आज शिवप्रतापदिन म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाचा कोथळा काढून त्याला संपवले तो दिवस ! भवानीमातेच्या आशीर्वादाने शिवरायांनी एक नियोजनबद्ध योजना आखून अफजलखानाला अगदी नृसिंहाच्या पद्धतीने संपवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना ठरली. खरेतर आजचा शिवप्रतापदिन हा देशस्तरावर साजरा केला पाहिजे; कारण अफझलखान वधाची ही ज्वाला आजच्या काळातही धगधगत ठेवणे आवश्यक वाटते. त्यातूनच आज देशात फोफावलेल्या आतंकवादाचा बीमोड कसा करावा, या प्रश्नाचे उत्तर मिळते.
शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरच्या विजयानंतर हिंदुद्वेष्ट्यांवर चांगलीच जरब बसली होती. शिवरायांचा दबदबा प्रचंड वाढला होता. मंदिर उद्ध्वस्त करणे, गोहत्या, धर्मांतर यांना बर्यापैकी आळा बसला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या धोरणाप्रमाणे जर आजच्या राज्यकर्त्यांनी आचरण करून आतंकवाद्यांना असे संपवले असते, तर आजची वर्तमान स्थिती काही वेगळीच असली असती. मग भारतीय जनतेलाही आपल्या राज्यकर्त्यांचा आधार वाटला असता आणि आतंकवाद संपवण्यासाठी जनताही पुढे सरसावली असती.
आज आय.एस्.आय.एस्.सारख्या आतंकवादी संघटना देशावर आक्रमणे करण्यास सिद्ध आहेत. त्यांना उघडपणे पाठिंबा देणारेही देशातीलच अनेकजण आहेत. त्यांच्या समर्थनार्थ आय.एस्.आय.एस्. जिंदाबाद, भारत मुर्दाबाद अशा पोलिसांदेखत घोषणा दिल्या जातात. यांवर शासनाने वेळीच कारवाई केली असती, तर अशी कृत्य पुन:पुन्हा करण्यास ते धजावले नसते. एवढेच नव्हे, तर देशात इतका आतंकवाद माजला आहे की, भारताचे शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानच्या समर्थनार्थही घोषणा भारतात उघडपणे दिल्या जातात. पाकचे झेंडे काश्मीरमध्ये फडकवले जातात आणि भारतात राहून पाकसाठी काम करणारेही अनेकजण या देशात रहातात, या उघड गोष्टी आहेत. त्याशिवाय पाकिस्तानी सैनिकांच्या प्रतिदिन होणार्या गोळीबारात आजपर्यंत कित्येक भारतीय सैनिक मरण पावले, पाककडून सीमेवर होणार्या गोळीबारामुळे तेथील जनजीवन कित्येकदा विस्कळीत झाले आहे, हे सर्वज्ञात आहे. असे असतांना भारत मात्र पाकशी चर्चा करण्यातच मग्न आहे. चर्चा करूनच प्रश्न सुटले असते, तर एव्हाना आतंकवाद पूर्णत: नष्ट झाला असता.
आता भारताने शिवछत्रपतींचीच धोरणे अवलंबली पाहिजेत. अफझलखानाच्या आजच्या काळातील या वंशजांना शिवाजी महाराजांप्रमाणेच संपवले पाहिजे, तर आणि तरच या आतंकवादाला पूर्णविराम मिळेल. आतंकवादग्रस्त भारत आतंकवादमुक्त होऊ शकेल, तसेच या सगळ्यात होरपळून निघालेली भारतीय जनता सुखी होईल. या अफझल खान वधाच्या घटनेतून बोध घेऊन शासनाने आतंकवाद हा असाच शिवछत्रपतींप्रमाणेच संपवावा लागतो, हे लक्षात घेतले पाहिजे आणि आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, हीच आजच्या काळची आवश्यकता आहे.
कु. जान्हवी पावसकर, गोवा.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात