रणरागिणी शाखेच्या वतीने सहपोलीस आयुक्तांना १ वर्षानंतर पुन्हा स्मरणपत्र !
अश्लीलता पसरवणार्या अभिनेत्रीवर १ वर्षापूर्वी गुन्हा प्रविष्ट होऊनही कारवाई न होणे, ही काय लोकशाही आहे का ? –
संपादक, दैनिक सनातन प्रभात
ठाणे : तरुण पिढीला अनैतिकतेकडे घेऊन जाणार्या अभिनेत्री सनी लिओनवर कारवाई झाल्यास तरुण पिढीवर होणार्या कुसंस्कारांचा धोका टळेल. यासाठी सनी लिओनवर कोणती कारवाई झाली आणि काय शिक्षा करण्यात आली, या आशयाचे स्मरणपत्र हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने सहपोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांना देण्यात आले. या वेळी शाखेच्या सौ. सुनीता पाटील, तक्रारदार सौ. अंजली पालन, मातृवत्सल महिला मंडळाच्या श्रीमती सुलभा देशपांडे, अधिवक्त्या सौ. गौरी सावंत, शिवसेना महिला संघटक सौ. मनीषा शेलार, सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर आणि अधिवक्त्या सौ. किशोरी कुलकर्णी उपस्थित होत्या. (नैतिकता जोपासण्यासाठी संघटित होणार्या महिलांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले. (रणरागिणींनो, केवळ आश्वासने देणार्या पोलिसांचा वारंवार पाठपुरावा घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) स्मरणपत्र दिल्यावर पोलीस उपआयुक्त आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल, ठाणे शहराचे श्री. संदीप भाजीभाकरे यांचीही भेट घेण्यात आली.
१. मूळची कॅनडाची असलेली हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री सनी लिओन ही पॉर्नस्टार असून ती चित्रपटांच्या माध्यमातून सर्वत्र अश्लीलता पसरवते. तिच्या स्वतःच्या संकेतस्थळावरही तिने अश्लील चित्रे आणि चलचित्रे (व्हिडिओ) ठेवली आहेत.
२. या संदर्भात ती, तिचे छायाचित्र काढणारे छायाचित्रकार आणि ते संकेतस्थळावर अपलोड करणारे असे सर्वच गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात १४ मे २०१५ या दिवशी डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्यामध्ये सौ. अंजली पालन यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.
३. या संदर्भात ठाणे पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट करून घेतला; पण त्या अनुषंगाने काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ५ मे आणि १४ मे २०१६ या दिवशी पुन्हा पोलीस आयुक्तांना स्मरणपत्र देण्यात आले.
४. तिच्याविरुद्ध नोंद झालेला गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे. असे असतांनाही पोलीस तिच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असून मवाळ भूमिका घेत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात