महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांचे संयुक्त आयोजन !
जळगाव (महाराष्ट्र) – शहरातील अयोध्यानगर भागातील श्री हनुमान मंदिरात १२ जानेवारीला रात्री ७ वाजता समस्त सनातनी हिंदूंच्या वतीने सामूहिक श्री हनुमान चालिसा आणि महाआरती करण्यात आली. या वेळी परिसरातील लोकप्रतिनिधी, युवा कार्यकर्ते, महिला यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून मोठ्या भक्तीभावाने महाआरती केली. श्री स्वामीनारायण मंदिराचे श्री नयन स्वामी यांचीही उपस्थिती याला लाभली. रस्त्यावरील दुकानात आलेले ग्राहक आणि त्या दुकानांचे मालक हेही स्वयंस्फूर्तीने आरतीमध्ये सहभागी झाले होते. या वेळी काही भक्तांकडून प्रसाद म्हणून शिरा, चहा यांच्या वितरणाचे नियोजन स्वयंस्फूर्तीने करण्यात आले होते. या आरतीला ६०० हून अधिक भाविक उपस्थित होते.
पुढील महाआरती २ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजीनगर येथे !
शहरातील विविध भागांतील सनातनी हिंदूंचे संघटन व्हावे आणि रामराज्य स्थापनेसाठी हिंदूंकडून सामूहिक उपासना घडावी, या उद्देशाने महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने शहरात प्रत्येक महिन्यातील पहिल्या रविवारी असे महाआरतीचे आयोजन करण्यात येणार असून पुढील महाआरती रविवार, २ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजीनगरमधील श्री मारुति मंदिरात होणार आहे. त्याला अधिकाधिक हिंदु बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाआरती समितीच्या वतीने सर्वश्री गजानन तांबट, आशिष गांगवे, नीलकंठ चौधरी, संजय दीक्षित, संजय येवले, जयेश कुलकर्णी, अनिल चौधरी यांनी केले.