चिंतामणी देवालय, वडगाव, यवतमाळ येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाची बैठक !
यवतमाळ (महाराष्ट्र) – मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आणि चैतन्याचा स्रोत आहेत. मंदिराचे रक्षण होऊन त्यांचे पावित्र्य टिकून राहण्यासाठी सर्व विश्वस्तांनी प्रयत्न केले पाहिजेत. या दृष्टीने महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्यरत आहे. मंदिरांचे सुव्यवस्थापन करणे काळाची आवश्यकता आहे. मंदिरे हिंदु धर्मप्रचाराची केंद्रे होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी केले. ते महासंघाच्या वतीने येथील श्री चिंतामणी देवालय येथे आयोजित मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत बोलत होते.
शिर्डी मंदिर परिषदेत सहभागी विश्वस्तांनी अनुभवकथन केले. मंदिर न्यास परिषदेच्या संदर्भातील माहितीची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. महासंघाद्वारे संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने केला. या बैठकीला सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
वनवासी मारुती देवस्थानचे सचिव श्री गोपाळराव पांडे, सदस्य श्री. सुबोध राय, साई मंदिराचे अध्यक्ष श्री. भगवानजी डगवार, चिंतामणी देवालयाचे श्री. रंगरावजी राऊत यांनी पुढाकार घेतला. बैठकीला यवतमाळ येथील पुष्कळ मंदिर विश्वस्त-पुजारी उपस्थित होते.