कुंभमेळ्यामध्ये घुमला ‘हिंदु राष्ट्रा’चा जयघोष !
प्रयागराज – अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिरात श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला २२ जानेवारी २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. या शुभप्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुंभक्षेत्रात भव्य ‘हिंदु एकता पदयात्रा’ काढण्यात आली. महाकुंभ क्षेत्रातून विश्वकल्याणकारी रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र स्थापनेचा आवाज बुलंद करण्यासाठी या पदयात्रेद्वारे संदेश देण्यात आला. या पदयात्रेत हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्त्रोत आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ तथा श्रीसत्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती होती. तसेच आध्यात्मिक संस्था, हिंदू संघटना, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अधिवक्ता, हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक सहभागी मोठ्या संख्येने झाले होते.
ही पदयात्रा प्रयागराज कुंभक्षेत्रातील मुक्ती-मोरी मार्ग चौक, सेक्टर १९ येथून चालू झाली. तेथून संगम लोव्हर, काली रस्ता येथून पुन्हा मोरी मुक्ती मार्गाने सेक्टर १९ (कुंभक्षेत्र) येथे येऊन तिचे समापन झाले. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. सुनील घनवट आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तर प्रदेश तथा बिहार समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी हे सहभागी झाले होते.
भगवे कपडे आणि ध्वज यांमुळे कुंभक्षेत्राचा परिसर भगवामय झाला !
हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची फुलांनी सजवलेली प्रतिमा वाहनावर लावण्यात आली होती. पदयात्रेत संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी यांनी भगवे वस्त्र आणि ध्वज हातात घेतले होते. त्यामुळे कुंभक्षेत्रातील संपूर्ण परिसर भगवेमय झाले होते. या वेळी ‘जय श्रीराम, हिंदु राष्ट्राचा विजय असो’, ‘लाना होगा लाना होगा हिंदु राष्ट्र लाना होगा’, ‘जो हिंदु हित का काम करेगा वही देशपर राज करेगा’, ‘हर हर महादेव, गंगामाता की जय हो’, अशा दिलेल्या घोषणांनी कुंभक्षेत्राचा परिसर दणाणून गेला. हिंदु राष्ट्र स्थापना करण्याची संत-महंत व हिंदुत्वनिष्ठ यांनी पदयात्रेत गर्जना केली.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले की, हिंदु धर्म ‘वसुधैव कुटुंबकम्’ची शिकवण देतो. अशा धर्माला संविधानाद्वारे अधिकृत संरक्षण मिळण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे. ही मागणी विश्वकल्याणासाठी कार्यरत असलेल्या हिंदु संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी आहे. महाकुंभक्षेत्राकडे पूर्ण जगाचे लक्ष आहे. त्यामुळे या पदयात्रेच्या माध्यमातून हिंदु संत, महंत, देश-विदेशातील हिंदु समाज यांच्या मनातील हिंदु राष्ट्राची मागणी अाम्ही सरकारपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. संतांच्या सान्निध्यात कुंभसारख्या महत्त्वपूर्ण पर्वावर प्रयागराजसारख्या धार्मिक नगरीत केलेली हिंदु राष्ट्राची मागणी लवकरच फलद्रुप होईल, अशी आमची श्रद्धा आहे. या वेळी ‘विश्वकल्याणासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी पदयात्रेच्या शेवटी कुंभस्थित देवता आणि ऋषीमुनी यांच्या चरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.