हिंदुत्वनिष्ठांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाने खरेतर बांगलादेशी घुसखोरांवर स्वतःहून कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक
चिपळूण (महाराष्ट्र) – रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. विशेष म्हणजे यांपैकी काही जण कोणत्याही कागदपत्रांशिवाय, तर काही जण बनावट कागदपत्रांसह अनेक वर्षे जिल्ह्यात रहात असल्याचे धक्कादायक प्रकार उघड होत आहेत. यातील काही घुसखोरांना जामीन मिळाल्यामुळे जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम तीव्र करून त्यांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचे गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हॉटेल मीरा रेजेन्सी येथील पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हा सरचिटणीस श्री. विनोद भुरण, युवा सेना तालुकाध्यक्ष श्री. निहार कोवळे, गोरक्षक श्री. विक्रम जोशी, हिंदुत्वनिष्ठ श्री. अभिनव भुरण, हिंदू राष्ट्र समन्वय समिती संयोजक श्री. अमित जोशी, शिवसेना गुहागर विधानसभा निरीक्षक श्री. अनुराग उतेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यात बांगलादेशी नागरिक असण्याची शक्यता असून त्यासाठी झोपडपट्टी भागात शोधमोहीम राबवणार, तसेच गुन्हेगाराला साहाय्य करणार्यांना सहआरोपी करणार असल्याचे म्हटले आहे; पण केवळ त्यांना सहआरोपी न करता त्यांच्यावर देशद्रोहाचे आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोचवली म्हणून कठोरात कठोर गुन्हे नोंद केले पाहिजेत. हे घुसखोर रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचले कसे ? त्यांना बनावट कागदपत्रे कोण बनवून देते ? ए.टी.एस्.ने कारवाई करूनही घुसखोर अद्याप मोकाट कसे ? याचीही चौकशी व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाची सूत्रे
१. चिपळूण येथे ऑक्टोबर २०२३ मध्ये आतंकवादविरोधी शाखा रत्नागिरी यांनी केलेल्या कारवाईत बुल्लू हुसैन मुल्ला या बांगलादेशी नागरिकाला त्याच्या २ मुलांसह अटक केली; मात्र त्याच्या परिवारातील इतरांना अटक केली नाही. गेली १२ वर्षे त्याची पत्नी आणि आणखी काही मुलांना घेऊन तो चिपळूण येथे रहात आहे; मात्र पोलिसांनी या प्रकरणी योग्य अन्वेषण केले नाही. काय देवाण-घेवाण घडली, ज्यामुळे बुल्लू हुसैन मुल्ला आणि त्याच्या २ मुलांना जामीन मिळाला. देशात घुसखोरी करणार्याला जामीन मिळतो, हे अतिशय गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी जामीन रहित होण्यासाठी काहीही केले नाही.
२. १२ नोव्हेंबर २०२४ या दिवशी आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) रत्नागिरी तालुक्यातील नाखरे-कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर अवैधरित्या वास्तव्य करणार्या १३ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. ते वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करून चिरेखाणीवर काम करत होते.
३. एका बांगलादेशी घुसखोराला रत्नागिरीजवळील शिरगाव ग्रामपंचायतीतून जन्मदाखला देण्यात आला होता.
४. रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे बांगलादेशी महिला मागील ८ वर्षांपासून भारतात वास्तव्य करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेने भारतात वास्तव्य करत असतांना आधारकार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रे तयार केले असून विवाहही केल्याचे निष्पन्न झाले. तसेच या महिलेच्या नावावर शहरात मालमत्ता खरेदी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
५. अनधिकृतरित्या देशात प्रवेश करून बांगलादेशी नागरिक बांधकाम क्षेत्र, मासेमारी, तसेच रोजंदारीचे काम करत असू शकतात, तसेच झोपडपट्ट्यांमध्येही वास्तव्य करू शकतात.
६. रत्नागिरी जिल्हा, राज्य आणि देश यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यात ‘बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम’ राबवावी; या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुके, शहरे आणि गावे येथील संशयित ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’ किंवा ’कोंम्बींग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे; बनावट ओळखपत्रे तयार करणार्या ‘रॅकेट’ची पाळेमुळे उखडून त्यावर कठोर कारवाई करावी; भाड्याने खोली देण्याआधी घरमालकाने भाडेकरूंची, तसेच कामावर ठेवतांना कामगारांची योग्य ती चौकशी करावी, संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे; घुसखोरांना आश्रय देणारे, जामीन देणारे किंवा कोणत्याही प्रकारचे साहाय्य करणारे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती करत आहे.
७. सध्या बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. उद्या हेच बांगलादेशी घुसखोर वाढत जाऊन भारतात छोटे बांगलादेश निर्माण करून तेथील हिंदूंवर असेच अत्याचार करतील, ही परिस्थिती येऊ द्यायची नसेल, तर या प्रकरणी सरकारने आताच कठोर पावले उचलायला हवीत, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती करत आहे.