लव्ह जिहादच्या विळख्यात अडकल्या आहेत. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांवर ख्रिस्त्यांचे आक्रमण चालू आहे. हिंदू आज एकत्र आले नाहीत, तर भारतमातेचे आणखी काही तुकडे होण्याचा धोका आहे. यासाठी हिंदूसंघटन अत्यावश्यक आहे, असे आवाहन राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. नितीन फळदेसाई यांनी केले. पाटणे, काणकोण येथील श्री देवगीपुरुष मंदिर सभागृह येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत श्री. नितीन फळदेसाई बोलत होते. सभेला हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. नितीन फळदेसाई

हिंदूंची मंदिरे आणि मठ यांना ‘लुटारू’ असे संबोधणारे मडगाव येथील तथाकथित लेखक दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात काणकोण पोलिसात प्रथम तक्रार प्रविष्ट करणारे तक्रारदार श्री. सतीश भट यांचे सभेत अभिनंदन करण्यात आले.

हिंदूंनी जागरूकपणे चुकीच्या कृत्यांना जोरकसपणे विरोध करावा – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

श्री. गोविंद चोडणकर

श्री. गोविंद चोडणकर म्हणाले, ‘‘हिंदूंच्या देवतांना न मानणार्‍यांना मंदिरांविषयी बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. गोव्यातील हिंदूंनी मंदिरांतील उत्सवांमध्ये हिंदुविरोधी कारवाया करणार्‍यांना व्यवसाय करू न देण्याचा ठराव गोव्यात विविध ठिकाणी घेण्यात आला आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने हा एक स्तुत्य निर्णय आहे. हिंदूंनी आता जागरूक राहून प्रभावी संघटनाद्वारे चुकीच्या कृत्यांना जोरकसपणे विरोध करावा आणि मंदिरांच्या पावित्र्याचे रक्षण करावे.’’

या सभेला उपस्थित हिंदु धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध होण्याची शपथ घेतली. श्री. युवराज गावकर यांनी म्हटलेल्या श्री गणेशाच्या श्लोकाने सभेला प्रारंभ झाला. सभेचे सूत्रसंचालन श्री. युवराज गावकर यांनी केले, तर शेवटी श्री. गोविंद लोलयेकर यांनी आभार मानले. सभेच्या शेवटी झालेल्या चर्चासत्रात स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी सहभाग घेतला. सभेला ‘भारत माता की जय संघटने’चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related News