Menu Close

ख्रिस्त्यांचा कावेबाजपणा आणि राज्यविस्तारामागील कुटील उद्देश !

१. राज्य जिंकून तेथील पराभुतांना दासांप्रमाणे (गुलामांप्रमाणे) वागवणे, ही गोष्ट ख्रिस्ती समाजाला स्वाभाविक आणि योग्य वाटत असणे
कानडी लेखक श्री. कोटा वासुदेव कारंथ यांनी दाना माडा बेकू (दान करा) या नावाने पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात त्यांनी पाश्‍चात्त्य भाडोत्री किंवा पैशाच्या लोभाने काम करणार्‍या माणसांनी सद्गुणांच्या आदर्शांचा पाया कसा खिळखिळा आणि कमकुवत केला आहे, हे दाखवून दिले आहे. त्यात श्री. कारंथ म्हणतात, पाश्‍चिमात्य ख्रिस्ती समाजाने त्यांचे नौदल, तोफा आणि बंदुकांचा वापर करून सगळे जग जिंकण्याचे अभियान चालू केले होते. त्यांचे पाऊल ज्या प्रदेशावर पडले ते देश हस्तगत करण्याची त्यांची योजना असे. त्यांनी जिंकलेल्या सर्व प्रदेशांवर त्यांच्या राजाचे शासन असावे, असे त्यांना वाटत असे. त्या देशातील स्थानिक नागरिकांना किंवा त्या राज्यात तेथील शासनाचा अधिकार आहे, ही गोष्ट त्यांना मान्य नसे. त्यांना असे वाटत होते की, पराभुतांना लुटणे, लुबाडणे, त्यांना दास्य पत्करायला लावणे, त्यांच्याकडून चाकरासारखी (नोकरासारखी) किंवा दासासारखी (गुलामांसारखी) कामे करवून घेणे आणि तेथील पैसा आणि संपत्ती लुटून आपल्या देशात नेणे, ही गोष्ट स्वाभाविक आणि योग्य होती.
२. लुटीचे केवळ एक टक्का धन शाळा आणि रुग्णालये यांसाठी व्यय करतांनाही त्यामागे धर्मप्रसाराचाच ख्रिस्त्यांचा उद्देश असणे
याच वाईट विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी उत्तर अमेरिका जिंकली. तेथे रेड इंडियन्सची मूळ वसाहत होती. ती जमात मोठ्या प्रमाणात लुटली गेली आणि त्यांच्यावर अत्याचार झाले. त्यांना मारल्यामुळे त्यांच्याच देशात ती जमात अल्पसंख्य झाली. दक्षिण अमेरिकेचा विशाल भूप्रदेश स्पॅनिश लोकांच्या हाती गेला. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्टे्रलिया देशांचे उत्तम भूभाग गोर्‍या माणसांनी बळकावले. गोर्‍या माणसांसाठी काळ्या निग्रोंनी दासाप्रमाणे (गुलामाप्रमाणे) राबावे, हेच त्यांचे कर्म समजले गेले. गोरी माणसे प्रदेश हस्तगत करत असत. तेथे ख्रिस्ती धर्मप्रसारक जात असत. पराभूत समाजात सुधारणा घडवून आणण्याचा देखावा करून त्यांचे धर्मांतर करण्यात येत असे. इंग्रज लुटीचे केवळ एक टक्का धन शाळा आणि रुग्णालये यांसाठी व्यय करत असत. या दानात सेवाभाव नसून ख्रिस्ती धर्म कसा सर्वोत्तम आहे, हे दाखवण्याचा भाव आणि धर्मप्रसार हा उद्देश असे.
३. ख्रिस्त्यांनी ख्रिस्तेतर देशांना दास करून त्यांची लूट केल्याचे हॉवर्ड विद्यापिठाच्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुखाने लिहिलेले असणे
अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापिठाचे समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक पिट्रीम ए. सोरोकीन त्यांच्या मानवतेची पुनर्निमिती (Reconstruction of Humanity) या पुस्तकात म्हणतात, काही शतकांपासून पाश्‍चात्य ख्रिस्ती समाज युद्धाला अधिक आसुसलेला, सगळ्यात आक्रमक, लोभी आणि सत्तापिपासू झाला आहे. या गेल्या काही शतकात पाश्‍चात्य ख्रिस्ती समाजाने अनेक खंडांवर राज्य स्थापन केले आहे. इंग्रज व्यापारी आणि धर्मप्रसारक यांनी त्यांच्या सैन्याचे अनुकरण करून मागासलेल्या आणि इतर धर्मीय देशांना आपले दास (गुलाम) करून त्यांची वारेमाप लूट केली आहे. ख्रिस्त्यांच्या या विचित्र पंथप्रेमामुळे अमेरिका, आफ्रिका, ऑस्टे्रलिया अणि आशिया खंडांतील जनता स्वातंत्र्य गमावून बसली आणि पराधीन झाली. क्रूर हत्या करणे, जनतेला दास करणे, छळ मांडणे, सांस्कृतिक मूल्य, संस्था आणि जीवनपद्धती उद्ध्वस्त करणे, मद्यपान संस्कृतीचा पुरस्कार करणे, समाजात गुप्तरोगांचे प्रमाण वाढवणे आणि व्यावसायिक स्पर्धा वाढवणे, या सगळ्या गोष्टींचा या विचित्र प्रेमात समावेश होत असे. पाश्‍चात्त्य समाजाने पराभूत समाजास साहाय्य (रुग्णालये आणि वैद्यकीय साहाय्य) आणि सरंक्षण देऊन सहानभूतीची वागणूक तसेच शिक्षण दिले आहे. लोकशाहीच्या रूपात शासन दिले आहे; परंतु या दानाचे प्रमाण घडाभर पाण्यात एक थेंब, एवढे होते हे सिद्ध झाले आहे.
(संदर्भ : जगण्याची हातोटी – भाग २, लेखक – स्वामी जगदात्मानंद, अनुवाद डॉ. विनय वैद्य, नागपूर; मासिक जीवन-विकास, एप्रिल २०१३)

Related News